निळवंड्याचा संघर्षमय जन्म.! न्यायासाठी त्यांनी 10 दिवस जेल भोगली.! संगमनेरसाठी ना. थोरातांची धडपड.!


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                          तो काळा सन 2001-2 चा होता. त्या दरम्यान निळवंडे धरणाची उंची आता इंच-इंच वाढू लागली होती. आघाडी सरकारच्या काळात विशेषत: बाळासाहेब थोरात यांनी धरणावर कटाक्ष ठेवला होता. काहीही झाले तरी संगमनेरच्या मातीत निळवंड्याचे पाणी न्यायचे म्हणजे न्यायचेच हेच दिवास्वप्न सत्यात अवतरण्यासाठी ते आहोरात्र मेहनत घेत होते. याच दरम्यान निळवंडे धरणग्रस्तांच्या पाठीशी तालुक्यातील नेते अगदी दीपस्तंभासारखे उभे होते. त्यात अशोकराव भांगरे, शिवाजीराजे धुमाळ यांच्यासह अनेकांनी धरणावर ठाण मांडले. अशोक भांगरे यांनी गावोगावी जाऊन मोठी जनसंख्या तेथे उभी केली. तब्बल 450 लोकांचा समुदाय एक झाला, मरण आले तरी बेहत्तर पण न्याय मिळाला पाहिजे या भूमिकावर ठाम ते होते. मात्र, यावेळी तेथे पोलिसांनी बळाचा वापर केला. तरी देखील आंदोलक पाय रोखून उभे होते. एकवेळी रक्तरंजित क्रांती मान्य होती मात्र, माघार नाही. कारण, कष्टाची जमीन पाण्याखाली जाताना तेथील शेतकर्‍यांच्या काळजाचे पाणी-पाणी होत होते. त्यामुळे आंदोलकांनी डगमगती भूमिका घेतली नाही. म्हणूनतर, त्यावेळी 300 पुरुष आणि 150 महिला अशा 400 जणांना पोलिसांनी अटक केली. आज ना उद्या लोक नमतील, त्यातील समझदारांची समजूत काढता येईल अशी धारणा अनेकांची होती. मात्र, सगळेच आपल्या मुद्द्यावर आडून राहिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सगळ्यांना जामिन देण्याचे ठरले. मात्र, या 400 लोकांनी जामीन नाकारला आणि प्रशासन व शासनाची पळताभुई थोडी केली. तेव्हा एक ना दोन तब्बल 10 दिवस या सगळ्यांची रवाणगी पुण्यातील येरवाडा जेल येथे करण्यात आली होती. जेव्हा सरकार नमले, चर्चेला बसले तेव्हा हे सर्व बाहेर आले. यावेळी खर्‍या अर्थाने जर कोणी निळवंड्याचे पालकत्व आणि उदारमतवादी अंत:करण दाखविले असेल तर ते नाव म्हणजे ना. बाळासाहेब थोरात हे होेते. तर याच दरम्यानच्या काळात दुसर्‍या वेळी जेव्हा निळवंडे कॉनॉलचा प्रश्न उभा राहिला तेव्हा देखील 500 पुढे आले होते. त्यांच्यावर 300 पोलिसानी बळाचा वापर केला. तेव्हा कॉ. अजित नवले, राष्ट्रसेवादलाचे विनय सावंत, रिपाईचे शांताराम संगारे, मच्छिंद्र धुमाळ यांच्यासह पाच जणांना संगमनेर येथे पाच दिवस जेलमध्ये टाकले होते. तेव्हा 14 एप्रिलचा दिवस होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी शांताराम संगारे यांच्यासह अन्य व्यक्तींशी दुरध्वनिहून संपर्क साधून मागण्या मान्य केल्या जातील मात्र, जास्त आक्रमक होऊ नये. अशी विनंती केली होती. त्यानंतर काही मागण्या पुर्ण झाल्या. अर्थात सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षाची भूमिका देखील कॉनॉलच्या कामात फार मोठी होती.  


      दरम्यान सन 2000 साली निळवंड्याच्या कामाला गती मिळाली. मात्र, तेव्हा जमीन आणि पुनर्वसनाचे आंदोलन सुरू झाले. धरणग्रस्तांची 100 मुले सहकार क्षेत्रात घ्या, 25 जणांना शासकीय नोकर्‍या, पुनर्वसन, शेतकर्‍यांना योग्यदराने मोबदला अशा अनेक मागण्यांनी निळवंडे धरण दुमदुमून गेले होते. या प्रश्नावर खलबते सुरू असताना सन 2003 साली धरणाला तिसरी सुधारीत मान्यता मिळाली. यात 760 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. यात ना. बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड यांचे महत्वाचे योगदान होते. मात्र, दुर्दैव असे की, संगमनेर, राहुरी, राहाता येथे धरण, कालव्यांची कामे वेगाने सुरू झाली होती. परंतु, निळवंड्याचे काम मंदावले होते. तर येथे कालव्यांची कामे पुर्णत: बंद झाली होती. याचे कारण म्हणजे जेव्हा कालव्यांचे भुसंपादन झाले तेव्हा शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळाला नाही. यावेळी काहींनी समाधान मानले तर काहींना कमी दराने पेमेंट मिळाले म्हणून लोक त्यास विरोध करू लागले होते. मात्र, त्यानंतर बागायती जमिनी वाढल्या होत्या त्यामुळे कालवे बंधिस्त असावे अशा मागण्या जोर धरू लागल्या होत्या. या मागणीने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उभी राहिली होती. त्यामुळे, कालव्यांच्या कामांनी अगदी कासवाचे रुप धारण केले होते. मात्र, निळवंडे धरण आणि त्याचे विस्तीर्ण कालवे हे धेय्य उराशी बाळगून ना. बाळासाहेब थोरात यांनी फार मोठा त्याग केला होता. कारण, त्याकाळी त्यांना कॅबिनेटमंत्री म्हणून हवे ते खाते मिळणार होते. मात्र, त्यांनी संगमनेरच्या हितासाठी त्यावर मंत्रीपदावर पाणी सोडले आणि निळवंड्याचे पाणी संगमनेरात आणण्यासाठी रक्ताचे पाणी करीत प्रत्येक प्रश्नावर ते मार्ग काढत राहिले.

