खोट्या इतिहासाला बदलविण्यासाठी भाऊंच्या रुपाने बहुजनांचा इतिहासात प्रवेश- डॉ. रावसाहेब कसबे

सार्वभौम (अकोले) :- 

                 आजकाल आपण मोठ्या अविर्भावाने म्हणतो की, आपल्या देशाचा इतिहास फार महान, समृद्ध व शुर विरांचा आहे. मात्र, हे सर्व खोटे आहे. यात काहीच तत्थ्य नाही. कारण, आपला देश म्हणजे कोण? तर मांडणार्‍यांनी तो असा मांडलाय की, देश म्हणजे, राजा, त्यांच्या राण्या, राज्यांचे जनानखाने, त्यांच्याकडे असणार्‍या स्त्रीया, त्यांचे सौंदर्य, रंगमहाल, त्यांची वर्णने, म्हणजे इतिहास. आता राज्यांचा इतिहास म्हणजे काही भारताचा इतिहास नव्हे! राण्यांचे सौंदर्य म्हणजे काही भारताचा इतिहास नव्हे! भारताचा इतिहास हा या देशातल्या 90 टक्के कष्टकरी, शेतकरी लोकांच्या जिवणाचा तपशील म्हणजे भारताचा इतिहास होय. मात्र, दुर्दैवाने तो कधी कागदावर आलाच नाही. खरंतर जेव्हा भाऊसाहेब थोरात यांनी लिहीलेली तीन पुस्तके असोत, खताळ पाटलांनी लिहीलेले पुस्तक असो, तिकडे यशवंतराव गडाख यांनी लिहीलेले पुस्तक असोत किंवा आज मधुभाऊ नवले यांनी लिहीलेले पुस्तक असो. हे बहुजन समाजाचा भारतीय इतिहासात प्रवेश झाल्याची साक्ष देणारी गोष्ट आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ते अकोले तालुक्यातील अभिनव शिक्षण संस्था येथे "मिनर्व्हा" प्रकाशन संस्था आयोजित "गाठी ऋणानुबंधांच्या" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. संघराज रुपवते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुधीर तांबे व अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव कोते, प्रा. इंद्रभान डांगे, प्रा. रमेशचंद्र खांडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

ज्येष्ठ साहित्यीक डॉ. कसबे पुढे म्हणाले की, खरंतर राजकारणात माणूस जेव्हा खूप मोठा होतो आणि त्यानंतर तो वाळीत पडतो, त्यानंतरच्या वेदना फार भयानक असतात. हे मी फार जवळून पाहिले आहे आणि प्रत्यक्ष अनुभविले आहे. म्हणून तर आजकालचे राजकारण भर्कटत चालले आहे. याचे कारण म्हणजे यांच्याकडे दुरदृष्टी नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचे वाचन नाही. त्यामुळे सर्व राजकारण दशा आणि दिशाहीन आहे. ते म्हणाले भाऊसाहेब थोरात यांच्या शष्टाब्दीच्या वेळी जेव्हा मी शेती आणि सहकार नावाचा ग्रंथ संपादित केला होता तेव्हा त्याचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हास्ते व्हावे अशी माझी इच्छा होती. कारण, प्रचंड वाचन करणारा तेव्हा तोच एकमेव नेता होता. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो होते तेव्हा ते रुट्स नावाची कादंबरी वाचत होते. तेव्हा माझी मलाच लाज वाटली होती, कारण त्यांच्या आधी मी ती कादंबरी वाचलेली असायला हवी होती, असे मला मनोमन वाटले. त्यानंतर आम्ही तब्बल अर्धातास चर्चा केली. यशवंतरावांनी प्रकाशनाला येण्यासाठी होकार देखील दिला. मात्र, जातेवेळी त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाले, रावसाहेब मी कार्यक्रमाला येतो मात्र मला येण्याची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा मात्र आम्ही आवाक झालो होतो. कारण, तेव्हा ते देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री, माजी गृहमंत्री अशी अनेक पदे भूषविली होती. त्यामुळे, राजकारणाचे अनेक पैलू असतात. ते सगळ्यांनाच भावतात असे नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, मधुभाऊ यांनी हे पुस्कार आत्ताच का लिहीले? यापुर्वी या पुस्तकाचा जन्म का झाला नाही? अर्थात त्यांनी आजवर काही अनुभव घेतले आहेत. तोच इतिहास आज उन्मळून आला आहे असे डॉ. कसबे म्हणले.

