राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने, अकोल्यात 1 हजार 153 उमेदवार उताविळ.! काही बिनविरोध व दादागिरी सुरू.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे राजकीय रणांगण पेटले आहेत. बिनविरोध म्हणता-म्हणता 1 हजार 153 अर्ज दाखल झाले आहेत. यातील म्हळदेवी, उंचखडक खु, बहिरवाडी, चैतन्यपूर अशी आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे बोलले जात आहे. अर्थात निवडणुक ही झालीच पाहिजे, कारण तो एक लोकशाहीचा उत्सव आहे. या पलिकडे सामान्य व्यक्ती, उपेक्षित समाज व इच्छूक व्यक्तींना यात न्याय मिळत नाही ही एक बाजू असली तरी बक्कळ पैसा खर्च करण्यापेक्षा तो गावाच्या विकासासाठी मार्ग लागलेला कधीही बरा असतो असे अनेकांना वाटते. पण, औंदा ती व्यख्या जरा बाजुला पडली आहे. कारण, सन 2019 च्या विधानसभेत डॉ. किरण लहामटे यांनी जे यश मिळविले. ती एक परिवर्तनाची लाट तर होतीच. मात्र, गाव पातळीवरील गाव पुढार्‍यांना जी जनता वैतागली होती. त्याचा देखील तो एक रोष होते. म्हणून आज परिवर्तनाच्या लाटेत ग्रामपंचायत सापडली आहे. त्यामुळे, येथे कोणी गावपुढार्‍यांना भाव द्यायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचे फाटके व सामान्य कार्यकर्ते का होईना! पण ते स्वाभिमानाने लढायला तयार आहेत. त्यामुळे, ही निवडणुक तालुक्यासाठी फार विशेष असणार आहे. आता अर्ज माघारीसाठी प्रस्तापितांकडून काही व्यक्तींना दादागिरी केली जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून 52 ग्रामपंचायतींचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. या दरम्यान 1 हजार 153 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सुगाव खुर्द गावात 25 अर्ज, आंबड गावात 28 अर्ज, कळस बु येथे 32 अर्ज, लिंगदेव येथे 34 अर्ज, जांबळे ग्रामपंचायतीचे 12 अर्ज, उंचखडक बु येथे 26 अर्ज, ढोकरी गावातून 37 अर्ज, निळवंडे 07 अर्ज, कळस खुर्द 24 अर्ज, चैतन्यपूर 06, टाकळी 28 अर्ज, कळंब 13, धामनगाव आवारी 47 अर्ज, हिवरगाव 32 अर्ज, औरंगपूर 08, ब्राम्हणवाडा 35 अर्ज, बेलापूर 28 अर्ज, गणोरे 47 अर्ज, पांगरी 17 अर्ज, चितळवेढे 11 अर्ज, रूंभोडी 32 अर्ज, धुमाळवाडी 44 अर्ज, बहिरवाडी 08, वाघापूर 19 अर्ज, कोतुळ 60 अर्ज, उंचखडक खु 09 अर्ज, बदगी 14 अर्ज, इंदोरी 15 अर्ज, परखतपूर 16 अर्ज, मेहेंदुरी 37 अर्ज, भोळेवाडी 04 अर्ज, नवलेवाडी 18 अर्ज, पिंपळगाव निपाणी 20 अर्ज, बोरी 14 अर्ज, वाशेरे 23 अर्ज, शेरणखेल 07 अर्ज, घोडसरवाडी 01, नाचणठाव 11 अर्ज, निंब्रळ 18 अर्ज, जाचकवाडी 06 अर्ज, म्हाळदेवी 07, लहित बु 17 अर्ज, पिंपळगाव खांड 26 अर्ज, मोग्रस 07 अर्ज, पिंपळदरी 26 अर्ज, मनोहरपूर 14 अर्ज, तांभोळ 16 अर्ज, कुंभेफळ 33 अर्ज, मन्याळे 15 अर्ज, धामनगाव पाट 17 अर्ज, विरगाव 33 अर्ज, देवठाण 68 अर्ज असे एकुण 1 हजार 153 अर्ज बुधवार दि. 30 डिसेंबर 2020 अखेर दाखल झाले आहेत.

