बाबो.!..अखेर त्या दडून बसलेल्या आरोग्य सेविकेचे निलंबन! उद्यापासून उपकेंद्र उघडणार!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या कुशीत वारंघुशी येथे एक धक्कादायक प्रकार घडला होता. तो असा की, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत वारंघुशीच्या आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील संडास-बाथरुमध्ये दडून बसली होती. त्यानंतर गावातील एका बुजुर्ग महिला सोनाबाई लोटे यांनी गर्भवती महिला मंजाबाई लोटे यांची प्रसुती केली होती. त्यानंतर गावच्या सरपंच अनिता कडाळे व भरत घाणे यांच्यासह अनेकांनी कठोेर भुमिका घेत वारंघुशी येथील उपक्रेंद्रला टाळे ठोकले होते. जोवर या आरोग्य सेविकेवर निलंबानाची कारवाई होत नाही. तोवर रुग्णालयाचे टाळे उघडू देणार नाही अशी ठाम भुमिका मांडली होती. त्यानंतर आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी तत्काळ या मागणिची दखल घेत आरोग्य सेविका संगिता रोकडे यांचा कसुरी अहवाल तयार करुन तो जिल्हा शल्य चिकित्सक मुरंबिकर यांच्याकडे पाठविला होता. तर याबाबत निष्काळजी करणार्या अशा व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे याबाबत रोखठोक सार्वभौमने परखड वृत्तांकन केले होते. तर या घटनेचा पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर आज सायंकाळी संगिता भोसले यांना आजपासून खात्यातून निलंबित केले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, लपून बसलेल्या या सेविकेला आता घरीच बसावे लागणार आहे. या कारवाईसाठी माध्यमांपेक्षा स्थानिक नेते माजी सभापती व सरपंच यांनी भूमिका फार महत्वाची ठरली आहे. त्यामुळे आता वारंघुशी केंद्र पुन्हा खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर आदिवासी समाज्याची हेळसांड कराल तर त्याचे काय हाल होतील याची मोठी प्रचिती सरकारी कर्मचार्यांना मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंजाबाई लोटे ही माय माऊली प्रसुतीच्या असहाय्य वेदना सोसत होती. प्रचंड त्रास होऊ लागला म्हणून गुरूवार दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिने पतीसोबत जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले होते. त्रास सहन होईना म्हणून त्यांनी आरोग्य सेविका यांना आवाज दिला. मात्र, या बाईसाहेबांनी आपल्या मुलीस सांगितले की, आई घरात नाही ती गावात सर्वे करण्यासाठी गेली आहे असे सांग. त्यामुळे एक स्त्री असून देखील ती स्त्रीच्या वेदना समजू शकली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव होते. त्यानंतर सरपंच ताई अनिता संजय कडाळी व माजी उपसभापती भरत घाणे यांनी तत्काळ आरोग्य केंद्र गाठून आरोग्य सेविकेचा शोध सुरू केला होता. मात्र, घर तर उघडेच होते, त्यांची गाडी देखील घरासमोर होती, सर्वे तर एक दिवस आधिच होऊन गेला होता. मग या गेल्या कोठे. मात्र, बाईसाहेबांच्या अवचित स्वभावाला सर्वजन ज्ञात होते. तरी देखील ग्रामपंचायतीच्या शिपायास गावात दवंडी देण्यास सांगितली. त्याने दोन वेळा दवंडी दिली होती. मात्र, झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला कधी जागे करता येते का? त्यामुळे अर्धा तास झाला, तरी देखील सेविका संडासात लपूनच होत्या. ऐकीकडे गर्भवती महिला आपला दुसरा जन्म दान मागत किंकाळा आणि वेदना यांच्यात गुरफटून केंद्रात पडून होती. तरी देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, म्हणतात ना! देव तारी त्याला कोण मारी ! अखेर सरपंच ताईंनी गावातील एक बुजूर्ग आजी सोनाबाई लोटे यांना बोलावून प्रसुती अगदी नॉर्मल केली. त्यानंतर मंजाताईने अगदी सुंदर व गोंडस मुलीला जन्म दिला होती.
दरम्यान, सेविका बाईसाहेब नेमकी कोठे गेल्या याची माहिती घेण्यासाठी महिला सरपंच आणि काही ग्रामस्थ आरोग्य सेविकेच्या घरात घुसले. मुलीस विचारणा केली असता तिने तोच पाढा पुढे वाचला, आई गावात सर्वे करण्यासाठी गेली आहे. मात्र, त्यांनी घरातील कानाकोपरा तपासला, तेव्हा संडासात ह्या आरोग्य सेविका मिळून आल्या. त्यानंतर मात्र, गावकर्यांची तळाची आग मस्तकात गेली होती. नंतर या आरोग्य सेविकास बाहेर काढून त्यांचा सामाचार घेण्यात आला होता. इतकेच काय! जोवर या महिलेचे निलंबन होत नाही. तोवर त्यांनी आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले होते. त्यानंतर आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभिरे यांनी कोविडच्या काळात देखील वेळ काढून या ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला होता. दरम्यान त्यांनी संबंधित महिलेस शो कॉझ नोटीस (कारणे दाखवा) काढली होती. त्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी संगिता रोकडे यांचा कसुरी अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे पाठविला होता. त्याची अवघ्या चार दिवसात दखल घेण्यात आली व आज सायंकाळी या महिलेस निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, आदिवासी समाज्यास लुटणार्यांना एक प्रकारे हा जरब बसला आहे. जर एकजूट असेल आणि आपल्या मागणीवर आपण ठाम असू तर त्याचा काय परिणाम होतो. याची प्रचिती या निमीत्ताने आली आहे. आता उद्यापासून वारंघुशी उपकेंद्राचे दरवाजे खुले होणार आहे. मात्र, यापुढे जर कोणी अशी कुचराई करेल तर त्याच्यावर अशाच पद्धतीने कारवाई करण्यासाठी दंड थोपटले जाईल. अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
- अकाश देशमुख
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 430 दिवसात 740 लेखांचे 94 लाख वाचक)