निळवंडे धरणाचा संघर्षमय जन्म.! कोण आहे याचे खरे शिल्पकार.! अशी उभी राहिली पाणी चळवळ.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                          अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत भंडारदरा हे ११.३९ टिएमसी धरण अगदी आनंदाने पहुडले आहे. तर त्याच्या आश्रयाखाली अगदी नेवाशाच्या प्रवरा संगमापर्यंत १०८.४८० जमीन ओलीताखाली येऊन हिरविगार होऊन डूलत आहे. मात्र, या प्रवाहाचा फायदा केवळ प्रवराकाठच्या लोकांना होत आला आहे. तर डोंगरदर्‍या आणि प्रवाहाच्या मध्यापासून ते उत्तर-दक्षिणचे अनेक शेतकरी अगदी चातकासारखी पावसाची वाट पाहत असे. हा प्रकार अकोले आणि संगमनेरच्या पठार भागावर राहणार्‍या शेतकर्‍यांनी क्षणोक्षणी अनुभविला आहे. म्हणून यावर पर्याय काय? तर तेव्हा खर्‍या अर्थाने भंडारदरा धरणानंतर याच प्रवाहावर एका उपधरणाची गरज भासली आणि त्याकाळी काही जुन्या नेत्यांच्या संपल्पनेतून हा प्लॅन उदयास आला व ३० ते ४० वर्षीच्या प्रदिर्घ कालखंडानंतर निधी, वाद-विवाद, पुनर्वसन, स्थानांतर, पाणीसाठा, सरकार व राजकारण यांच्या असंख्य कळा सहन करीत आज निळवंड्याच्या ८.३ टिएमसी धरणाचा जन्म झाला आहे. हे धरण भरल्यानंतर अनेकांना त्याचे कौतुक झाले. मात्र, त्याचा इतिहास देखील आपल्याला माहित असावा यासाठी "रोखठोक सार्वभौम"ने मांडलेला हा विशेष रिपोर्ट होय.!

तो काळ १९७६ च्या दरम्यानचा होता. तेव्हा राज्यात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर राज्यात संगमनेरचे बी.जे खताळ हे पाटबंधारेमंत्री होते. त्या दरम्यानच्या काळात प्रवरा नदिवर एखादे मोठे धरण असावे यासाठी अग्रहाची मागणी वारंवार होत होती. त्यामुळे, त्यावेळी राज्याने एक त्रिसदस्य समिती स्थापन केली होती. त्यात कॉ. दत्तात्रय देशमुख, देऊसकर व दांडेकर यांचा सामावेश होता. तेव्हा सर्वेक्षण झाले आणि ठरले की, म्हाळदेवी परिसरात धरणाचा पाया उभा केला जाईल. त्या दरम्यानच्या काळात देशात आणिबाणी सुरू होती. तेव्हा, शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते म्हाळदेवी येथे सरासरी पाच टिएमसीचे धरण उभे करण्यासाठी पहिला टिकाव मारला गेला. मोठ्या थाटामाटात तो सोहळा पार पडला, इतकेच काय.! येथे कोणशिला देखील उभारण्यात आली. मात्र, तेथील शेतकरी कॉ. दशरथ सावंत, लक्ष्मण शिंदे, रामभाऊ आरोटे यांच्यासह अनेकांनी या धरणाला विरोध केला. याचे कारण म्हणजे या एका धरणामुळे तब्बल ११ गावांचे सर्वात मोठे नुकसान होत होते. सुपिक जमिनी पाण्याखाली जात होत्या. अनेकांचे आयुष्य उध्वस्त होणार होते. म्हाळदेवी, रुंभोडी, मेहेंदुरी, निब्रळ, विठे, चितळवेढे, निळवंडे, दिगंबर अशा अनेक ठिकाणच्या बागायती जमिनी पाण्याखाली जात होत्या. त्यामुळे, सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात सर्वात मोठ्या क्रांतीने जन्म घेतला होता. तेव्हा तालुक्यात यशवंतराव भांगरे यांचे नेतृत्व होते. जसजसे अकोले तालुक्यात पाणी पेटत होते, तसतसे देशात आणि राज्यात राजकीय हेव्यादाव्यांना आग लगली हेाती. म्हळदेवी परिसरात सरकारी सर्व्हे झाला, मात्र जमिनी अधिग्रहण झाल्या नाही. तर स्थानिकांनी तेथे दंड थोपटून बंड पुकारले होते. कारण, जो कोणी अधिकारी तेथे जाईल त्यांच्या गाड्यांवर दगडांचा आणि लाठ्या-काठ्यांचा भडिमार होत होता. त्यामुळे, भिरभिरत येणारा दगड पद आणि प्रतिष्ठा विचारुन लागत नाही. हे त्यांना चांगलेच ज्ञात होते. मात्र, हे कोठेतरी थांबले पाहिजे असे प्रत्येकाला वाटत होते.

