प्रखर हिंदुत्वाचा लोकमान्य ज्वालामुखी शिवाजीराजे धुमाळ.! एक संघर्षमय प्रवास....
सार्वभौम (अकोले) :-
सन 1963 साली धुमाळवाडीच्या मातीत एका नव्या पर्वाच्या इतिहासाने जन्म घेतला होता. कारण, एका विडी कामगाराच्या घरात रोजच्या रोजीरोटीसाठी संघर्ष करणारा एक सामान्य व्यक्ती, त्यांच्या घरात राजे जन्माला आले म्हणून मोठ्या आनंदाने गावाला गोड तोंड करून रामाभाऊ आपला "हर्ष" व्यक्त करीत होते. घरी कितीही दारिद्र असो मात्र, आयुष्यात खचायचे नाही, संकटाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढायचे हेच "बाळकडू" त्यांनी पिढीजात घेतले होते. आता तेच पुढे संक्रमीत करण्यासाठी रामभाऊ यांनी आपल्या लेकरामध्ये ऊद्याचे स्वप्न पाहिले होते. घरी पाच एकर जमीन पण मुबलक पाणी नाही, पत्नीची साथ आणि रोज विड्यांशी संघर्ष यातून कसोटीचा संसार सुरू होता. मात्र, रामभाऊ परिस्थितीने जरी गरिब असले तरी विचारांची श्रीमंती त्यांच्या उरात टच्चून भरलेली होती. कुसुमाग्रजांच्या शब्दांप्रमाणे "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा.!" अर्थातच त्यांच्या आयुष्यात फार संकटे आली मात्र, त्यांनी लढणे सोडले नाही. आपला धर्म, संस्कृती आणि छत्रपती शिवरायांनी दिलेली उर्मी हीच त्याकाळी प्रत्येकाला उर्जा देऊन जात होती. म्हणून तर आज अठ्ठावन्न वर्षापुर्वी त्यांच्या वडीलांनी त्यांचे नाव "शिवाजी" ठेवले होते. त्याहून त्यांचा आदर्श आणि आपल्या मुलाने काय व्हावे! याचा प्रत्यय येतो.! आज आनंदाने सांगावेसे वाटते की, वडिलांनी आपल्या मुलात छत्रपती शिवाजी राजांचा "निष्ठावंत मावळा" होण्याचे प्रतिबिंब पाहिले होते. तर मुलाने असे कर्तुत्व कमविले की जनतेने त्यांना "राजे" ही उपाधी दिली. म्हणून खर्या अर्थाने ते आज "शिवाजीराजे" म्हणून ओळखले जात आहे.
सन 1969 साली धुमाळवाडीच्या मराठी शाळेतून एका "वक्तृत्ववान" शैलीच्या जडण घडणीला सुरूवात झाली. पाहिल्यापासून "नेतृत्वगुण" अंगी असणारा हा बालक मुळत: अनेकांच्या नजरेत भरत होता. शाळेतील "मॉनिटर" पदापासून ते अभ्यासातील "गुणवत्तेपर्यंत" त्यांच्यातील "कलागूण" कोठे लपले नाही. कोण काय म्हणेल यापेक्षा मला हे वाटते आणि मी त्यावर ठाम आहे. असेच काहीसे परखड व्यक्तीमत्व 5 वी ते 10 वीसाठी अगस्ति विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, त्याकाळी जो विद्यार्थी याच विद्यालयाच्या मैदानात आपले हात जोडून उभा रहात असे आज त्याच मैदानात त्याच विद्यार्थ्यांचे कौतुक नितीन बानगुडे पाटील यांच्यासह त्यांच्या शिक्षकांनी केल्याचे आपल्याला पहायला मिळाले आहे. (सुवर्णमोहत्सवी वर्ष) ते ही ज्या तालुक्याने त्यांच्या संघर्षाचा इतिहास पाहिला आहे. त्याच अकोलेकरांनी सगळे मैदान गच्च भरुन गेले होते. येथील 10 वीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शिवाजीराजे 11 व 12 च्या उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी अगस्ति महाविद्यालयात दाखल झाले. येथे खर्या अर्थाने त्यांच्या "सामाजिक चळवळीचा प्रारंभ" झाला होता. तेव्हा 1972 साली जे महाविद्यालय उभे राहिले होते. त्याच्या नामांतराचा लढा सुरू होता. तेव्हा शिवाजी राजे आक्रमक होऊन आंदोलनात उतरले होते. काहीही झाले तरी महाविद्यालयाला "अगस्ति महाविद्यालय" म्हणून संबोधले जावे यासाठी त्यांनी रस्त्यावरची चळवळ उभारली होती. तर दुसरीकडे "दादासाहेब रुपवते" यांचे नाव देण्यासाठी "आंबेडकरी चळवळ" रस्त्यावर आली होती. तेव्हा खर्या अर्थाने तालुक्याच्या "वैचारिक आणि पुरोगामी" विचारांचे दर्शन घडले. त्यावेळी कोणीही जास्त अतिरेक केला नाही. अखेर "अगस्ति कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले" असे नाव रुढ झाले. या चळवळींसह फी माफी, परिक्षा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी राजे धुमाळ यांनी सगळी व्यवस्था अंगावर घेतली. मात्र, कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्यातील राजे अगदी "डरकाळी" फोडून जागे होत असे.