 यापैकी बुधवार दि. 23 रोजी तालुक्यातून एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र, गुरूवार दि. 24 डिसेंबर रोजी म्हणजे दुसर्‍याच दिवशी 13 अर्ज दाखल झाले होते. यात टाकळी हे गाव निवडणुकीला प्रचंड इच्छुक असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हे राष्ट्रवादीच्या तालुकाअध्यक्षांचे गाव आहे. त्यांनी तालुक्यातील 52 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या शब्दानंतर अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होऊन गावच्या विकासासाठी निधी घेऊन गावाची उन्नती साधावी असा त्यांचा मानस होता. मात्र, तालुक्यात दुसार्‍याच दिवशी या गावातून चार अर्ज दाखल झाले होते. तर अखेरच्या दिवसापर्यंत 28 अर्ज दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ धुमाळवाडी, ब्राम्हणवाडा, लहित बु अशा काही गावांतून पहिले अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर सोमवार दि. 28 रोजी तालुक्यातून 71 अर्ज दाखल झाले होते. तसेच 29 तारखेला 312 तर अंतीम दिवशी 757 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे आठ दिवसात एकुण 1 हजार 153 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, काही ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे पहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी सामान्य व्यक्ती व गोरगरिबांवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. धनदांडग्या लोकांनी पुन्हा लोकशाहीची गळचेपी केल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: औरंगपूर सारख्या ठिकाणी काही व्यक्तींनी मागासवर्गीय व्यक्तींना अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हक्क व अधिकार मागून मिळत नाही तर ते भांडून घ्यावे लागतात या उक्तीप्रमाणे कमलेश कसबे यांनी प्रस्तापितांच्या विरोधात दंड थोपडून त्यांची दादागिरी मोडून काढल्याचे पहायला मिळाले. तर, अनेक ठिकाणी एसी, एसटी आणि अन्य जागाच नाहिशा झाल्याने त्यांच्यावर देखील अन्याय झाल्याचे बोलले जात होते. विशेषत: अनुसुचित जातींच्या ज्या काही जागा होत्या, त्या यावर्षी बर्‍याच ग्रामपंचायतींतून हद्दापार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रिपाईचे विजय वाकाचौरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्ती करीत पुढील वेळी यावर लक्ष ठेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

तर दुसरीकडे शिवसेनेच्या चार-दोन ग्रामपंचायती वगळल्यात तर बाकी सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता आहे. आता यावेळी कोणत्याही पक्षाचे चिन्ह नसल्यामुळे वैभव पिचड यांनी ही नामी संधी आहे की, जनाधार आता त्यांच्या बाजुने किती आहे. तर डॉ. लहामटे यांना किती समर्थन मिळते. त्यामुळे ही देखील एक प्रकारे येणार्‍या निवडणुकांची रंगीत तालीम म्हटले तरी काही वावघे ठरणार नाही. यात सर्वात मोठे दुदैव असे की, येथे गावपावळीवर राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे बळ दिले नाही. त्यामुळे, नेते पदाला चिकटून बसले खरे मात्र, त्याच्याकडून कोणताही आऊटपूट दिसत नाही. पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन बळ देणे आवश्यक होते. कोणत्या ग्रामपंचायती कोठे, कोणते नेते कोठे, मतदार, त्यांचा कौल अशा अनेक बाबी तपासणे आवश्यक होत्या. मात्र, जे नेतेगिरी करतात, त्यांच्याच गावात त्यांचे किती उमेदवार येतात याहून त्यांच्या अस्तित्वाची जाणिव होईलच. मात्र, राष्ट्रवादीच्या या ढिसूळ कारभाराने भाजपचे फावेल आणि त्यांच्या चांगल्या जागा येतील असा अंदाज वर्तविला जात आहे.