अनुभवांच्या खजिन्यातील एक निष्ठावंत अदखलपात्र कार्यकर्ता आज राष्ट्रवादीचा खजिनदार...!
सार्वभौम (अकोले) :-
सन 1980 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा आम्ही शालेय जिवणाचे धडे गिरवत होतो. मात्र, राजकारण हे चांगले कळू लगले होते. तेव्हा यशवंत भांगरे, मधुकर पिचड व सक्रु बुधा मेंगाळ यांच्यात चुरस झाली आणि तेव्हापासून पिचडांच्या साम्राज्याने येथे पाय रोवले. तोवर शरद पवार यांच्या कर्तुत्वाची फारशी जाणिव नव्हती. मात्र, त्यानंतर दशरथ सावंत यांच्या सानिध्यात राहून बर्यापैकी चळवळी मी समजून घेत होतो. जेव्हा 31 ऑक्टोबर 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा लोकसभेचे वारे वाहत होते. त्यावेळी नाशिक येथे प्रल्हाद कर्हाड यांना समाजवादी पक्षाचे तिकीट मिळाले होते तेव्हा आम्ही सावंत साहेबांसोबत भाषणे ऐकण्यासाठी अगदी कमी वयात जिल्हाबाहेर जात होतो. दरम्यान हाच काळ महाराष्ट्र विधानसभा देखील होत्या. तेव्हा शरद पवार हे समाजवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. तर राज्यात आय काँग्रेस हा देखील सर्वात मोठा पक्ष अस्तित्वात होता. तेव्हा अकोले तालुक्यातून पवारांनी राजाभाऊ भांगरे यांना उमेदवारी दिली होती. तर मधुकर पिचड हे आय काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. येथे कम्युनिष्ट पक्षाकडून एकनाथ देशमुख यांच प्रचार अॅड. शांताराम वाळुंज यांच्यासारखे निष्ठावंत लोक करीत होते. तेव्हा अगस्ति विद्यालयाच्या मैदानावर पवार साहेबांची मोठी सभा भरली होती. सुदैवाने मला अगदी स्टेजच्या जवळच जागा मिळाली होती. त्यामुळे, मी देखील पवार साहेबांना पाहण्यासाठी फार अतूर होतो. सगळे मैदान खचाखच भरलेले होते. पवार साहेब उठले तोच आम्ही एकाग्रतेने कान लावून त्यांचे भाषण ऐकू लागलो. त्यांचे एक वाक्य माझ्या अगदी काळजात घर करून बसले. ते मला आजही स्पष्ठ आठवते आहे. की, "मी तुमचा भाऊबंद म्हणून शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. शेतकर्यांच्या हिताला बाधा आली तर मी त्या क्षणी अकोल्यात येईल." त्यांचे ते वाक्य माझ्या मनावर कोरले गेले. मी त्या दिवशी पायी-पायी घर गाठले. घरी पोहचताच मी आई-वडिलांना मोठ्या कौतुकाने पवार साहेबांचे बोल सांगू लागलो. तेव्हा मी मनाशी खुनगाठ बांधली होती. की, पवार साहेबांसाठी आता काम करायचे. मात्र, दुर्दैवाने येथे भांगरे यांचा पराभव झाला आणि मधुकर पिचड हे पुन्हा निवडून आले. त्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी आणि पवार साहेब यांच्यात साख्य झाले आणि समाजवादी पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला. तो काळ माझ्या शालेय अभ्यासासह राजकीय अभ्यासाचा देखील होता.