येथील शिक्षण पुर्ण झाले. त्यामुळे, पुढील अभ्यासक्रमासाठी त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. खरंतर कोल्हापुरच्या तालमीत "आखाड्यातील पैलवान" तयार होतात. मात्र, शिवाजी राजे एका "राजकीय आखाड्यातील कट्टर हिंदुत्ववादी पैलवान" तयार झाले. तेथील मेडिकल डिप्लोमासह त्यांनी आयुष्याचे अनेक "डावपेच" अंगिकृत केले. खरंतर "हिरा कोळशाच्या खाणित जरी असला, तरी तो त्याचा गुणधर्म सोडत नाही." अगदी हे व्यक्तीमत्व देखील तसेच होते. कोणाची गुलामी सहन करायची नाही, कोणापुढे स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही, विनाकारण कोणापुढे झुकायचे नाही. हेच तत्व त्यांच्या आयुष्याला वेगळा आयाम देऊन गेले. कोल्हापुरात देखील एक "शिवाजी" नावाचा विद्यार्थी "राजासारखाच जगला" आणि "वाघासारखा गरजला." खरंतर छत्रपती शिवरायांचा त्यांच्यावर फार मोठा पगडा असल्यामुळे "हिंदुत्ववाद" आणि भगव्याशी त्यांची विद्यार्थी दशेपासूनच "आगाध श्रद्धा" होती. त्यामुळे, धर्मासाठी "मोडेल पण वाकणार नाही." हीच भुमिका घेऊन ते आयुष्याला सामोरे जात होते. कॉलेज जिवनात देखील त्यांनी स्वत:ची एक नवी ओळख आणि "कट्टर हिंदुत्व" अशी एक प्रतिमा तयार केलेली होती. त्यामुळे, शिक्षणानंतर त्यांचे मन नोकरी आणि व्यावसायात रमेल असे कोणालाच वाटत नव्हते. म्हणून तर कोल्हापूर सोडल्यानंतर त्यांना लगेच "संगमनेर साखर कारखाण्यात नोकरी" लागतली. मात्र, या "संकुचित" जगण्यात त्याचे मन रमले नाही.
दरम्यान सन 1982 साली शिवाजीराजे धुमाळ यांच्यासह समविचारी तरूणांनी एक "जयमहाराष्ट्र" संघटना सुरू केली. "प्रखर हिदुत्वावर" काम करण्यासाठी त्यांनी तेव्हापासून सुरूवात केली. हे काम सुरू असताना त्यांच्यावर "हिदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" यांचा प्रचंड प्रभाव पडला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 1984 साली त्यांनी अकोले शहर प्रमुख म्हणून हातात "शिवबंधन" बांधले आणि भगवा झेंडा हाती घेत एखाद्या "दक्षिणी घोड्याप्रमाणे" त्यांच्या भगव्या रक्ताची "घोडदौड" सुरू झाली. खरंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्याकाळी आपल्या शेजारी नारायण गाव येथे "साबीर शेख" नावाचा "मुस्लिम युवक" जो बाळासाहेब ठाकरे यांचा "निष्ठावंत आणि कट्टर हिंदुत्ववादी."! नारायणगावचा असून देखील त्यांना शिवसेनेने कल्याण येथून तिकीट दिले व आमदार केले होते. त्यांच्या हास्ते शिवाजी राजे धुमाळ यांनी अकोल्यात शिवसेनेची शाखा सुरू केली. तालुक्यातील हे "भगवं वादळ" त्या दिवसापासून सुरू झाले. तर सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात, डोंगराच्या कडे-कपारीत आणि पाड्यापासून तर वाड्यापर्यंत भगवा ताट मानेनं अकोलेकरांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचेच फलीत म्हणून आज खर्या अर्थाने अकोले तालुक्यात शिवसेनेची जी ताकद उभी आहे. तर ते "शिवाजीराज्यांचे योगदान" आहे.
