धक्कादायक.! बुवाबाजीच्या नादात तरुणाचा अंकाईच्या तळ्यात बुडून मृत्यू.! अकोल्यातील गाणोरे येथील घटना.!
सार्वभौम (अकोले) :-
बुवाबाजीच्या नादाला लागून अकोले तालुक्यातील गणोरे येथे एका तरुणाने आपला जीव गमविल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 21 रोजी येवला तालुक्यातील अंकाई किल्ला येथे घडली आहे. हा तरुण अगदी कष्टाळू आणि जिद्दी होता. मात्र, फालतू बाबागिरीच्या सल्ल्यानुसार एका तळण्यात स्नान करण्यासाठी गेला आणि पोहता येत नसल्यामुळे त्याने आपला जीव गमविला आहे. याप्रकरणी स्थानिक येवला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर या घटनेमुळे, गणोरे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. गणेश आंबरे (वय 24, रा. गणोरे, ता. अकोले) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश हा फार कष्टाने काम करुन आपल्या कुटुंबासाठी हातभार लावत होता. गावात त्याचे पंक्चर काढण्याचे दुकान असल्यामुळे तो सतत कामात व्यस्त असे. गेल्या नऊ महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तो लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्या पंक्चर झाल्या तर तो घरुन सुविधा देत होता. इतका कर्तुत्वान मुलगा कोणाच्यातरी नादाला लागला आणि एका बुवाबाबाच्या सानिध्यात आला. त्या मुर्ख मानसाने त्यास सल्ला दिला की, तुम्ही अंकाई येथील तळ्यात स्नान करुन या, म्हणजे तुमच्या आयुष्यात असणार्या सगळ्या ईडा-पिडा टळून जातील.
अर्थातच गणेशची कर्मवार निष्ठा होती. मात्र, याच महाशयाने अनेकांना अशाच प्रकारचे सल्ले दिले होते. त्यामुळे, एकापाठोपाठ असे दहा-बारा लोक तयार झाले आणि त्यांनी एक पिकअप करुन थेट अंकाई तिर्थक्षेत्र गाठले. शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी गणोरे सोडले व सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हे सर्व तेथे पोहचले. प्रत्येकाने तेथे कपडे काढून आंघोळी करण्याचे नियोजन आखले. मात्र, याच दरम्यान, गणेश कधी पाण्यात बुडाला हे कोणालाच समजले नाही. त्याला पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडून मयत झाला. अर्थात रोज कष्ट करुन घरासाठी आधार बनलेला गणेश कोणाच्यातरी सल्ल्याने पाण्यात अंघोळ करुन आपल्या समस्या सोडविण्यासाठी गेला आणि नको त्या समस्येला सामोरे जाऊन आपला जीव गमवून बसला अशी चर्चा गणोरे गावात सुरू आहे.
खरंतर, ज्या बुवाने हा सल्ला दिला. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण, त्याला जर भविष्य आणि लोकांवर येणारे संकटे कळतात तर त्याला गणेश सारख्या कष्टाळु व निष्पाप मुलावर येणारे संकट का कळले नाही. त्याने केवळ स्वत:चा धंदा तेजीत ठेऊन कर्मकांडाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. त्यामुळे, अशा बुवांवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यास बेड्या ठोकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर, हे असेच प्रकार सुरू राहिले तर अशा अनेक गणेश सारख्या मित्रांना आपण गमवून बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, येणार्या काळात देखील अशा बोगस लोकांच्या नादी लागून आपल्या लेकरांचे कोणी नुकसान करुन घेणार नाही. अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जग 21 व्या शतकात किती प्रगती पथावर गेले आहे. अशात काही कर्मकांड करणारे लोक या देशात टिकून आहे. म्हणून देश अजुनही विकसित नव्हे तर विकासाच्याच मार्गावर आहे. त्यामुळे, अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी कष्टाला महत्व दिले पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे, आज भविष्य सांगणार्याने एक मुलाचे भविष्य अंध:कारात नेवून ठेवले आहे. त्यामुळे, श्रद्धा ठेवा मात्र अंधश्रद्धा ठेऊ नका. हाच संदेश आज गणेश सर्वांना देऊन गेला आहे.