आजी-माजी आमदारापैकी कोण करतय अवैध धंदे.! आत्मक्लेश नको आत्मचिंतनाची गरज.!



सार्वभौम (अकोले) :- 
              अकोले तालुक्याला एक नवा पायंडा पडून गेला आहे. येथे आजकाल नेहमी दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होताना दिसतो. मात्र, डोळस बुद्धीने याकडे कोणी पहायला तयार नाहीत. वास्तवत: पुर्वी येथे विधानसभेत स्व. यशवंतराव भांगरे आणि सक्रु बुधा मेंगाळ यांची मुळ लढाई होती. त्यात १९७७-७८ साली माजी मंत्री मधुकर यांना हार पत्कारावी लागली. मात्र, पुढे १९८० साली याच एकमेकांच्या वादात पिचड कुटुंबाने आपले इतके मोठे प्रस्त उभे केले की त्यांची गेली ४० वर्षे कोणाला बरोबरी करता आली नाही. त्यानंतर एक नवा कट्टर विरोधी चेहरा समोर आला तो म्हणजे अशोक भांगरे. मात्र, कोणाला पटो ना पटो, पुढे भांगरे आणि तळपाडे यांच्यातील मतभेद पिचड साहेबांना पुरक ठरत गेले आणि त्यातून ते सत्तेच्या वाटेवर अविरत चालते राहिले. अर्थातच येथे देखील दोघांचे भांडण तिसऱ्याचाच लाभ होता. ही इतिहासाची पुनरावृत्ती येथेच थांबली नाही. तर, पुढे एकमेकांनी हातात हात घेतले आणि पिचड कुटुंबाला नामोहरम करण्याचे ठरले. दुर्दैवाने येथे पारंपारिक मधुकर तळपाडे व अशोक भांगरे हे दोन्ही शिलेदार मागे पडले आणि तिघांच्या चौकटीत डॉ. किरण लहामटे यांची वर्णी लागून गेली. म्हणजे, तालुक्याच्या राजकारणात आयत्यावर कोयता हे गणित आजकाल बरोबर बसू लागले आहे. आता  हा सर्व उहापोह मांडायचे कारण तरी काय.! तर आजकाल अकोले तालुक्यात जे जुगार मटके सुरु आहेत. ते नेमके कोणाचे? त्यांना अभय देणारे कोण? हे कार्यकर्ते नेमके कोणाचे? यांच्यावर पोलीस कारवाई करीत का नाही? तालुक्यात जी रोजरोस वाळू सुरु आहे, त्याचा कर्ताधर्ता कोण आहे? कोविडच्या काळात देखील बस स्थानक आणि अन्य परिसरात जो जुगार मटका सुरु आहे त्यांच्याकडून मलिदे कोण जमा करत आहे. शहरात काही ठिकाणी आजही चुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय चालतो, त्या लॉजिंगला अभय कोणाचे ? अगस्ति परिसरात चालणारा गांजा कोणाच्या वरदहस्ताने चालतो.? असे एक ना अनेक प्रश्न ऐरणीवर येतात. त्यावेळी, पुन्हा दुसरा प्रश्न उभा राहतो की, यात ना माजी आमदारांचा हस्तक्षेप आहे, ना आजी आमदारांचा. घेणारे घेतात, करणारे करतात, ज्यांना मलिदे पहोच व्हायचे त्यांना होतात, या सगळ्यात खाकीचे टोपले काही भरायला तयार नाही. तर दुसरीकडे आता जे कोणी नवे पदाधिकारी सत्तारुढ झाले आहेत, त्यांचे आतृप्त आत्मे शांत बसेनासे झाले आहे. त्यामुळे, ते आमदारांचे कान टोचून अवैध धंद्यांचे टुमके लावून देतात आणि जनता बोले राजा हाले अशी परिस्थिती असल्यामुळे, सत्तेत राहून देखील आत्मक्लेश वैगरे करण्याची वेळ उभी राहते. म्हणजे, येथे देखील कारवाई महसूल, पोलीस प्रशासन यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांचे सर्वकाही अलबेले सुरु आहे. या सगळ्यात दोन आजी-माजी आमदार एकमेकांना भिडताना दिसत आहे. या अपरोक्त अकोले तालुक्यातील आरोग्य यंत्रणार कुचकामी ठरली आहे. याकडे दुर्दैवाने फार कमी वेळेनंतर तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