यावेळी प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचे नवरदेव अर्थात मधुभाऊ नवले म्हणाले की, खरंतर मी अकोल्याच्या ग्रामपंचायतीवर काही वेळा निवडून गेलो. त्यावेळी एक कार्यक्रम ठेवा होता. तेव्हा डॉ. रावसाहेब कसबे यांचे व्याख्यान एका पत्र्याच्या शेडमध्ये होते. ते मी ऐकल्यानंतर मला फार भावले. म्हणजे मी कम्युनिष्ठ चळवळीत आलो, याचे श्रेय्य तीन व्यक्तींना देतो ते म्हणजे कॉ. श्रीकांत लाड, गोविंद पानसरे व तिसरे नाव म्हणजे डॉ. रावसाहेब कसबे यांना देतो. डॉ. कसबे हे बोलताना नेहमी प्रगल्भ विचारसारणी घेऊन व्यक्त होत असे, ते कम्युनिष्ठांवर व आरएसएसवर बोलताना त्यांची मांडणी अगदी अभ्यासपुर्ण असायची. त्यांच्याकडूनच आम्हाला राजकारण व समाजकारण समजले. राजकारणाच्या पोटात काय असते? इझम कशाला म्हणावं, भांडवलदार  म्हणजे काय? असे अनेक विचार आणि चळवळ मी त्यांच्याकडून शिकून घेतली आहे. त्यांच्या भाषणातील, बोलण्यातील शैली आपल्याला आत्मसात करता येईल का? याचा देखील मी विचार केला आणि त्या दृष्टीने मी पायपीट सुरू केली.

भाऊ पुढे म्हणाले की, दशरथ सावंत यांच्याबाबत बोलायचे झाले तर, त्याच्या पाठपाण्याच्या चळवळीतील एक महत्वाचे वाक्य नेहमी असायचे की, हा खरा प्रश्न आहे. ते देखील मी आहे तसेच वाक्य घेण्याचा प्रयत्न करत होतो. यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यास मिळत होती की, सावंत साहेब नेमकी कोणती गोष्ट हायलाईट करतात? कोणत्या प्रश्नावर जास्त जोर देतात, त्यातील मर्म काढून तो पोटतिडकीने मांडण्याचा मी प्रयत्न करत गेलो. जे काही बोलायचे ते इतरांच्या काळजावर कोरले गेले पाहिजे असेच धडे मी कसबे सरांकडून घेतले. खरंतर विधानसभेच्या वेळी देखील राजकारणात आम्ही नागमोडी वळणे घेतली. मात्र, पाटी पुसण्याच्या आत पुन्हा इकडे आलो. ही देखील सरांचीच कृपा आहे. त्यामुळे जी काही विचारधारा आहे, ती सरांमुळेच आहे असे मत नवले यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, मी शेती करता-करता शेतकर्‍यांचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलो. आजही माझी जात, माझा धर्म, माझा पंथ सगळे शेतकरी आहे. हा ग्रामीण समाज देशाचा कणा आहे. येथील शेतकरी, कष्टकरी आणि प्रत्येकाच्या हक्कासाठी आत्मियतेने लढणे, याला मी राजकारण व समाजकारण समजतो. आता मी गाठी ऋणानुबंधांच्या या पुस्तकानंतर दुसरे पुस्तक लिहीले आहे. लवकरच ते सगळ्यांच्या समोर येईल. त्यात भिमाशंकर ते त्र्यंबकेश्वर हा जो मधला काही सह्याद्रीचा घाटमाथा आहे. या दरम्यान दुसरा बाजीरावापासून तर खिरविर्‍याच्या सावकरांच्या विरोधात झालेले आंदोलन इतपर्यंतचा जो प्रवास आहे. या घटनेच्या ओघाने जी काही समरगाथा आहे. ती मी शब्दांकीत करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा हे पुस्तक प्रकाशन करण्याची संधी येणार आहे.

यावेळी, महा. राज्याचे आमदार सुधीर तांबे म्हणाले की, मधुभाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या हे फार चांगले झाले. कारण, शस्त्रापेक्षा देखील जास्त सामर्थ शब्दात आहे. त्यामुळे प्रत्येकाने लिहायला आणि बोलायला शिकले पाहिजे. लिहीणे हे एक वस्तुपाठ असतो, एक अनुभव असतो. तसेच लिहीणे हा इतिहासाचा पाठपुरावा असतो. त्याचा अभ्यास केला तर आपल्यातील कच्चे दुवा आपल्या लक्षात येतात. भाऊंनी साम्यवादी चळवळी आणि व्यक्ती विचारांना मांडले आहे. तेथून त्यांच्यात हा लढा कसा उभा राहिला याची प्रचिती या पुस्तकातून होते. त्यांचे वक्तृत्व फार सुंदर आहे. त्यामुळे ते आमच्या घरातील हक्काचे वक्ते होते. तर भाऊसाहेब थोरात (दादा) यांचे देखील ते चाहते होते, भाऊंनी प्रत्येक व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिली आहे. आता भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी लिहीले पाहिजे. समाजापुढे खरा इतिहास मांडण्यासाठी लिहिले पाहिजे. कारण, समाज्यात काही चुकीचे संदेश जात आहे. ते खोडण्याचे काम केले पाहिजे म्हणून भाऊंनी लिहावे असे मत आ. तांबे यांनी मत व्यक्त केले.

