साहेबांच्या संगमनेरात कोरोना भारी, भोंगळ कारभारामुळे गाठली एक हजारी! आता तरी लावा प्रशासकाची हजेरी.! अन्यथा मोजत बसा आकडेवारी!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरात अगदी कोणाचेही वर्णन करायचे असोत, त्याला "अतिशयोक्ती" किंवा "रुपक" अलंकाराची जोड देत म्हटले जायचे की, "सौ से भारी, एक संगमनेरी" असे अभिमनाने आणि स्वाभिमानाने गौरव उद्गार काढले जायचे. मात्र, त्याच तालुक्यात एक ना दोन तब्बल कोरोनाचे "एक हजार रुग्ण" मिळून आले आहेत. त्यामुळे, "अब संगमनेर हारी, यहा कोरोनाकी हजारी" असे म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे, भल्याभल्या संकटांना तोंड देताना ना येथील प्रशासन भारी भरले ना, येथील राजकारणी आणि समाजसेवक. त्यामुळे, एका तालुक्यात एक हजार रूग्ण सापडावेत! ते देखील तालुक्यात दोन आमदार आणि मंत्रीपद तसेच एकहाती सत्ता असताना! ही फार शोकांतीका आहे असे बोल आता संगमनेरकरांच्या सुज्ञ नागरिकांच्या तोंडातून बाहेर पडू लागले आहे. आता यात भलेही 776 रुग्ण बरे झाल्याचा कांगावा केला जात असेल. मात्र, त्यात काय? कोणती लस आणि जालिम गोळ्या यावर उपाय आहे? जो पॉझिटीव्ह होतो तो पुन्हा घरी जातोच! हे आता नैसर्गिक चक्र प्रत्येकाच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे याला आता सामान्य नगारिक घाबरत नाही. तर, ज्याचे खिशे भरलेले आहेत. ज्यांच्या पॉलिशा आहेत. त्यांनाच कोरोनाची भिती आहे. अन्यथा हातावर पोट भरणारा त्याच्या कामाला कधीच लागला आहे. त्यामुळे, संगमनेरने विशेष असे काय केले? येथील प्रस्तापितांनी प्रतिबंधासाठी काय केले? केले तर ते काम कोठे गेले, त्याचा "रिझल्ट" काय? असे एक ना अनेक प्रश्न आता पुढे येऊ लागले आहेत. खरंतर एका तालुक्यात चक्क एक हजार कोरोना बाधितांचा आकडा आणि कागदोपत्री 22 मयत! असा आहे, तर इतका आकडा तर अनेक जिल्ह्यांचा देखील नाही. त्यामुळे, येथे निव्वळ "बोलाचा भात अन् बोलाची कढी" असाच काहीसा प्रकार आहे की काय! अशी टिका होऊ लागली आहे.
खरंतर संगमनेरचे दुदैव आहे की, ऐवढ्याशा तालुक्यात एक हजार दोन रुग्ण मिळून यावेत आणि 22 रुग्णांचा कोरोनाने बळी जावा. मग येथील यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी नेमके काय करीत होते? असा सहज प्रश्न बाहेरच्यांना पडतो. वास्तवत: येथे पहिल्यापासून महसूल आणि पोलीस यांच्यात कधीही ताळमेळ दिसला नाही. कधी पोलीस महसुलचे काम करताना दिसले तर कधी महसूल पोलिसांचे काम करताना दिसले. त्याचा परिणाम असा झाला की, चक्क पोलिसांना महसूल कर्मचार्यांनी दांड्याने मारले तर त्याची भडास म्हणून महसुलच्या अधिकार्यांवर पोलिसांनी कोविड १८८ चे गुन्हे दाखल केले. म्हणजे हा एकमेकांचा द्वेष नेहमी समोर आल्यामुळे त्यांच्यात अगदी आजवर कधीही समन्वय दिसून आला नाही. खरंतर ग्रामीण भागात महसूल विभागाने फार काम केले. त्याचे रोल मॉडेल म्हणून कुरण गाव समोर ठेवता येईल. मात्र, शहराचे काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल! पण, सगळा तालुका एका बाजुला आणि एकटे शहर एका बाजुला इतके रूग्ण अवघ्या शहरात मिळून आले आहेत. मग नगरपालिका काय करत होती? भलेभले बॅनर, भोंगे आणि पत्रकं यांच्या आधारावर जनजागृती झाली. मात्र, त्याचा रिझल्ट काय आला? हे सर्वांच्या समोर आहे. म्हणजे 24 मार्च ते आज 10 ऑगस्ट या 139 दिवसात एक हजार दोन रूग्ण आणि 22 मयत ही फक्त कागदावर असणारी आकडेवारी आहे. बाकी वास्तव यापेक्षा भयानक आहे. त्यामुळे, ही हजारी ओलंडण्याला कारणीभूत कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