                   त्याकाळी ना. थोरात हे पाटबंधारे मंत्री असले तरी या धारणाच्या पुर्तीसाठी ते स्वत: प्रकल्प बाधीत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिरारीने सामोरे गेले. चर्चेने प्रश्न सुटतील आवेशाने आक्रमकता वाढून वातावरण गढूळ होत प्रश्न तानले जातील इतका संयम त्यांनी बाळगून बैठक घेतली. तेव्हा संगमनेरच्या हितासाठी सर्वात पहिला त्याग करण्याची मानसिकता त्यांनी दाखवत शेतकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी स्वत:ची पाच एकर जमीन दिली. "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे.!" या जयघोषाने त्यांनी पीडितांची जबबादारी पहिल्यांदा खांद्यावर घेतली आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना संगमनेर व अकोले येथील गायरान व पडीक अशा शासकीय जमिनी मिळवून दिल्या. त्यामुळे, आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्श पॅटर्न ना. थोरात यांनी पहिल्यांदा राबविला होता. इतकेच काय.! आंदोलकांच्या मागण्या लक्षात घेत थोरात यांनी प्रकल्पग्रस्तांना संगमनेरच्या सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकर्‍या देखील दिल्या. अनेकांचे आयटीआय कोर्स पूर्ण करुन त्यांना चांगले पद देखील दिले असे थोंबे-थोंब योगदान साचून ते निळवंड्याचे धरण उभे राहिले आहे आणि तेव्हा कोठे आज या निळवंड्याचे पाणी संगमनेरच्या कुशीत खळखळताने दिसते आहे. त्यामुळे, जेव्हा पाणी पहाल तेव्हा त्यामागील इतिहास देखील तुमच्या डोळ्यासमोर खळखळून वाहता झाला पाहिजे.! म्हणून हा रोखठोक सार्ववभौमचा खटाटोप आहे.

                    पुढे 2005 साली पुन्हा राज्याच्या निवडणुका लागल्या. निवडणुकीत राजकीय रणकंद झाले, भाजप-शिवसेना पुन्हा पराभूत झाले आणि आघाडी सरकार सत्तेत बसले.  तेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री तर अजित पवार हे राज्याचे पाटबंधारे मंत्री झाले.  त्यावेळी दादांनी अकोले तालुक्यासाठी दोन महत्वाचे निर्णय घेतलेे. त्यात तालुक्यातून उच्चस्तरीय कालव्यांना मंजुरी दिली व पिंपारकणे व म्हाळदेवी येथे दोन उड्डानपुल यांना मंजुरी देण्यात आली. तर याच सरकारच्या काळात स्थानिक नागरिक आणि धरणग्रस्त यांच्यात प्रचंड नाराजी होती. त्यामुळे, काही मागण्यांसाठी येथील नागरिकांनी धरणाचे काम करणार्‍यांवर दगळफेक सुरू केली, यात अनेकजण रक्तबंबाळ झाले. हे धरण संगमनेरसाठी आमृसागर असल्यामुळे तेथे बाळासाहेब थोरात यांनी कधी या धरणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यावेळी थोरात हे राज्यात कृषीमंत्री होते. इकडे दगडफेक तर तिकडे थोरात साहेब , बाळापूर, अकोला दौर्यावर होते. इकडे दगडफेक झाल्याचा निरोप कळताच त्यांनी तो दौरा अर्धवट सोडून धरण जवळ केले. तेथे पोहचताच त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा राग शांत केला. इतकेच काय.! त्यांच्या मागण्याही पुर्ण केल्या. अर्थात स्थानिकांचा हा रोष सहाजिकच होता. कारण, आपल्या पारंपारीक जमिनी सोडून त्यांना इतरत्र जावे लागत होते. ज्या मातीत जन्म घेतला तिला सोडणे वाटते तितके शक्य होेते का ? हे भावनिक नेत्यांनी समजून घेतले. तेव्हा नामदार थोरात साहेबांना अगदी संयमाने ही सर्व परिस्थिती हाताळली. तर यात मोलाचा वाचा माजी मंत्री मधुकर पिचड यांचा देखील होता. निळवंडे धरणाच्या जन्माचा इतिहास जितका संघर्षाचा आहे, तसा तो प्रत्येकाच्या त्यागाचाही आहे. हे विसरता कामा नये. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या काळ्या आईला कायमचा निरोप देऊन आयुष्यभराचा विरह सहन केला आहे.

भाग 3 क्रमश: 

----------------------------------------

जाहिरात :- अकोले व संगमनेर येथे 90 लाख वाचकांच्या लोकप्रिय रोखठोक सार्वभौमसाठी प्रतिनिधी पाहिजे आहेत. संपर्क - 8888782010, 8208533006  

--------------------------------------
 89 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547