आयो! वाळुतस्कराच्या टायरची चोरी वाळुतस्कारानेच केली, तेही ठाणे अंमलदाराच्या समोर! कर्मचार्‍यांचा सहभाग! एकास अटक!


सार्वभौम (अकोले) :- 

                           अकोले पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क ठाणे अंम्मलदाराच्या अगदी समोर लावलेल्या वाळु तस्काराच्या टेम्पोचे टायर आणि डिस्क चोरुन नेले आहे. आता स्थानिक खाकीच्या सहकार्याशिवाय पोलीस ठाण्याच्या घरात शिरुन कोणी चोरी करेल. असे जर कोणाला वाटत असेल तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. कारण, तालुक्यातील रेकॉर्डवर असणार्‍या कुख्यात गुन्हेगारांमध्ये सुद्धा इतकी धमक नाही, की ते असे कृत्य करु शकतील. त्यामुळे, पोलीस ठाण्यातील दोन-चार व्यक्तींनी त्यास सहकार्य करुन हा प्रकार केल्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. तर जेव्हा ही घटना उघड झाली तेव्हा अर्थपुर्ण तडजोड करण्यासाठी मध्ये चार दिवस गेले आणि पोलीस अधिकारी आणि एक बडा वाळुतस्कर यांच्या मध्यस्तीने खाकी कर्मचार्‍यांची नावे वगळून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, जर हे खरे असेल तर समाजाचे रक्षकच भक्षक झाले तर या पोलीस ठाण्यात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या कृत्यामुळे  पोलीस दलात खळबळ उडाली असून हा प्रकार म्हणजे खाकीच्या नावाला कलंक आहेत अशा प्रतिक्रीया पोलीस दलातून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह हे या घटनेची सखोल चौकशी करुन खाकीचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात का? की, यात काही कलेक्टर असल्यामुळे त्यांना पाठीशी घातले जाते. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रशासनाने गेल्या काही दिवसांपुर्वी गणेश आवारी याचा वाळुचोरी करणारा एम.एच17 एजी 2605 हा वाळुचा टेम्पो पडकला होता. त्यातील दोन ब्रास वाळु देखील जप्त करण्यात आली होती. त्यामुळे त्या वाळुसह टेम्पोचा देखील पंचनामा करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हासे यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू होता. कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर हा टेम्पो तहसिल कार्यालयाच्या आवारात तसेच अकोले पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार कक्षाच्या समोर लावण्यात आला होता. मात्र, 10 ऑगस्ट रोजी लक्षात आले की, सरकारी दप्तरी जमा असलेल्या मुद्देमालाला चेक फुटली की काय? किंवा कुपनाने शेत खाल्ले की काय? त्यामुळे एकच गलबला झाला. गणेश आवारी याच्या वाहनाचे डाव्या बाजुचे टायर कोणीतरी चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तर्क वितर्क आणि शंका कुशंका समोर येऊ लागल्या.

आता यात प्रकरणात विनायक नरहरी साबळे (रा. खानापुर, ता. अकोले) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, हा एकटा अशा पद्धतीची चोरी करू शकतो? ते ही पोलीस ठाण्यात घुसून.! आणि ठाणे अंमलदार कक्षेच्या अगदी समोर.! आश्यर्य वाटते ना? पण ते या आरोपीने करुन दाखविले आहे. मात्र, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार तरी कसे? एकतर कुख्यात गुन्हेगार देखील पोलीस ठाण्यातील वस्तुला हात लावताना हजारदा विचार करतात. तर, अकोले तालुक्यातील सामान्य मानसे पोलीस ठाण्यात प्रवेश करताना देखील त्यांच्या हातापायांचा लटकापरा होतो. (वाळु तस्कर आणि अवैध धंद्यावाले सोडून) त्यामुळे,  असे करण्याची धाडस तोच करु शकतो ज्याला पोलीस ठाण्यातून पाठबळ आहे. त्यामुळे, त्या दिवशीचे ठाणे अंमलदार, त्यांचे सहाय्यक, तपासी अधिकारी, पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे कर्मचारी, 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यात असणारे सीसीटीव्ही, संशयित व्यक्तींच्या हलचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोपी साबळे यांच्याकडून मिळणारे जबाब यात सर्व चित्र उघड होऊ शकते. मात्र, तुर्तात यात एकच व्यक्तीस आरोपी करण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली तर यात कोणला आनंद झाला आहे, कोण आरोपीसाठी गुडवेल आहे जो सदाकाळ त्यास मदत करत होता, कोण ही चोरी करताना निगरीनीची अंमलदारी करीत होते. हे सर्व उघड होईल. आता पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी भल्याभल्या गुन्ह्यांचे तपास लावले आहे. खानापुर, गर्दनी, टाकळी रोड विनयभंग, चैतन्यपुर, देवठाण अशा अशक्य गुन्ह्यात त्यांनी शब्बासकी मिळविली आहे. तर अवघ्या एक पोलीस अधिकार्‍यास घेऊन इतके मोठे पोलीस ठाणे संभाळले आहे. त्यामुळे, त्यांच्या पोलीस ठाण्यात काय चालते हे त्यांना शोधने फार कठीण नाही. त्यामुळे, येणार्‍या काळात ते या प्रकरातील सत्य बाहेर आणतील. यात तिळमात्र शंका नाही.

दरम्यान पोलिसांनी बाहेर काहीही केले तरी ते जनतेच्या अंगवळणी झाले आहे. तसेही पोलीस कसाही वागला तरी तो टिकेचा धनीच असतो. मात्र, पोलिसांनी असेही प्रकार करु नये. जे अवघ्या काही लक्षापोटी आपल्याच पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी मदत करावी. अशा प्रकारच्या चर्चा आता अधिकच रंगू लागल्या आहेत. आता या प्रकरणात चौकशी तर सुरू आहे. जर कामात कसुरी वाटली तर निलंबन किंवा बदली होऊ शकते आणि जर सहाय्य केले असेल तर सहआरोपी. त्यामुळे या गुन्ह्यात नेमके काय होते. याकडे तालुक्याचे व पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.