जवान आणि किसानांचे बलिदान ठरतेय व्यर्थ.! सेलिब्रिटीच झालेत राजकारणाचे नायक - मधुकराव नवले

विशेष लेख :- 

पुर्वी राजकारणाला एक संस्कृती होती तर राजकारण्यांना संस्कार. त्यामुळे, कोणी कोणाचा अवमान करताना हजारदा विचार करीत असे. तसेच प्रत्येक पदाला एक दर्जा होता. काही प्रोटोकॉल्स होते. म्हणून तर राज्यात राज्यपालांची भेट मिळणे किंवा घेणे ही सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अतिमहत्वाची विशेष घटना मानली जात होती. या भेटीचा सबंध राज्यातील ज्वलंत व जिवंत समस्येवर मार्ग काढण्यासाठी असायचा. मात्र, अलीकडे राजभवनाचा दरवाजा सामान्य व्यक्तीसाठीही खुला झालाय, अर्थात ही लोकशाही देशातील समाधानाची बाब आहे. की, राजभवन लोकाभिमुख झाले. कंगना या अभिनेत्री असलेल्या सामान्य व्यक्तीलाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा पुरवू लागलेय. यावरही आमची मुळीच हरकत नाही. अपेक्षा इतकीच आहे की, रानात शेळ्या चारायला गेलेल्या ग्रामीण भागातील गरीबांच्या लेकीबाळींवर देखील अत्याचार होतात त्यांना मात्र वाय दर्जाच काय! इतर कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. प्रवासात अगर निर्जनस्थळी महिला वासनांध नरपशुंच्या बळी ठरतात त्यांनाही किमान सुरक्षितपणाची हमी मिळत नाही. रानात वाघांच्या भीतीपोटी शेती करणे शक्य राहिले नाही. 

 तरीही शेतकर्‍याला जिवितासाठी संरक्षण मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय, कितीतरी महिला-पुरुप अन्याय किंवा अत्याचारग्रस्त होऊन मृत्युमुखी पडतात. त्यांच्या मृत्यूची सुशांतसिंग या अभिनेत्याच्या मृत्यूइतकी सखोल चौकशी होत नाही. शेतकरी किंवा जवानांच्या मृत्यूची सुशांतसिंगच्या मृत्यूइतकी गंभीर बातमी मिडियासाठी होत नाही. चीनविरोधात आज जवान लढतात, नेहमीच सीमा सांभाळताना ते हौतात्म्य स्वीकारतात. त्यांचे बलीदान सेलिब्रिटी इतके गंभीरपणे घेतले जात नाही. त्यांच्या वीरपत्नीची व मुलाबाळांची सरकार अगर राजभवनाला कधी आठवण येत नाही.गरीबांच्या झोपड्या उध्वस्त होतात, शेतकर्‍यांचे शेतातील उभे पिक व सारा संसार पुराच्या अगर अतिवृष्टीच्या पाण्याखाली जातो तेव्हा केंद्र सरकार अगर मंत्री प्रत्यक्ष साधी सहानुभूतीही दाखवित नाही. सेलिब्रीटींची मात्र फारच काळजी. शेतकरी, कामगारांचे आंदोलन बळाचा वापर करून दडपले जाते तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी झाल्याचे ऐकीवात नाही. सेलिब्रिटीच्या सुरक्षेवरून राष्ट्रपती राजवटीची मात्र चर्चा होते. असे का होते, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. 

अर्थात त्यांचे उत्तर साधे सोपे व सरळ आहे. यापैकी कोणाला काहीच महत्वाचे वाटत नाही. कारण, हे कुणीही सेलिब्रिटी नाहीत. अन्नधान्य निर्माण करणारा कोटींचा पोशिंदा असलेला कष्टकरी हा सेलिब्रिटी नाही तर सामान्य शेतकरी आहे. सीमेचे रक्षण करणारे व देशासाठी कामी येणारे जवान यांचे स्थान उच्च प्रतिष्ठीत किंवा सेलिब्रिटी इतके मोठे सरकारला वाटत नाही. राजकारणाचा स्तर उंचावला की धनिक धार्जीना झाला? गरीबांसाठीचे राजकारण संपले का? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. कोट्यावधींचा आर्थिक खेळ खेळणारे सेलिब्रीटी व कफल्लक किसान आणि जवान यांचे स्थान सरकार दरबारी सारखे आहे, असे मात्र दिवस नाही. यांना समान लेखणे हा तर विद्यमान राजकीय स्थितीत राजद्रोह ठरेल. 

देशाच्या अखंडतेसाठी वीरमरण स्वीकारणार्‍या इंदिरा गांधी किंवा तत्सम राजकारणी कुठे तर राज्या-राज्यात वाद व दुस्वास पेरणारे आजचे राजकारणी कुठे... विहार विरुद्ध महाराष्ट्र, महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल ही राजकीय अखंडता राष्ट्रीय अखंडतेपेक्षा अधिक मोलाची आहे? कोरोनापेक्षा सेलिब्रिटींचे हित सांभाळणे अधिक महत्वाचे झालेय? महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढले व कामी आले ते 105 हुतात्मे आता विस्मृतीच्या गर्तेत गेले. महाराष्ट्रभूमीवर चिखलफेक करून महाराष्ट्राचा अवमान करणारी एक सेलिब्रीटी चित्रपटाबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचीही नायिका होऊ शकते. दोष सेलिब्रिटीचा की राजकारण्यांचा? राजकारणा... तुझे रूप न्यारे... तुझा रंग न्यारा... जनता जनार्दन फक्त उरलेत मतदान यादीवर. मतदारराजाचे मत मिळविणे हे तर आता राजकारणातील प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न किंवा समाजासाठी अखंड काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे काम राहिले नाही. नागरिकांच्या लेखी तो तर राजकारणातला एक मूर्खपणा ठरलाय. घुसमट सहन करीत ठेवीले राजकारणे तैसेची रहावे इतकेच कार्यकर्त्यांच्या हाती उरले आहे! 


- मधुकरराव नवले (अकोले)

(8888975555)