अगस्ति साखर कारखान्याच्या निवडणुकीची अंतर्गत खलबते सुरू.! नव्याने बी.जे रुजतील का? की, पुन्हा जैसे-थे.!
सार्वभौम (सार्वभौम) :-
अकोले तालुक्याची आण, बान शान आणि शेतकर्यांचा प्राण असणार्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता होऊ घातली आहे. अर्थात त्यापुर्वी नगरपंचायतीची निवडणूक असणार आहे. मात्र, यात शहरातील काही ठरविक डोके सोडले तर कोणाला रस दिसत नाही. मात्र, खरी कसोटी ही कारखान्यावर लागली आहे. कारण, नगरपंचायतीत काही गोडधोड खायला नाही. मात्र, कारखान्यात फार मोठा गोड मलिदा असल्याने आता येथे मोठी चढाओड लागल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच की काय.! एक तालुक्याची अस्मिता आणि राजकीय वर्चस्व यासाठी प्रत्येकाने या निवडणुकीत कस लावलेला दिसून येत आहे. यात माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आ. वैभव पिचड, व्हा. चेअरमन तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांना कारखान्याची सत्ता टिकविताना मोठा कस लावावा लागणार आहे. तर यांना शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, आ. किरण लहामटे, बी.जे देशमुख यांना कंबर कसावी लागणार आहे. तर यांच्यासह दोन्ही गटांच्या सानिध्यात असणारे छुपारुस्तम सभासद यांची बोळवण करताना देखील सध्या दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे, अनेकजण मोठ्या जंगी तयारीत असून कारखान्यात नव्याने बीजे रुजविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यात सध्या राष्ट्रवादीला मात्र प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
खरंतर निवडणुका म्हटलं की अकोले तालुक्यात ज्याला राजकारणाची जरा देखील अक्कल नाही अशा अनेकांच्या अंगात वारे संचारते. मी म्हणजे वजीर आणि माझ्या शिवाय काहीच नाही. असे नेते आणि कार्यकर्ते आजकाल तालुक्यात भरमसाठ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता तालुक्यात सत्ता परिवर्तन झाल्याने अबब.! कार्यकर्त्यांना तर तोटाच नाही. नाका परिस जड, एक नाही धड अन भरा भर चिंध्या.! अशी स्थिती येथे पहायला मिळत आहे. अर्थातच राष्ट्रवादीत गेल्या कित्तेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर सामान्य कार्यकत्यांना आज कोठे पदे उपभोगण्यास मिळाली आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत, नगरपंचायत व कारखाना यांच्यात त्यांचा उत्साह द्विगुनीत झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे, पद झालेत कमी आणि उमेदवार झालेत जादा. येथूनच नाराजीचे सुर बाहेर पडू लागले आहेत.
आता या निवडणुकीच्या वर्हाडात राष्ट्रवादीचे मित्रपक्ष मोठी लगभग करताना दिसून येत आहेत. त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा हव्या आहेत. आम्ही आमदारकीला तुमच्या सोबत होतो, आम्ही घसे फाडले आहेत असे म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर जणुकाय उपकारच केले आहेत. असा अविर्भाव त्यांनी आणला आहे, त्यामुळे हे मित्रपक्ष आत स्वत:ला राष्ट्रवादीपेक्षा मोठे समजू लागले आहेत. इतकेच काय.! तर येणार्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने कोणाला पक्षात घ्यावे आणि घेऊ नये, हे देखील तेच ठरवू लागले आहेत. त्यामुळे, ही धटींगबाजी येणार्या काळात घडळाचे काटे ढिल्ले करण्याचे काम करते की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.