      यावेळी अध्यक्ष संघराज रुपवते म्हणाले आहे की, करोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी वाईट घडल्या असतील. मात्र, चांगले काम झाले ते म्हणजे या पुस्तकाचा जन्म झाला आहे. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. खरंतर मिनर्व्हा प्रतिष्ठण म्हणजे काय हे माहित नव्हते. मात्र, या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचा अर्थ कळाला, त्याच बरोबर अकोल्यातील लोकांना भेटण्याचा देखील योग या पुस्तकाने आणला आहे. खरंतर माझ्या वडिलांना तीन पुस्तकं लिहायची होती. मात्र ती राहून गेली. मात्र, त्यानंतर एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा अध्यक्ष मी आहे हे माझे भाग्य आहे. तसेच अकोल्यात आल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी दादासाहेब रुपवते यांची आठवण होते. त्यांनी चर्चील यांचे उदा. देत स्पष्ट केले की, मधुभाऊ यांनी पक्ष म्हणून नव्हे तर तत्व म्हणून पक्ष बदलला आहे अशा भावना अ‍ॅड. संघराज रुपवते यांनी व्यक्त केल्या.

       यावेळी ज्येष्ठ नेते सावंत म्हणाले की, मधुभाऊंच्या पुस्तक म्हणजे फार अप्रतिम आहे. ते माझ्या हाती पडताच मी अगदी आधाशासारखे वाचून काढले. हे पुस्तक म्हणजे एक निर्मळ झरा आहे. खरंतर मधुभाऊ हे शब्दप्रभू आहेत. तरी त्या पलिकडे त्यांच्या भावना फार वाखाण्याजोगा आहे. जेव्हा, मधुभाऊ यांचा अपघात झाला आणि ते त्यातून वाचले. त्यातून निर्माण झालेल्या त्या भावना आहे. या पुस्तकात त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींचे यथार्थ वर्णन केले आहे. या पुस्तकात साहित्याचा एक बाज आहे. अन्य साहित्यांपेक्षा या पुस्तकाला जास्त साज आहे. तो या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी अजरामर होणार आहे, अशा भावना ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी व्यक्त केले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे म्हणाले की, मधुभाऊंनी एका पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याचा मनस्वी आनंद झाला आहे. खरंतर सावंत साहेब आणि आम्ही देखील फार संघर्ष केला आहे. मात्र, दुर्दैवाने ते शब्दात उतरले नाही. मधुभाऊंनी मात्र लॉकडाऊनच्या काळाचा फायदा घेत जे काही लिहीले आहे ते फार अनमोल आहे. भाऊंनी आयुष्यात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात खूप काही भोगले आहे. त्यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष शब्दात लिहावा, त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळेल, आम्ही देखील काहीतरी लिहिण्यासाठी उद्युक्त होऊ. त्यामुळे, त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो.

     यावेळी मिलींद कसबे, प्रा. इंद्रभान डांगे, मा. सूरेशराव कोते, मा. अशोकराव भांगरे, प्रा. रमेशचंद्र खांडगे, दशरथ सावंत, मिनानाथ पांडे, विक्रम नवले, नगराध्यक्षा संगीताताई शेटे, सुरेश खांडगे, डॉ. बंगाळ सर, संपत नाईकवाडी, मधुकरराव शिंदे, दिनकर म्हस्के, एस. झेप. देशमुख, कचरूपाटील शेटे, विठ्ठलराव चासकर, सुरेशराव गडाख, आरिफ तांबोळी,भानुदास तिकांडे, मंदाताई नवले, सोमनाथ मुटकुळे, सुर्यकांत शिंदे,बाबासाहेब दातखिळे, अरुण रुपवते, पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत आवारी, अमोल वैद्य, मदन पथवे, कॉ. चौधरी सर, बाळासाहेब दुधाडे,  प्रा. अनिल बेंद्रे, अनिता गाडकवाड, दिपक महाराज देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.