मुलास गजाने मारहाण करीत त्याने तिचे धुणेच ओढ्यात फेकून दिले, चौघांवर गुन्हा दाखल.!
अकोले तालुक्यातील गणोरे येथे एक महिला ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेली असता हा ओढा आमचा आहे. असे म्हणत तिचे धुणेच ओढ्यात फेकुण दिल्याची घटना बुधवार दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. तर संबंधित महिलेच्या मुलास गजाने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तो अकोले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. यात पंकज कैलास भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ गोविंद आहेर, स्वाती नवनाथ आहेर, गोविंद शंकर आहेर व चंद्रभागा गोविंद आहेर (सर्व. रा. गणोरे, ता. अकोले) यांनी आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंकज भालेराव यांच्या मातोश्री बुधवारी त्यांच्या जवळच्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी नवनाथ आहेर हा तेथे आला व त्याने संबंधित महिलेस दमदाटी सुरू केली. हा ओढा आमच्या मालकीचा आहे. तुम्ही या ओढ्यावर यायचे नाही. असे म्हणत शिवीगाळ केली व त्या महिलेची बकेट ओढ्याच्या प्रवाहात फेकून दिली. त्यावेळी या महिलेने मोठ्याने आरडाओरड केली असता त्यांचे पती व आजी हे तेथे धावत पळत गेले. दरम्यान त्यांनी आरोपी यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी नवनाथ आहेर याने संबंधित महिलेला ढकलून दिले तर कैलास यांना शिवीगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की केली. दरम्यान आरोपींनी पंकज यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपींनी त्याला लोखंडी गजाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे.=
दरम्यान हा प्रकार सुरू असताना आरोपी स्वाती नवनाथ आहेर, गोविंद शंकर आहेर व चंद्रभागा गोविंद आहेर तेथे आले असता त्यांनी कैलास भालेराव यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर यात पंकज भालेराव यांच्या उजव्या पायाला लोखंडी गजाने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी जबाब दिल्यानंतर संगमनेर पोलीस ठाण्यातून ते टपालाद्वारे अकोले पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गोराणे करीत आहेत.