...अखेर भाऊ भाजपतून बाहेर, पांडे, पथवेंसह हजारो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल.! राष्ट्रवादीचा तोटा, भाजपला रामराम.!
सार्वभौम (सार्वभौम) :-
अकोले तालुक्यात माजी आ. वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला आणि तालुक्याची राजकीय समिकरणेच बदलुन गेली. या निमित्ताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सुगीचे दिवस आले. मात्र, त्यांच्यासोबत पुरोगामी विचारधारा अंगातील नसानसांत भिनलेल्या काही विचारवंतांना देखील बळबरीने भाजपचा रामराम झेलावा लागला. मात्र, हे वैचारिक द्वंद्व ते फार काळ टिकवू शकले नाही. त्यामुळेच पुर्वश्रमीचे काँग्रेस नेता मधुकरराव नवले यांनी आज आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे निष्ठावंत मिनानाथ पांडे व आदिवासी समाजातून एक विचारांचा वारसा जोपासनारे मदन पथवे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यात भाजपचा फार मोठा तोटा होणार आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नुकसान त्यामुळे, आज अकोले तालुक्यात लयास गेलेल्या काँग्रेसला पुन्हा नवचैतन्य प्राप्त झाले असून येणार्या काळात ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा साथी हाथ बढाना हा नारा तालुक्यात गुंजनार आहे. हा पक्षप्रवेश निश्चित झाला असून केवळ औपचारिकता बाकी आहे.
खरंतर कालपर्यंत अकोले तालुक्यात स्थिर असणारे राजकीय वातावरण आज बधिर होऊन ते अस्थिर झाल्याचे पहायला मिळत आहे. ज्या अपेक्षेने तालुक्यात परिवर्तन हवे होते, ते न होता राजकीय अराजकता, जातीयवाद आणि नेत्यांची अस्थिरता पहायला मिळत आहे. म्हणून तर हे धक्कादायक राजकीय बदल आपल्या समोर येऊ लागले आहे. वास्तवत: आज जे काही राजकीय पक्षबदल होत आहे, त्याला एक इतिहासाची आणि विचारांची किनार आहे. त्यावर प्रकाश टाकला तर लक्षात येते की, मोठ्या अपेक्षेने त्याकाळी म्हणजे सन 2016 साली मधुभाऊ नवले यांनी काँग्रेसचा राजिनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, दुर्दैवाने त्यांना अवघ्या तीन वर्षात पुन्हा भाजपचा झेंडा हाती घ्यावा लागला होता. तो का? हे सर्वांना माहित आहे. मात्र, त्यांना भाजपची विचारधारा कधी पटलीच नाही, तरी देखील प्रवाहाबरोबर ते काही दिवस वाहत होते. आज त्यांच्या विचारांचा डोह त्यांना शांत बसू देईनासा झाल्यामुळे त्यांनी थेट पुन्हा काँग्रेसची वाट धरली आहे.
या सगळ्यांचा सारांश एकदा तपासला तर अनेक गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे मधुभाऊ नवले व मिनानाथ पांडे हे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरु झाल्यानंतर आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकांनी प्रचंड मेहनत पणाला लावली. कारण, ज्येष्ठत्वाचा मोठेपणा त्यांना जाऊन अनेकांच्या पदांवर, प्रतिष्ठेवर गदा येत होती. त्यामुळे, नवले आणि पांडे यांना पक्षात घेताना अनेक मतमतांतरे झाली. खरंतर रोखठोक सार्वभौमच्या बातमीने अनेकांच्या नाकाला मिर्ची झोंबेल. मात्र, हेच वास्तव बोलले जाते की, येथे राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन मिरविणारे आणि निष्ठावंतांच्या गप्पा मारणे ढिगभर झाले आहेत. मात्र, पक्ष वाढीसाठी व बांधणीसाठी कोणी आजवर काय केले? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सगळ्यांच्या कर्मचे सातबारे उचकले तर ते कोरे फटक निघतील. खरंतर पक्ष वाढावा म्हणून खुद्द आदरणीय पवार साहेबांनी भाजपत काम करणार्या 40 वर्षाच्या निष्ठावंत एकनाथ खडसे यांना पक्षात सन्मानाने घेतले. याच खडसेंचा इतिहास तपासला तर यांनी पवार साहेबांना आगदी टोकाचा विरोध आणि अक्षरशा राजकीय भाषेत शिव्या घसाडल्या आहेत. मात्र, पक्ष वाढवायचा असेल तर मतभेद आणि इतिहास यांच्याकडे डोकावून देखील पहायचे नसते. म्हणून त्यांनी खडसेंच्या टिकेकडे नव्हे तर पक्षाच्या बळकटीला डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा प्रवेश निश्चित केला.