त्यामुळे, जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री तसेच मंत्री महोदय यांनी आज संगमनेर तालुक्याच्या हितासाठी थोडा का होईना कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. किमाण शहरात तरी काही दिवस एखादा सक्षम प्रशासक नेमला पाहिजे. आता कोरोना बाधितांची संख्या मोजने अपेक्षित नाही, तर त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरज आहे. संगमनेरातील गल्लीबोळं सील करण्याची गरज नाही, तर शहर खुलं करुन काही नियम अटी आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. वास्तवत: येथे नागरिक फार संदिग्ध आणि द्विधा मनस्थितीत आहे. कोरोना खरोखर आहे का? येथून नागरिकांचा प्रश्न पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे, येथे सक्षम प्रशासक, अभ्यासक आणि सामाजशिल अधिकार्यांची गरज आहे. मालेगाव प्रमाणे येथे काही अधिकार्यांची नेमणूक केली तरच येथील जनतेचा श्वास मोकळा होऊ शकतो. अन्यथा रोजरोजचे आकडे कानावर पडून लोकांची मानसिकता वेदनेकडे घेऊन चालली आहे. त्यामुळे, नगरपालिकेचा कारभार चालुद्या! फक्त येथे आयुक्त दर्जा किंवा आयपीएस दर्जाचा अधिकारी थोडे दिवस आला तर येथील निर्ढावलेली यंत्रणा, बेजबाबदार नागरिक आणि सध्या चाललेला सावळा गोंधळ हा बंद होऊन संगमनेर पुन्हा सुस्थितीत येईल. अन्यथा रुग्णांच्या नावाखाली शहरभर खिसे भरण्याची कामे सुरूच राहतील, काही डॉक्टरांचा मनमानी कारभार समोर येतच राहिल अशा अनेक कारणांमुळे येथील रडगाणं सुरूच राहिल. मात्र, कोरोनाची घोडदौड थांबणार नाही. हे शासन व प्रशासनाने विसरु नये. मात्र, फक्त काही दिवस मालेगावचा धडा येथे गिरविला तर तालुक्याला पुन्हा नवचैतन्याचे रूप येईल. अन्यथा येथील राजकीय प्रतिष्ठा जपण्याच्या नादात येणारी कित्तेक दिसव रोज असेच भलेभले आकडे कानावर पडत राहतील. यात तिळमात्र शंका नाही असे येथील सामान्य जनतेला वाटते आहे.
आता साळीवाडा संगमनेर येथे 50 व 53 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 48 व 30 वर्षीय महिला तर अवघ्या 3 वर्षीच्या बालिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर याच ठिकाणी 6 वर्षीय चिमुकल्याचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तसेच रामनगर येथे 35 व 25 वर्षीय महिला तर अवघ्या 2 वर्षीच्या चिमुरडीला कोरोने छेडले आहे. तर इंदिरा नगर येथे देखील 43 वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच तालुक्यातील पिंपळे येथे आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 30 वर्षीय पुरुष, अवघ्या 10 महिन्याची मुलगी, 60 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी, 11 वर्षीय बालक, 42 वर्षीय महिला, 16 वर्षीय बालक, 29 वर्षीय तरुणी, 61 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, जनता नगर येथे 52 वर्षीय महिला, बोटा येथे 65 व 27 वर्षीय महिला, परदेशपुरा येथे 38 वर्षीय साईनाथ चौक येथे 75 वर्षीय पुरुष, संगमनेरातील चावडी येथे 39 वर्षीय पुरुष अशा 29 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संगमनेर तालुक्यात 1 हजार दोन इतकी रूग्णसंख्या झाली असून त्यात 776 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अद्याप शहरातील कोविड सेंटरमध्ये 204 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजवर 22 जणांनी कोरोनापुढे हार पत्करली आहे. यात संगमनेर ग्रामीण भागात 572 रुग्ण मिळून आले असून शहरात 430 रुग्ण मिळून आले आहेत तर 10 जणांचा शहरात कोरोनाने जीव घेतला आहे.
आता उपरोक्त आकडेवारी पाहता अगदी चारदोन महिन्यांच्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंत कोरोनाने आपली माजल मारली आहे. त्यामुळे, आता तरी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी थोडीफार या शहराची काळजी करणे आवश्यक आहे. येथे शहरात थोडे दिवस मालेगाव प्रमाणे प्रशासन नेमण्याची नित्तांत गरज आहे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या मागणिकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण, येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुढील अनेक संकटे टाळण्यासाठी किमान एक महिना तरी नव्याने यंत्रणा आणि सक्षम अधिकारी येथे नामने आवश्यक वाटू लागल्याचे बोलले जात आहे. बाकी स्थानिक राजकीय व्यक्तींना न दुखविण्यासाठी जिल्हा प्रशासन हात वर करीत असेल तर त्याला काही पर्याय नाही! वाढूद्या आकडे.!