खरंतर, कारखाना आणि नगरपंचायतीत विद्यमान भाजप पक्षाला अकोल्यात फार मोठा दणका बसणार आहे. कारण, वैभव पिचड यांच्या पाठोपाठ भाजपत जाणे या पलिकडे पर्याय नाही, म्हणून काहीजन भाऊ आणि साहेब निष्ठा म्हणून कमळाच्या मार्गी जाऊन चिखलात फसले आहेत. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहिर अशाच काहीशा वैचारिक द्वंद्वात ते फसले आहेत. तर जे स्वार्थी ठेकेदार आहेत, त्यांना पक्ष आणि निष्ठ यांचे काही सोयरसुतक नाही. केवळ सानिध्यात राहून कमाई हाच त्यांचा पिंड आणि अंतीम हेतू आहेत अशांना तुर्तात त्यांचा विसर पडला आहे. मात्र, या सगळ्यात अंतर्गत काही हलचाली लक्षात घेतल्या तर समोर येते की, भल्याभल्या वैचारिक मान्यवरांनी भाजपला नाकारले आहे. ती विचारधार आपली नाही असे म्हणत पुन्हा परतीचे मार्ग स्विकारले आहे. यात मिनानाथ पांडे, सुरेश गडाख यांच्यासारखी अनेक नवे लोकांच्या तोंडी आहेत. मात्र, वास्तवत: जर वैभव पिचड हे निवडून आले असते तर भाजप विचारधारा पटो व ना पटो यांनी त्यांची साथ सोडली असती का? अर्थातच मुळीच नाही. फक्त वारं फिरल तशी निष्ठा दाखविणारे तालुक्यात अनेकजण पहायला मिळू लागले आहेत. अर्थात काही नेते असेही आहेत, जे पुरागामी असून त्यांना राजकीय घडामोडींमुळे अधोमागीकडे जावे लागले. ते आता पुन्हा राष्ट्रवादीत येऊ पाहत आहेत तर त्यांना राष्ट्रवादीत घेऊ नये अशा सुचना कम्युनिझम पाळणारे देत आहेत. म्हणजे, राष्ट्रवादीत कोणी डिसिजन मेकर राहिले नाही की काय.! की या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार काही ठराविक व्यक्तींकडे गहाण ठेवले आहे की काय असाच प्रश्न पक्षातून विचारला जाऊ लागला आहे.
आता जसे विधानसभेत परिवर्तन पहायला मिळाले तसे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल पाहण्यासाठी जनता असुसलेली आहे. मात्र, सत्ता ताब्यात घेऊन कोणी चालु गाडीची कानखीळ काढली नाही म्हणजे देव पावला. अन्यथा येथील शेतकर्याचे डोळे पुसायला कोणी माणूस सापडणार नाही. कारण, यापुर्वी देखील कारखान्यात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तो शक्य झाला नाही. अखेर पुन्हा माजी मंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ आली होती. आता पुन्हा बदल करायचा की, चालु गाडीत खोडा नको म्हणत सत्ता कायम ठेवायची हे शेतकर्यांच्या हातात आहे. विधानसभेत जी सुप्त लाट होती ती तालुक्यात इतिहास रचून गेली. आता देखील असेच झाले तर पुन्हा तालुक्यात पुन्हा एक नवा इतिहास रचेल. मात्र, तालुक्यात ज्या पद्धतीने परिवर्तन झाले. त्यानंतर हवा तसा रिझल्ट जनेला पहायला मिळाला नाही. त्यामुळे, लोकांमध्ये आजही कभी खुशी कभी गम असे वातावरण दिसून येत नाही.
दरम्यान, काही झाले तरी संघर्ष फार भयानक असणार आहे. सुदैवाने 10 जुलै 2002 प्रमाणे एखादी दंगल उसळू नये म्हणजे झालं. आता राजकीय रणधुमाळी सुरू आहे. जो-तो छुप्या गाठीभेटी घेऊ लागला आहे. भाजपच्या गोटातील भलेभले नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. याचा तोटा त्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार, यात तिळमात्र शंका नाही. या सगळ्यात दोन्ही पक्षांनी आपाले गुप्तहेर परस्पर विरोधी पक्षात पाठविले आहेत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांचा शोध घेणे ज्याला जमेल तो विजयाच्य नक्कीच जवळ असेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
- सागर शिंदे