       खरंतर कोणत्याही नेत्याचे बलस्थान हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचे कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते पुर्वी चळवळीसाठी खपले जायचे आणि चळवळीसाठीच ऊभे रहायचे. दुर्दैवाने अशा कम्युनिष्ठ, शेतकरी आणि मार्क्सवादी चळवळी लोप पावल्या आणि कार्यकर्ता हा फक्त आणि फक्त साहेबांची चापलुसी करून स्वत:चे घर भरु लागला. मग, नकळत त्याचे वाळुधंदे, जुगार, मटके, क्लब आणि बरेच काही चाळे समोर येऊ लागले. साहेबांचा माणूस आहे असे म्हणत ट्रॉक्ट्रर आडवायचा नाही, मात्र तो फुकटही सोडायचा नाही. या अजेंड्याखाली मलिद्यांच्या मोठमोठ्या रकमा पुढे आल्या आणि तेरी भी चूप और मेरी भी चूप असे म्हणत एक सक्षम अवैध व्यावसायिक उभा राहिला. त्याने नकळत त्याचे पाय इतके पसरविले की, एक-एक करीत त्याच्या ब्रँच उभ्या राहिल्या आणि तो नकळत वाळुतस्कर म्हणून नावारुपाला येऊ लागला. लोकप्रतिनिधिंचे मोर्चेपाणी आणि आर्थिक पाठबळ याच वरखर्चावर झेपावले जाऊ लागले आणि बोलबोल करता एका नव्या तरुणाचे अवैध धंद्यात पाय रुतले. याच्या हाताखाली वाडी वस्तीतला ड्रायव्हर आणि झोपडपट्टीतले मजूर. मेले काय आणि जगले काय.! सगळं दापलं दडपून जातं. म्हणून तर संगमनेरचे तीन तरुण, अगदी जीवाने गेले पण त्याचे पुढे काय.! देवाला माहित.
         आज अकोले तालुक्यात एका सत्ताधिकारीआमदारास अवैध धंद्याबाबत आत्मक्लेश आंदोलन करावे लागते. हेतर त्यांचेच अपशय म्हणावे लागेल. तालुक्याचा साधा पोलीस निरिक्षक आपल्या नैतिक मागण्या पुर्ण करीत नसेल तर ही आत्मक्लेशाची नव्हे तर आत्मचिंतनाची गरज आहे. डॉ. साहेबांनी या अपरोक्त एक गोष्ट देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जे लोक स्वत:ला राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणतात, त्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे. हे देखील तपासले पाहिजे. डॉक्टरांनी खडकीच्या तरुणाबाबत जी धक्काबुक्की केल्याचे आरोप झाले, त्यानंतर त्यांनी अवैध धंद्यांना चांगलेच अजेंड्यावर घेतले. मात्र, तो प्रश्न त्या एकट्या व्यक्तीचा नसून तो संबंध भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अवैध धंद्यांवर येऊन ठेपला आहे.
       या सगळ्यांमध्ये एक मात्र नक्की. ना आजी आमदार अवैध धंद्यांना पळबळ देतात ना माजी. परंतु, या दोघांच्या भांडणात मात्र, ज्याला कमवायचे आहे. त्यांचे धंदे मात्र जोरात सुरु आहे. प्रशासन देखील तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो. या भूमिकेत आजही हाथ साफ करते आहे. मात्र, त्यांची देखील खदखद आमदार महोदयांनी ऐकूण घेतली पाहिजे. की, गेल्या १ वर्षापासून इतके मोठे पोलीस ठाणे केवळ दोन अधिकारी हताळतात, ३२६ ते ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस कर्मचारी करतात. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख पाहता अकोले पोलीस ठाणे टॉप पाचमध्ये आहे. याकडे देखील आमदार महोदयांनी लक्ष दिले पाहिजे. अन्यथा नुसती धमकीवजा विनंतीच्या आंदलनांनी काही एक साध्य होईल असे वाटत नाही. त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. अन्यथा पुन्हा कोणतरी पेताड येईल, मग शिवीगाळ, पुन्हा लाथाडा-लाथाडी यातच पुन्हा तालुका अस्थिर झाल्याचे पहायला मिळेल.