अर्थातच अकोल्यात जर नवले, पांडे व पथवे हे तिन्ही नेते राष्ट्रवादीत येत होते तर नेमकी हरकत काय होती? त्यांनी तर भाजपत एकनाथ खडसे यांच्या इतके निष्ठावंत काम आणि तितके दिवस तेथे काम केले नव्हते. परंतु दुर्दैवाने येथे मित्र आणि स्वत:चे वैयक्तीक हितसंबंध जोपासण्याच्या नादात पक्षाच्या बांधनीला धसकट समजून काही नेत्यांनी हेतुपूर्वक विरोध केल्याचे बोलले जात आहेे. अर्थात हा विरोध पक्षातील नेत्यांचा नव्हता, मित्रपक्ष म्हणते आमचा नाही, मग नेमके घोडे आडले कोठे? याचे उत्तर कोणी द्यायला तयार नाही. मात्र, हे न समजण्याईतकी अकोल्याची जनता आता दुधखुळी राहिली नाही. खरंतर पवार साहेब म्हणून येथे जनता एकवटली, मात्र, त्यांची यंत्रणा येथे कुचकामी ठरत असल्याचे चित्र वारंवार समोर येऊ लागले आहे. नको त्या व्यक्तींना मोठमोठी पदे देणे, जुण्या जाणत्यांना डावलणे, पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करण्यात फेल ठरणे, स्थानिक स्वराज्य संस्थेत अपयश मिळविणे, अशा कित्तेक बाबी सांगता येतील. मात्र, झाकली मुठ सव्वा लाखाची. येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी जणूकाय हात टेकले आहेत की तालुक्याकडे काना डोळा केला आहे? असा प्रश्न राष्ट्रवादीतील लोकच विचारू लागले आहेत.
तालुक्यात पक्ष बांधायचा असता तर नवले, पांडे व पथवे यांच्या प्रवेशाने पक्षाला बळकटी आली असती. येणारी नगरपंचायत, कारखाना व ग्रामपंचायत निवडणुका यात राष्ट्रवादीचा झेंडा कोठेतरी फडकला असता, एकोप्याने काम केले असते तर पक्ष वाढीसाठी फार मोठी मदत झाली असती. मात्र, कोणाचेतरी अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या जबाबदार व बड्या नेत्यांनी पक्षाचे फार मोठे नुकसान केल्याचे सूर आता बाहेर पडू लागले आहे. यात एक मात्र नक्की, ज्या राष्ट्रवादीत या तिघांना स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागले असते किंवा तुर्तास तरी बघ्याची भूमिका घ्यावी लागली असती. आता मात्र, ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने येथे मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे यांना येथील राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून काम करता येणार आहे. ही त्यांची जमेची बाजू असणार आहे.
एकंदर, अकोले तालुक्यात राष्ट्रवादीला आता कोणाची गरज नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना येथे डोईजड माणूस नको आहे. प्रथम स्वत:चे अस्तित्व, मग पक्ष बांधनी असा फंडा दिसतो आहे. कारण, गेल्या कित्तेक दिवसांपासून मिनानाथ पांडे यांनी राष्ट्रवादीशी संलग्न राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पक्षातील ठराविक व्यक्तींनी नेहमी लोटण्याचा प्रयत्न केला. अर्थांत त्यांची शरद पवार व थोरातांवर प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळे, त्यांनी कधी कोणापुढे शरणागती पत्करली नाही. तेच त्यांचा पक्ष असे समजून त्यांनी आजवर वाटचाल केली आहे. त्यामुळे, इतका अभ्यासू आणि ज्येष्ठ व्यक्ती राष्ट्रवादीने गमविला. हे पक्षाचे फार मोठे नुकसान आहे. आता काही झाले तरी येणार्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय वाटाघाटीत पहिल्यांदा काँग्रेसला विश्वासात घ्यावे लागणार आहे. असे झाले नाही. तर, या गोष्टी जेव्हा थोरात साहेबांच्या कानावर जातील. तेव्हा ज्यांना येणार्या काळात आमदार व्हायचे आहे. त्यांनी प्रथमत: पठार भागावरी 43 हजार मतांची गोळाबेरीज करुनच येथील काँग्रेसला डावलायचे की विश्वासात घ्यायचे. हे त्यांनीच ठरवायचे. कारण, संगमनेरी टोला म्हणजे तो वेळ आल्यानंतरच कळतो. हे नामदारांनी गेल्या विधानसभेच्यावेळी दाखवून दिले आहे.
आता एकंदरीत अकोल्यातील काँग्रेसला नवचैतन्य आले आहे. यापुर्वी दादापाटील वाकचौरे, विकास वाकचौरे, राजाराम वाकचौरे, निखील जगताप, तांबोळी साहेब यांच्यासह काही नावे काँग्रेसमधून चर्चीली जायची. त्यातील काही अँन्टी काँग्रेस जे विखे पाटलांचे समर्थक आहे. मात्र, नावाला काँग्रेसी आहेत. त्यामुळे, दादापाटील यांनी जी काँग्रेस लावून धरली. आता मात्र त्यांच्या दिमतीला सन 2006 साली काँग्रेसला रामराम ठोकणारे मधुभाऊ नवले व मधुकर पिचड साहेबांचे खंदे समर्थक मिनानाथ पांडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते राहणार आहेत. त्यामुळे, येणार्या निवडणुकांमध्ये महायुतीत एकमेकांची तोंडे वाकडी तिकडी झाल्याचे पहायला मिळतील. मात्र, मुंगसा-सापाचे वैर असले तरी एकाच राजकीय बिळात त्यांना आपला संसार थाटावा लागणार आहे.
भाग 2, क्रमश:..
- सागर शिंदे