अर्थात आजप्रमाणे तेव्हा पदाला चिकटून राहण्याचा मोह कोणाला नव्हता. तेव्हा कामासाठी पदे वापरली जात होती. राजे अकोल्यातील माती रोज मायाखाली घालुन भगव्याचे ईमना राखत तालुक्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर लढत होते. म्हणून तर त्यांनी अवघ्या काही दिवसात "अकोले तालुकाअध्यक्ष" पदावर नियुक्त केले गेले. म्हणजे त्यांच्या कर्तुत्वाचा वेग एखाद्या गरुडाने जमिनीकडे धाव घ्यावी इतके प्रचंड होता. याच दरम्यानच्या काळात जेव्हा कोतुळ येथील डीएड कॉलेजचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार होते. त्यावेळी धुमाळ यांनी तब्बल 11 दिवस उपोषण करुन तो प्रश्न मार्गी लावला होता. तेव्हा "विलासराव देशमुख" शिक्षणमंत्री होते. त्यांनी स्वत: या उपोषणाची दखल घेत तेथील विद्यार्थ्यांची नगर येथे शिक्षणाची सुविधा केली होती. खरंतर शिवाजी राजे आणि मोर्चे, आंदोलने, उपोषण, अधिकार्यांवर ताशेरे, जाब विचारणे, शिवसेना स्टाईलने धडे शिकविणे यांसाठी ते माहिर झाले होते. त्यामुळे, चार वर्षाच्या काळात त्यांनी अकोले तालुक्यात "गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक" इतका प्रचार आणि प्रसार केला होता. त्यामुळे, त्यांच्या कामाला कोणी अदखलपात्र ठरवेल असे शक्यच नव्हते. म्हणून तर चार वर्षानंतर पुन्हा शिवाजी राजे शिवसेनेचे "जिल्हाप्रमुख" झाले. त्यानंतर मात्र, काल तालुक्यात न्यायासाठी हैदोस घालणारा तरुण आता जिल्हाभर नावारुपाला आला होता.
शिवाजी राज्यांच्या कर्तुत्वाचा काळ हा तोडक्या शब्दात बसविणे अशक्य आहे. आहे. मात्र, जेव्हा ते जिल्हाध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे भाषण म्हटले की, अकोले तालुक्यातील सह्याद्रीतून फुटलेली ती एक "वाघाची डरकाळीच" असायची. त्यांच्या काळात पुनर्वसन, शेती, मजूर, विद्यार्थी, कामगार, शेतमाल अशा अनेक प्रश्नांना वाचा फुटत होती. कोपरगाव येथे तर त्यांनी कारखान्या प्रश्नी कोल्हे व काळे यांची तिरढी बांधून चक्क "अंत्ययात्रा" काढली होती. त्यावेळी 10 हजार शिवसैनिकांनी मोठे "जनआंदोन" उभे केले होते. त्यावेळी. तो विषय राज्यभर प्रचंड गाजला होता. तर सन 1990 ते 91 साली शिर्डी संस्थानातील कंत्राटी कर्मचार्यांना कायम करून घेण्यासाठी सर्वात मोठा संघर्ष उभा करणारा हा कट्टर शिवसैनिक होता. जो केवळ "जनतेच्या न्यायासाठी" पछाडलेला होता. इतकेच काय! त्यानंतर जिल्ह्यावर धुमाळ यांची इतकी पकड होती की, त्यांचे नाव घेतले तरी नंतर जनसामांन्यांची कामे होऊ लागली होती. हाच रिपोर्ट वरती "मातोश्रीवर" जात होता. म्हणून तर बाळासाहेब ठाकरे यांनी राजेंच्या पाठीवर हात ठेऊन शब्बासकी देत त्यांच्या बाहुत "दहा हात्तीचे बळ" भरले होते. त्यामुळे, हा वाघ कधी कोणाला घबरला नाही. खरंतर सन 1997 साली जेव्हा "निळवंडे धरणाची पायाभरणी" करायची होती. तेव्हा राज्यात शिवसेनेचे सरकार होते. त्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांना जेव्हा बोलविण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले होते. आमचे शिवसेनेचे "जिल्हाध्यक्ष शिवाजी धुमाळ" यांच्या हास्ते पायाभरणी करुन घ्या. तेव्हा, तो एक प्रसंग त्यांच्यासाठी नक्कीच "ऐतिहासिक" राहिला आहे. कारण, हे "मोठेपण" फुकट नाही. की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजेंना त्या शुभ कामासाठी पात्र ठरविले होते. तेव्हा तो सोहळा राजेंच्या हस्ते पार पडला होता. मात्र, तुम्हाला अभिमान वाटेल की, शिवाजीराजे धुमाळ यांनी कोणत्याही गोष्टीचे "मोठेपण" गाजविले नाही. जेव्हा याच निळवंडे धरणाच्या वेळी स्थानिक "शेतकर्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा" समोर आला होता. तेव्हा धुमाळ साहेबांनी खमकी भुमिका घेतली होती. येथे आमची "रक्तरंजित क्रांती" झाली तरी बेहत्तर मात्र, आमच्या "शेतकर्यांना न्याय" मिळाला पाहिजे. तेव्हा सरकारने बळाचा वापर करीत त्यांच्यासह 400 जणांना जेलमध्ये टाकले होते. त्यात 150 महिला देखील होत्या. त्या आंदोलनाने एक "इतिहास रचला" की, तेव्हा सर्वांनी जामीन नाकारला आणि तब्बल 10 दिवस हे सर्व लोक येरवाडा जेलमध्ये ढांभले गेले. मात्र, त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.
