धक्कादायक.! संगमनेर बायपास येथून गाडीत घेतलेल्या महिलेला दारु पाजून केला बलात्कार.! 12 तासात आरोपीस ठोकल्या बेड्या.!


सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली. मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित झाली असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करत असताना अवघ्या बारा तासात घारगाव, एलसीबी व सायबर पोलीसांनी या गुन्हयाचा छडा लावला असून आरोपी सुखदेव बबन कंकराळे (वय 39 रा. बारगाव पिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक) यास बेडया ठोकल्या आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. 7 ऑगस्ट 2020 रोजी एक निराधार महिला चाकणला जाण्यासाठी संगमनेर बायपास नाशिक पुणे रोड येथे मदत मागत उभी होती. त्यावेळी तिला आरोपी कंकराळे यांनी मदत देऊन पिकअप मध्ये बसविले. तर पुण्याकडे जात असताना रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास पिकअप मध्येच या आरोपीने प्रवासी महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तर तिला दारू पाजून ती नशाधीन असताना तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. तर रात्री तिला आळेफाटा ता जुन्नर येथे सोडून निघून गेला. त्यानंतर सदर पीडीत महिलेने दि.14 रोजी घारगाव पोलीस ठाण्यात कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला होता. 


दरम्यान या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना घारगाव, एलसीबी व सायबर पोलीसांनी या गुन्हयाचा छडा लावला असून आरोपी सुखदेव बबन कंकराळे (वय 39 रा. बारगाव पिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक) यास बेडया ठोकल्या आहेत. तर या आरोपीने गुन्हयात वापरलेली पिकअप देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून नारायणगाव येथे त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गुन्हयाबाबत माहिती विचारली असता प्रथमता टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी पोलीसीखाक्या दाखविला असता तो पोपटासारखा बोलता झाला. तर हा गुन्हा मीच केला असल्याची त्याने कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक आंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, सायबर शाखेचे अधिकारी, एलसीबीचे दिलीप पवार, घारगाव पोलीस ठाण्याचे आंबादास भुसारे यांच्या टिमने केली.