दरम्यान सन १७  मे १९७७ साली राज्यातील राजकारणात पुन्हा उलथापालथ झाली आणि चव्हाण यांच्याऐवजी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये अकोले तालुक्याचे सुपुत्र दादासाहेब रुपवते हे समाजकल्याण मंत्री होते. त्यांचे राज्याच्या राजकारणात एक मानाचे स्थान होते. हाच फायदा घेत बी.जे. खताळ आणि चव्हाण यांच्या निर्णयाला विरोध करीत दशरथ सावंत, लक्ष्मण शिंदे आणि यांच्यासह एक शिष्टमंडळ थेट मुंबईत दाखल झाले. त्यांनी प्रथमत: दादासाहेब रुपवते यांना वास्तव घटनेची माहिती दिली. शेतकर्‍यांचे होणारे नुकसान किती! याची आराखडा समोर मांडला आणि खर्‍या अर्थाने हे काम मार्गी लावण्यासाठी १९७७ साली स्वत: दादासाहेब रुपवते व वसंतदादा पाटील या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आले होते. वास्तवत: दादासाहेबांच्या विनंतीला मान देत अगदी दुसर्‍याच वर्षात म्हळदेवीच्या धरणावर पाणी फेरले आणि ही जागा आणखी थोडी वर सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता म्हाळदेवीची पिडा टळली होती. मात्र, दादांनी ठरविले की, धरणासाठी चितळवेढे ही जागा योग्य राहिल या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. तेथील कामाला मुहूर्त देखील निघाला. विशेष म्हणजे येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू देखील झाली होती. फक्त प्रत्यक्षात ताबा घेण्यात आलेला नव्हता. जसजसे राज्यात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू होता, तसतशा  राजकीय खळबळी देखील सुरू होत्या. याचवेळी १८  जुलै १९७८  साली शरद पवार यांनी सरकारमधून काढता पाय घेत जनता दलाशी हातमिळवणी केली आणि ते स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

