कोरोनाने मरण्यापुर्वी उपाशी राहून मेले तर काय वाईट! संगमनेरच्या कैद्यांचा जेलात अन्नत्याग! पोलीस सापडले कोंडीत!
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर शहरातील कारागृहात 22 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार आणि त्यांची योग्य ठिकाणी सुविधा करणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैव असे की, हे बाधित झाल्यानंतर चार दिवसांनी त्यांची बरॅक सॉनिटाईझ करण्यात आली तर आज तागायत हे आरोपी याच कोठीत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, जीवाच्या आकांताने त्यांनी अन्नत्याग केला आहे. आमच्यावर रुग्णालयात उपचार करा अशी मागणी करीत त्यांनी चक्क अन्नत्याग केल्याचे बोलले जात आहे. आम्ही देखील मानसे आहोत. आम्हाला देखील कोरोनापासून भिती वाटतेच ना.! मग आज आठ दिवस उलटून गेले तरी आम्हाला ना दवाखाना ना आमची वेगळी सुविधा ना समाधानकारक उपचार. त्यामुळे, कोरोना होऊन मरण्यापुर्वीच अन्नत्याग करुन मेले त्यात वाईट काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र, या कैद्यांच्या सुरक्षेपासून ते पोलिसांच्या सुरक्षेपर्यंत प्रशासनापुढे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहे. कारण, कैदांच्या सोबत कोणी जायला तयार नाही, कारण त्यांना कोरोना आहे आणि जर कोणी गेलेच तर हे कोठे पसार झाले तर त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यात या कैद्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यामुळे, धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी गत झाल्याचे दिसते आहे.
खरंतर दोन कैद्यांमुळे 12 पोलीस तर त्यांच्या 10 पेक्षा जास्त कुटुंबियांना कोरोनाच्या रोगाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच काय! या दोघांनी जेलमधील 20 जणांना आणि राहुरीत देखील हा वानवळा सोडला आहे. मात्र, या कैद्यांची मानसिकता पार भेदरुन गेल्याचे दिसते आहे. कारण, त्या चार भिंतीच्या आत त्यांना प्रचंड मानसिक त्रास सोसावला लागत असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्येय म्हणजे एखाद्या बंगल्यात कोरोनाचा रुग्ण आढळला तर सगळा गाव व्यक्तीचा तिरस्कार करतो. याहून महत्वाचे म्हणजे जो बाधित होतो त्याच्या मनात प्रचंड अस्थिरता निर्माण होते. नेमके कोठे उपचार घेऊ, मी बरा होईल का? माझ्यावर योग्य उपचार होतील का? मी जाणार तर नाही ना? या आणि अशा अनेक शंकेच्या बाबी भल्याभल्यांच्या मनात गोंधळ करुन जातात. तर प्रशासन देखील एखाद्या घरात रुग्ण सापडला तर त्याचे सर्व कुटुंब शाळेत क्वारंटाईन करण्याची घाई करते. भला मोठा नियमांचा पाढा त्या पीडित कुटुंबाच्या समोर मांडते.
मात्र, कैद्यांना मात्र, खरोखर एखाद्या काळ्या पाण्याच्या शिक्षेप्रमाणे कोरोनाची शिक्षा दिली जात आहे की काय? असे त्यांना वाटू लागले आहे. कारण, त्यांनी कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ उपचार आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविणे अपेक्षित होते. त्यांच्यावर वेळोवेळी उपचार होणे आवश्यक होते. मात्र, असे होताना दिसत नाही. आज आठ दिवस उलटून गेले. मात्र, संगमनेरचे कैदी आजही त्याच जेलमध्ये पडून आहेत. ते प्रशासनाला विनंती करीत आहेत की, आम्ही हा आजार घेऊन कोठे पळणार आहे.? त्यामुळे आम्हाला कोठेतरी रुग्णालयात हलवा, आमच्यात सोशल डिस्टन्स ठेवा, या कोरोना बाधित जेलमधून आम्हाला बाहेर काढा. पण यांच्यावर कोणाचा विश्वास बसेनासा झाला आहे. त्यामुळे यांना राहुरी विद्यापीठात ठेवण्याची तयारी झाली होती, मात्र त्यांच्या सुरक्षेचा तर कधी जागेचा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
खरंतर जेव्हा आरोपींच्या नंतर पोलीस कोरोना बाधित मिळून आले होते. तेव्हा चक्क त्यांना अॅडमिट करण्यापुर्वी संगमनेरच्या खाजगी रुग्णालयांनी पहिले डिपॉजिट मागितले होते. तेव्हापासून पोलिसांची हेळसांड सुरू झाली. तर त्यानंतर अकोल्यात एका पोलिसांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात अगदी चिमुरडी मुले आहेत. घरातील सगळेच बाधित आहेत. त्यामुळे ते घरातच क्वारंटाईन होण्यास तयार होते. कारण त्यांच्याकडे दोन अगदी लहान मुले आहेत. मात्र, प्रशासनाने त्यांचे काही एक ऐकले नाही. अखेर त्यांना अशा ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागले जेथे क्षणा-क्षणाला प्रचंड यातना आहेत. तेथे अनेक सुविधांचा आभाव आहे. तरी देखील हे कुटुंब शासनाच्या नियमांचे पालन करीत आहे. मात्र, दुर्दैवाने ज्यांनी देशाची सेवा केली. जे रोज रस्त्यावर कोरोनाशी युद्ध करत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर न त्यांना काही विशेष सुविधा आहे. ना त्यांच्या कुटुंबाला काही विशेष सुविधा आहे. त्यामुळे, आपला बाप पोलीस खात्यात आहे. याची खंत त्याच्या कुटुंबियांनी बोलून दाखविली आहे. आता पोलिसांच्या कुटुंबाला जर प्रशासन क्वारंटाईन करण्यासाठी इतकी तत्परता दाखवत आहे. तर हे आरोपी आठ दिवस उलटून देखील एकाच कोठडीत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आता यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना ही देशाला लागलेली संसर्गजन्य वाळवी आहे. त्यामुळे, कोणी स्वत:हून हा आजार ओढावून घ्यायला तयार नाही. त्यामुळे 12 पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर या आरोपींच्या सानिध्यात जायला कोणी मागेल तर ते नवलच म्हणायचे. त्यामुळे जेव्हा दोन दिवसांपुर्वी या आरोपींना राहुरी येथील कृषी विद्यापीठात नेण्याचे ठरले होतेे. तेव्हा सुरक्षा म्हणून त्यात काही पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. आता समोर कोरोना दिसत असताना कोणी गाडीत बसण्याची धाडस करीत असेल तर त्याची पाठ थोपटली पाहिजे. मात्र, असे कर्मचारी आजकाल बोटावर मोजण्याइतके राहिले आहे. परंतु, दुर्दैव असे की, काही पोलीस कर्मचारी या गाडीत जातील देखील. मात्र, त्यांना पीपी किट तरी दिले पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी शास्तवती हवी. मात्र, प्रशासन निव्वळ जा आणि पोहचून या असे म्हणते. परंतु गाडीत जाऊन काय मारयचे का? असा थेट सवाल कर्मचार्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार पोलीस खात्यातील कर्मचार्यांनी रोखठोक सार्वभौमपुढे मांडला आहे. त्यामुळे, आरोपींच्या सोबत जावं तर कोरोनाची भिती, हिंम्मत करुन बसावं तर आरोपी पळाल्यानंतर निलंबनाची भिती त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली असून धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती सध्या संगमनेर पोलिसांची निर्माण झाली आहे.
- सागर शिंदे