संगमनेरात पकडला चक्क 10 लाखांचा गांजा.! तिघांना अटक, साखळी तपास सुरू.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहर हाद्दीत कटारीया नगर येथे संगमनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रविवार दि. 20 रोजी दुपारी तब्बल 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. जययोगेश्वर दगु गायकवाड (वय 24, मुळ रा. रांजनगाव देशमुख, हल्ली रा. शंकर टाऊनशिप कटारीयानगर, संगमनेर) दिपक सुरेश तुपसुंदर (वय 34, खंडेश्वर मंदिराजवळ, खांडगाव, ता. संगमनेर) व विशाल निवृत्ती आरणे (वय 26, मुळ रा. रांजनगाव देशमुख, हल्ली रा. दिवेकर एजन्सी जवळ मालदाड रोड, संगमनेर) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. काल सायंकाळी झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा राणा प्रतापसिंग परदेशी यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कटारीयानगर या परिसरात काही तरुणांकडे आमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राणा यांना मिळाली होती. त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नरेंद्र साबळे यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एका टिम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस आरोपींच्या घरी गेले असता त्यांनी अंगझडती घेण्याची प्रयत्न केला. मात्र, इतका मोठा डल्ला घरात असल्यामुळे सहाजिकच पोलिसांना त्यांनी नकार दिला. त्यानंतर एनडीपीएस कायद्यान्वये कायदा 1985 कलम 50 (1) नुसार पोलिसांनी त्यांना जाग्यावर नोटीस बजावली. त्यानंतर पोलीस थेट घरात घुसले. घरातील साहित्यांची तपासणी करताना त्यांना किचनच्या कोपर्यात चार गोण्या दिसल्या. त्यात काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: गोण्या उचकून पाहिल्यानंतर त्यात गांज्या असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढण्याच्या आत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान पोलिसांनी सोबत नेलेले पंच, फोटोग्राफर व वजनकाटा यांच्या सहाय्याने सबळ पुरावे जमा करण्यात आले. त्यावेळी त्या गोण्यांमध्ये 1 लाख 84 हजार रुपयांचे हिरवट पाने, काड्या व बिया असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वास असलेला गांजा मिळून आला. तर एक वाजनकाटा, काही छोट्या-छोट्या पिशव्या, चार गोण्या असा 6 लाख 16 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल तर अन्य साहित्य धरुन तब्बल 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.
दरम्यान संगमनेर हे गांज्यांच्या तस्कारीसाठी अगदी पहिल्यापासून प्रख्यात आहे. येथील कसारा दुमाला येथून गेल्या कित्तेक दिवस गांजाची तस्कारी होत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच काय! 2017 साली तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिसांनी 1 कोटी 14 लाख रुपयांचे गांजा पकडला होता. त्यातील बहुतांशी आरोपी हे संगमनेर तालुक्यातील होते. तर यात काही महिला देखील आरोपी होत्या. त्यानंतर या प्रकरणात फार मोठी अफरातफर झाली होती. त्यामुळे, एक पोलीस निरीक्षक व सहा कर्मचार्यांना निलंबित व्हावे लागले होतेे. तर हे कनेशक्शन थेट हैद्राबादशी कनेक्ट होते. यात बडेबडे अधिकारी चौकशीत समोर आले होतेे. मात्र, नंतर त्यावर सगळा पडदा पडला. त्यानंतर आता ही एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. हे कोणाला माल देत होते. कोणाकडून आणत होते, यांचे सबडिलर कोण आहे. यांच्या मागिल कर्ताधरर्ता कोण आहे. याची सखोल चौकशी झाली तर मात्र, हे प्रकरण देखील वेगळे वळण घेऊन शकते. असे पोलीस खात्यातील जानकार लोकांना वाटते आहे.