म्हणजे, राजे हे नाव काही फुकट लागले नाही. त्यासाठी प्रचंड "प्रयत्नांच्या पराकाष्टा" झेलाव्या लागल्या आहेत. म्हणून तर म्हणतात, "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण." हे "राजेपण" असेच प्राप्त झालेले नाही. त्यासाठी फार "टाक्यांचे धाव" शिवाजी राजे धुमाळ यांनी सोसले आहे. त्यानंतर सलग 14 वर्षे या जिल्ह्यात या शिवसैनिकाने डरकाळ्या फोडल्या. मात्र, एक वेळ आणि आली. की, त्यांचे मोठेपण अनेकांच्या डोळ्यात सलत राहिले. त्यामुळे, थेट मुंबईहून सुत्रे हलू लागली. मात्र, "मोडेल पण वाकनार नाही." ही ओळख शिवाजी राज्यांची होऊन गेली होती. त्यामुळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख यांच्यासमोबत होणारा वारंवार वाद केवळ हेच कारण त्यांना शिवसेनेच्या भगव्यापासून अलिप्त करुन गेले. पक्षांतर्गत वादातून त्यांनी हातातील शिवधनुष्य काढले आणि मोठ्या जड अंत:करणाने शिवसेनेला रामराम केला.
सन 2005 साली राजे "शिवसेनेच्या गडाहून खाली" आले आणि त्यांनी "राष्ट्रवादीत प्रवेश" केला. येथील पुरोगामी विचारधारेशी मिळते-जुळते घेत सन 2006 साली त्यांनी अगस्ति दुधसंघावर "चेअरमन" म्हणून संधी मिळाली. तेव्हा खर्या अर्थाने गेल्या 32 वर्षाच्या कालखंडात त्यांनी शेतकर्यांना "1 रुपया रिबीट" दिले. तर चार कोटी कर्ज आणि चार कोटी उचल असे "आठ लाख" रुपये शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळेच तर 40 हजार लिटरचे दुध 75 हजार लिटरवर जाऊन पोहचले. राजेंनी त्यांच्या काळात दुधसंघाचे "बायप्रोडक्ट" सुरू केले. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या शाखा दिल्या. "अगस्ति मिनरल वॉटर" या प्रोजेक्टचा प्रयत्न केला. खरंतर राजकारणापलिकडे समाजसेवा, एक पक्ष, हिंदुत्ववाद आणि तत्वनिष्ठ राजकारण यांच्यामुळे 50 ते 60 केसेस त्यांनी अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे, हा प्रवास कसा असेल हे आता नव्याने सांगायला नको. मात्र, काहीही झाले तरी "हिंदुत्व" आणि "शिवाजी राजे" ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे, सन 2014 साली नरेंद्र मोदी यांनी "हिदुत्वाच्या मुद्द्याहून" अनेकांना साद घातली आणि राजे भाजपमध्ये दाखल झाले. ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. आज अनेकांनी भाजप सोडली. मात्र, शिवाजी धुमाळ हे अजुनही तेथेच आहेत. त्यांनी गेल्या आयुष्यात जे काही कमविले आहे. ते म्हणजे "शिवाजी" नावाच्या सोबत जे "राजे" नाव लागते. ती खरी "आयुष्याची गोळाबेरीज" आहे. कारण, "महात्मा, लोकमान्य, कर्मविर, धर्मविर" अशा "उपाध्या" सहज जनता कोणाच्या पदरात टाकत नाही. त्यासाठी आयुष्य वेचावे लागते. तेच आयुष्य शिवाजी राजे धुमाळ यांनी जनतेसाठी वेचले. म्हणून ते "लोकमान्य राजे" झाले आहेत. आयुध्यात राममंदिर होण्यासाठी आपले प्राण देखील न्योछावर करु पाहणाऱ्या या "सह्याद्री पुत्राला" वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा.!
- सागर शिंदे
8888782010
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 450 दिवसात 730 लेखांचे 93 लाख वाचक)