शरद पवार हे अवघ्या ३८ वर्षाचे असताना महाराष्ट्राच्या गादीवर बसले. तेव्हा पाटबंधारे मंत्री गोविंदराव आदिक हे होते. त्यावेळी पवार यांनी हे काम सुरू करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले. मात्र, चितळवेढ्यात देखील स्थानिक शेतकर्‍यांनी सरकारी अधिकार्‍यांचा वेढा पडू दिला नाही. रामभाऊ आरोटे यांच्यासारखे अनेक नेते पुढे आले. त्यांनी अनेकदा गाड्यांवर दगडफेकी केल्या. शेतकर्‍यांची जमिन अशी पाण्याखाली जाऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी मोठी चळवळ उभी केली. त्यामुळे, म्हळदेवी नाही, चितळवेढे नाही, मग धरण बांधायचे तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे, धरण होणार तर याच ठिकाणी यावर आता सरकार ठाम झाले होते. तर, येथे धरण काय.! दगड सुद्धा ठेऊ देणार नाही यावर शेतकरी ठाम होते. त्यावेळी म्हणजे १९७८ साली देखील चितळवेढ्यात भूसंपादनाचे काम सुरू होते. मात्र, कुदळी मारुन देखील म्हळदेवीत इंचभर जागा शासन ताब्यात घेऊ शकले नाही. त्यावेळी स्थानिकांचा विरोध आणि तोंड देता-देता शरद पवार यांचे पुलोद सरकार सन १९८० साली आणिबाणी उठली आणि हे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर जून १९८० साली पुन्हा काँग्रेसचे सरकार आले. तेव्हा ए.आर अंतुले राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा पुन्हा संगमनेरचे बी. जे खताळ पाटील हे पाटबंधारे मंत्री झाले. मात्र, असे बोलले जाते की, चव्हाण यांच्या काळात म्हणजे १९७६ साली या कामाची सुरूवात केली होती. मात्र, त्यांच्या निर्णयाला डावलून सत्ता बदल होताच हे धरण चितळवेढे येथे हलविण्यात आले. त्यामुळे, हे धरण आता तेव्हापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. या धरणाची पायाभरणी करण्यापुर्वीच १९८२ साली अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आाणि त्यांना राजिनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर २१ जानेवारी १९८२ साली बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पाठोपाठ, वसंतदादा पाटील (१९८३-१९८५), शिवाजीराव निलंगेकर (१९८५-८६) शंकरराव चव्हाण (१९८६-८८-) व त्यानंतर शरद पवार २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ मुख्यमंत्री झाले. तेव्हा खर्‍या अर्थाने निळवंड्याच्या कामाला धक्का लागला. याचे कारण म्हणजे तेव्हा विद्यमान महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्याकाळी (१९८५) बिनविरोध निवडून आले होते. तर माजी मंत्री मधुकर पिचड हे १९८० ला आमदार झाल्यानंतर १९८८ साली पालकमंत्री झाले होते. तेव्हा एक व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार यांनी ना. बाळासाहेब थोरात आणि मा. मधुकर पिचड यांना एकत्र बसविले आणि चितळवेढे धरणप्रश्न मार्ग काढण्याच्या सुचना करण्यात आल्या. तेव्हा या दोन नेत्यांनी पुढे येत यावर हल काढण्याचे ठरविले.

दरम्यान अकोले व संगमनेर परीसरात प्रवरा नदीतून मोठ्या स्वरुपात  उपसा जलसिंचन योजना सुरू झाली होंती. त्यामुळे, प्रवराकाठ हा अगदी सुपिक झाला होता, पडिक शेत्या बागायती झाल्या होत्या, जोडधंदा वाढले होते. मात्र, दोन्ही तालुक्यात जो प्रवरा प्रवाहाच्या बाजुचा  परिसर आहे. तो मात्र, आजही कोरडवाहू आहे. हे नेत्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे, आणखी एखाद्या धरणाचे काम मार्गी लागले तर दोन्ही तालुक्याला प्रचंड फायदा होणार होता. तेव्हा प्रत्येक शेतकरी आणि त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यातच तब्बल दोन वर्षे अशीच निघून गेली. त्याकाळी म्हणजे १९९० साली पुन्हा निवडणुका लागल्या आणि सुदैवाने पवार साहेबांना निवडणुकीत मोठे यश मिळाले त्यामुळे शरद पवार हे भारताचे संरक्षणमंत्री झाले तर २५ जून १९९१ साली सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुदैवाने मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली सन १९९० साली अकोल्यात एक महत्वपुर्ण बैठक झाली. त्यात चितळवेढ्याचे धरण आणखी वर सरकविता येईल का? याचा विचार केला गेला. त्याचवेळी ना. बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती. त्यावेळी सन १९९१ साली एक अभियंता कुंडलिक डोखे, मिनानाथ पांडे, आभाळे गुरूजी, रामभाऊ आरोटे यांच्यासह अनेकांनी एक सर्व्हे करण्यात आला आणि त्यावेळी मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात यांनी देखील ही जागा पाहिली आणि म्हळदेवी आणि चितळवेढे हा वाद सोडून शरदचंद्र पवार यांच्या हस्ते निळवंड्याच्या पायाची कुदळ मारुन कामाला सुरूवात झाली.

क्रमश: भाग २ (नव्या पिढीच्या माहितीसाठी लेख जरुर शेअर करा)

(टिप :- हा लेख लिहीताना शक्यता माहिती जमा करुन मांडणी केली जाते, यात आकडेवारी आणि काही माहिती संदिग्ध असू शकते. अभ्यासपुर्व लेखांचा छंद जोपासत असताना स्थानिक नेतेचे मार्गदर्शन घेतले जाते.)

- सागर शिंदे

--------------------------------------
 80 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)