कोविडचा पेशन्ट मयत, डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलची तोडफोड, मग डॉक्टरांनी केला राडा, संजीवन हॉस्पिटलमधील प्रकार...

सार्वभौम (संगमनेर) :-

             कोविडच्या रुग्णाचा आॅक्सिजन काढल्यामुळेच आमचा रुग्ण दगावला असे म्हणत नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली. तर आमचे दिड लाख रुपये बिल भरा आणि तुमच्या नातेवाईकांची बॉडी घेऊन जा असे म्हणत डॉक्टरांनी देखील मयत रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण करीत त्यांच्या गाडीच्या काच फोडल्या. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील संजिवन हॉस्पिटल येथे मंगळवार दि. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. एकीकडे रुग्ण दगावल म्हणून तर दुसरीकडे बिल हवे म्हणून दोन गट एकमेकांना भिडले, त्यांच्या बेछूट हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समीर शेख लालशेख यांनी त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक यांना शुक्रवारी रात्री संजीवन हॉस्पिटल संगमनेर पेशंट येथे अ‍ॅडमिट केले होते. त्यानंतर हॉस्पिटलने रुग्ण ऑडमिट करताना त्यांच्याकडून काही रक्कम अगाऊ घेतली होती. मात्र, जेव्हा रुग्ण दाखल केला होता. तेव्हा त्यांची प्रकृती चांगली होती. दरम्यान चार दिवस झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले की, यांनी 40 हजारांचे एक इंजक्शन द्यावे लागले. तर काही तपासण्या कराव्या लागतील. मात्र, सर सलामत तो पगडी पचास असे समजून नातेवाईकांनी ती रक्कम तत्काळ भरली. हा सर्व पाण्यासारखा पैसा जात असला तरी रुग्ण वाचला तर जग जिंकले अशा मनस्थितीत असताना चौथ्या दिवशी माहिती मिळाली की, रुग्ण दगावला आहे.

दरम्यान या चार दिवसात रुग्णाचे बिल हे आभाळाला भिडले होते. म्हणजे रुग्ण ते गेलाच मात्र, 1 लाख 65 हजार रुपयांच्या बिलाची देखील रुग्णालय नोंद झाली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट हॉस्पिटल गाटले. मयत व्यक्तीच्या मुलास विश्वासच पटेना की, काल परवा ठणठणीत असणार्‍या माझ्या वडिलांनी आज अखेरचा श्वास घेतला कसा! त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन पाहिले तर ते मयत झालेले होते. तेथे जाण्यास डॉक्टरांची परवानगी नसली तरी त्या मुलाने वडीलांची छाती दाबून पाहिली, त्यांना वारंवार उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. तेथून पुढे खरा संजीवनी हॉस्पिटलमध्ये राडा सुरू झाला आणि दोन गट एकमेकांना भिडत चांगल्याच हणामार्‍या झाल्या.

दरम्यान, रुग्ण अ‍ॅडमिट केल्यानंतर ते ठिक होते. त्यांना अन्य काही त्रास होता. त्यावर उपचार करण्याऐवजी कोविडला नाचवत बसले तर डॉक्टरांनी रुग्णाचा नैसर्गिक ऑक्सिजन काढून घेतला त्यामुळेच माझ्या वडिलांचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी जेव्हा मृतदेह नेण्याची वेळ आली तेव्हा डॉ. वाबळे म्हणाले की, हॉस्पिटलचे दिड लाख रुपये बील भरा आणि मगच प्रेत घेऊन जा. त्यांनी बाकीचे लोक समजावून सांगत असताना डॉक्टरांनी बिलाची मागणी करीत सगळ्यांना बाहेर काढून दिले. एकंदर हा वाद टोकला गेला असता डॉक्टरांनी काही तरुणांना तेथे बोलावून घेत समीर शेख लालशेख (वय 55, रा. हसनापूर, ता. राहाता) यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली. तर शेख यांच्या गाडीच्या काचा फोडून तिचे नुकसान केले. याप्रकरणी शेख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डॉ. वाबळे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर या व्यतिरिक्त डॉ. स्वप्नील नेताजी भालके (रा. गुंजाळवाडी शिवार, ता. संगमनेर) यांनी देखील दहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कोविड पेशन्टवर उपचार करीत असताना आरोपी हे आले व म्हणाले की, तुम्ही आमच्या पेशन्टचा कृत्रिम श्वासोश्वास का काढला. या कारणाहून आरोपी यांनी डॉ. स्वप्नील भालके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डॉक्टरांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्याने शिवीगाळ करुन सामानांची तोडफोड केली. हा प्रकार घडल्यानंतर डॉक्टर भालके यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.

दरम्यान संगमनेर तालुक्याने कोविडच्या सर्व सिमा पार केलेल्या असतांना येथे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. रुग्ण सापडतात मात्र, त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रशासन किंवा सामाजिक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. रुग्ण कोविडने कमी तर भितीने जाण्याचे प्रमाण अधिक आहे. आज संगमनेरात पाच हजार रुग्ण झाले असून रोज अर्धशतकी आकडे समोर येत आहे. एकीकडे चार दिवसात दिड=दिड लाख रुपयांची बिले आणि दुसरीकडे दगावणारे रुग्ण त्यामुळे, मानसिकता ढासाळणार नाही तर काय? आता यात प्रशासनानेच मध्यस्ती झाले पाहिजे, रुग्णालयांच्या बिलांवर अंकूश ठेवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती कार्यान्वीत करणे अपेक्षित आहे. असे कित्तेक लोक आहे. ज्यांनी आपल्या जमिनी विकून, कर्जाने पैसा काढून, आया बहिनींचे दागिने गहाण ठेऊन रुग्णालयांची लाखो रुपयांची बिले भरली आहेत. तरी देखील माणूस दगावतो. ही सल कोणाकडे मांडायची? त्यामुळे, प्रत्येकजण या आजारापेक्षा येणार्‍या भरमसाठ बिलांना वैतागला आहे. अर्थात काही डॉक्टर असे आहेत जे सामान्य मानसांची बिले अगदी मोठा मनाने माफ करतात तर कोणी सवलती देतात. ही माणूसकी जपली तरी मानसाला आधार मिळतो. तर दुसरीकडे तुमच्या मानसाचे वाटोळे होवो, आम्हाला काही घेणेदेणे नाही. असे म्हणत पैसा टाक आणि चालता हो.! असे म्हणणारे देखील काही लोक आहे. यात सामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, मजूर वैतागून गेल्याचे दिसते आहे.