पतसंस्थेतील कर्मचार्‍याने नोकरी सोडावी म्हणून, बंद लिफाफ्यात पाठविली ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल.!

सार्वभौम (अकोले) :- 

               तुमच्या आदिवासींमुळे आमच्या मुलांना नोकरी मिळत नाही. तुझ्यामुळे आमच्या मुलांच्या नोकर्‍या गेल्या त्यामुळे, आत तू 1 डिसेंबरपासून कामावर आला तर घरात येऊन तुझे हातपाय तोडून टाकू. त्यामुळे, तुला तुझा जीव पाहिजे असेल तर तू कामावर येऊ नको. अशा अनेक पद्धतीने अवहेलना करुन दुधगंगा ग्रामीण पतसंस्था शाखा ब्राम्हणवाडा येथे काम करणारा कर्मचारी दत्तू विठ्ठल कडू (रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) यास अज्ञात व्यक्तीने बंद लिफाफ्यात चिठ्ठी पाठवून ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तू कडू हे दुधगंगा ग्रामीण पतसंस्था, शाखा ब्राम्हणवाडा येथे कामगार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे, तेथे काही लोकांची पोटदुखी झाली आहे. एक एसटी समाजाच्या व्यक्तीमुळे आपल्या मुलांना नोकरीत आरक्षण किंवा जागा मिळत नाही. या रोषाने कोणीतरी कडू यांना अत्यंत कडू भाषेत शब्दप्रयोग करुन हिनविले असून धमकी दिली आहे. दत्तू यांची प्रगती पाहून कोणीतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करुन हातपाय मोडणे, घरातील व्यक्तींना मारहाण करण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार दि. 17 नोव्हेंबर रोजी घडला असून त्यानंतर कडू यांनी थेट पोलीस ठाणे गाठून संबंधित चिठ्ठी पोलिसांच्या स्वाधिन केली आहे.

यात म्हटले आहे की, 1 डिसेंबर 2020 पासून तू पतपेढीत कोणतीच नोकरी करायची नाही. कारण, तुमच्या एसटी समाजामुळे आमच्या मुलांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. पतपेढीत तू खूप पैसे कमविले आहे. आमच्या वाडीच्या एक कडूने सांगितले की, दत्तुकडे 3 ते 4 लाखांचे सोने आहे. जवळ गाडी, घरात फ्रिज, गिरण, चांगली फरशी आहे. मग इतक्या कमी पगाराच्या नोकरीत तू हे कसेकाय केले?  तू खुप पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे, तुला तुझा जीव पाहिजे असेल तर तू कामावर येऊ नको. 1 डिसेंबरपासून कामावर आला तर घरात येऊन तुझे हातपाय तोडून टाकू आणि तुझ्या घरातील सोने घेऊन जाऊ असे चिठ्ठीच्या पहिल्या पानात म्हटले आहे.

तर चिठ्ठीच्या दुसर्‍या पानावर म्हटले आहे की, तुझी दुसरी गाडी पाटवून देऊ, इतके करून तू जर आमचे एकले नाही तर तुझी बायको आणि तीन मुलींचा जीव तुला पाहिजे असतील तर कामावर येऊ नको. जर तू कामावर आला तर तुला घरात घुसून मारू, त्यामुळे, तुला तुझ्या घरच्यांची इज्जत पाहिजे असेल तर तू 1 डिसेंबरपासून कामावर येऊ नको. अन्याथा तुला गायकर सारखे मारुन टाकू, दत्तू लक्षात ठेव 1 डिसेंबरपासून कामावर यायचे नाही. अशा प्रकारची वाक्य या चिठ्ठीमध्ये लिहीलेली आहेत. त्यामुळे दत्तू कडू यांनी याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यापेक्षा जे काही करायचे ते कायदेशीर करायचे हा योग्य निर्णय त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, कालच्या पुरोगामी तालुक्याला, आजकाल जातीचा वास लागू लागला आहे. त्यामुळे, येथे खरोखर नोकरी करणारे काही लोक सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काही झाले तरी हे जे कोणी लिहीले आहे. ते जरी साधारण अक्षरातले असले तरी ते सुज्ञ व्यक्तीचे हस्ताक्षर आहे. त्याने कितीही चालाखी केली तरी त्यात काही अशा शंका आहेत ज्यामुळे पोलीस अगदी सहज या व्यक्तीपर्यंत पाहचू शकतात. तर या चिठ्ठीत जो कोणी आरोपी आहे. त्याच्याकडून आणखी एका गायकर व्यक्तीच्या खुनाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करणे फार चुकीचे ठरेल.

अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी भल्याभल्या गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्याकडून काही अर्ज निकाली निघाले नसतील. मात्र, मोठ्या प्रत्येक गुन्ह्यांचा उलगडा तरून त्यांनी दोषारोपत्र दाखल केली आहेत. मात्र, हा गुन्हा त्यांच्यासाठी फार आव्हानात्मक असणार आहे. येथे खर्‍या अर्थाने पोलीस खात्याची कसोटी लागणार आहे. या गुन्ह्याचा आरोपी अटक होती की नाही, की गुन्हा कायम तपासावर राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासाठी एनसीच्या तपासासाठी न्यायालयीन परवानगी तत्काळ घेऊन तपास होणे अपेक्षित आहे. यापुर्वी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना देखील अशाच पद्धतीने निनावी पत्र पाठवून धमकी दिली होती. तेव्हा, नेवासा व एलसीबी पोलिसांनी हे आव्हान स्विकारुन नेवासा तालुक्यातून एका तरुणाला अटक केली होती. आता या गुन्ह्यात नेकमी कोण माथेफिरु आहे. हे शोधण्यासाठी पोलिसांना कस लावावा लागणार आहे.