पुढे सन 1985 च्या दरम्यान नेटकेच वसंतदादा पाटील यांचे सरकार पडून शिवाजी निलंगेकर यांनी मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. तर शंकरराव चव्हाण यांनी सन 1986 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे, मधुकर पिचड यांच्यासह सगळ्यांनाच राजीनामे द्यावे लागले होते. मात्र, त्यानंतर 1987 साली भंडारदर्याच्या पाण्याचे आंदोलन पेटले होते. तेव्हाच खर्या अर्थाने माझ्यातील शेतकरी मुलाचे रक्त पेटून उठले होते. त्याकाळी आण्णासाहेब म्हस्के पाटबंधारे मंत्री होते. तर प्रवरेवरील विजपंपाचे कनेशक्शन तोडण्याचे प्रयत्न नेटाने सुरू होते. तेव्हा माजी मंत्री मधुकर पिचड, राजाभाऊ भांगरे, दशरथ सावंत, कॉ. कारभारी उगले, अशी प्रगल्भ राजकीय नेते तालुक्याच्या हितासाठी एका व्यासपिठावर आल्याचे मी पाहिले होते. खरंतर त्याकाळी दशरथ सावंत हे एक प्रगल्भ विचारांचे वादळ इंदोरी व रुंभोडी परिसरात वास्तव्याला असल्यामुळे ही गावे चळवळीच्या नेहमीच केंद्रस्थानी होती. त्यामुळे, मला त्यांच्या सानिध्यात राहण्याचा वारंवार योग येत होता. म्हणून तर त्यांच्यातील प्रखर शब्दांच्या चळवळीचे संक्रमण माझ्यात उतरु लागले होते. त्यावेळी चळवळी ह्या दिवसाच नव्हे तर रात्रीच्या देखील पेटून उठत होत्या. त्या चळवळीनेच प्रत्येकाच्या उरात एक धगधगता ज्वालामुखी भरला जात होता. तेव्हा ज्या अधिकार्यांनी विज तोडली त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही संजय नवले यांच्यासोबत एक ट्रकमधून तालुका पिंजून काढला होता. त्याच वेळी चळवळ आणि चळवळीतले आयुष्य काय असते याची जाणीव मला झाली. कारण, याच ट्रकमध्ये मधुकर पिचड आणि दशरथ सावंत देखील दंड थोपटूप बंड पुकारण्यासाठी मैदानात उतरले होते. हा सर्व प्रकार मी माझ्या उघड्या डोळ्यांनी मोठा अतूर होऊन पाहत होता. जिव गेला तरी बेहत्तर पण आपल्याला देखील अशा चळवळीत उतरले पाहिजे हा आवाज वारंवार अंतर्मनातून येत होता आणि तोच दिवस माझ्यातील चळवळीला जन्म देऊन गेला.
सन 1987 साली प्रचंड मोठे आंदोलन झाले. पाटपाण्याच्या चळवळीला प्रारंभ झाला, खालच्या भागासाठी पाणी मिळावे म्हणून राजकीय विरोध निर्माण झाला तर त्याला मधुकर पिचड आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्य व स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध करून शंकरराव चव्हाण यांना यशस्वी होण्यात अपयशी आले. त्यानंतर सन 1988 साली चव्हाण यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आणि शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. एक प्रखर विरोधक म्हणून आणि पाणी आंदोलक म्हणून मधुकर पिचड यांचा चेहरा पुढे आला. त्यामुळे, त्यांना मंत्रीमंडळात पुन्हा स्थान मिळाले. शरद पवार यांनी त्यांना संधी देत आदिवासी मंत्रीपद दिले. तेव्हा ते एक प्रकारचे पाणी आंदोलनाचे श्रेय्य होते. म्हणून त्यांची तालुकाभर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पाणी वाटबाबत शरद पवार यांनी अकोले तालुक्यासाठी 30 टक्के पाण्याचा वाटा ठेवला होतो.
पुढे सन 1989-90 साली अकोल्यात जनता दलाचे अस्तित्व उदयास आले. तेव्हा मी जुनिअर कॉलेजमध्ये शिकत होतो. मधुकर पिचड यांच्या विरोधात अशोक भांगरे यांची मोर्चेबांधणी सुरू होती. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी दशरथ सावंत यांच्या नावाने जोर धरला होता. सन 1991 विधानसभा तोंडावर आल्या आणि या दोघांनाही प्रस्तापितांच्या विरोधात उमेदवारी मिळाली. तेव्हा खरंतर जनता दलाचे विचार काही पटण्यासारखे नव्हते. मात्र, शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा माझ्यावर कायम होता. एकीकडे दशरथ सावंत यांच्यावरील व्यक्तीप्रेमापोटी संगमनेरात प्रचार करण्याचा विचार तर दुसरीकडे पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मधुकर पिचड यांचा प्रचार. त्यामुळे, मी पिचडांचा प्रचार करुन शक्यती शक्ती पक्षाला लावली आणि ते निवडून देखील आले. मात्र, दुर्दैवाने माझ्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना नेहमीच अदखलपात्र ठेवण्यात आले. त्यानंतर मी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब हांडे यांची भेट घेऊन विद्यार्थी संघटना करण्याचा मी मानस आखला होता. मात्र, मला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तरी देखील एनएसयुआयची स्थापना करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, त्याला देखील मुर्त स्वरुप आले नाही. अखेर प्रकाश नवले यांच्यासारख्या अनेकांनी विद्यार्थी सेनेची तयारी सुरू केली होती. अनिल गायकर, विजय शेटे, रामेश्वर राहणे यांच्या अग्रहखातर पदापेक्षा संघटनात्मक तत्वाला महत्व देण्याचा प्रयत्न केला आणि एनएसयुआयच्या अध्यक्षपदी रावसाहेब शेळके यांची नेमणूक करुन काँग्रेसचे काम नेटाने सुरू केले.
- भाग 2, क्रमश:
- सागर शिंदे