थँक्स गॉड.! ना. बाळासाहेब थोरातांचा निगेटीव्ह! संगमनेरात एक तर अकोल्यात एक रुग्ण!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना. बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यात काल एक मयत 15 रुग्ण सापडले होते. त्यात आज पुन्हा भर झाली असून शहरात एक रूग्ण सापडला आहे. तसेच अकोले तालुक्यात देखील ब्राम्हणवाडा येथे विवाह सोहळ्यात गेलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे ब्राम्हणवाड्यात कोरोनाचे आता सात रूग्ण झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एक दक्षता म्हणून ना. थोरात यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन करून घेतले होते. दरम्यान त्यांचा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आरोग्य प्रशासनाला मिळाला असून तो निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, संगमनेरात राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर गेल्या आठ दिवसापासून संगमनेरात 50 पेक्षा जास्त रुग्णांची भर झाली आहे. रोज नवे रुग्ण व नव्या गावांना बाधा होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे नेमका यावर उपाय काय? याबाबत प्रशासन हतबल झाल्याचे दिसते आहे. कुरण सारख्या ठिकाणी 40 रुग्णांचा उच्चांक तालुक्यात गाठला आहे. मात्र, त्या बरोबर शहर आणि गावे देखील कोरोनाने ग्रासत चालल्याचे दिसते आहे. आता ग्रामीण भागासह शहरातील अॅरेंग कॉर्नर, गणेश नगर, सय्यदबाबा चौक अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. आता पुन्हा जनतानगर येते कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे. येथे एका लाँड्री व्यावसायीकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या परिसरात कंटेनमेंट झोन करुन अनेकांची तपासणी करावी लागणार आहे.
दरम्यान गेली तीन महिने अकोले तालुक्याला प्रशासनाने कोरोनापासून जपले. मात्र, आता येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसते आहे. काल विरगाव येते 1, ब्राम्हणवाडा येथे 2 तर काळेवाडी येथे एक अशा तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. तर आज पुन्हा ब्राम्हणवाडा येथे नवा रुग्ण मिळून आला आहे. येथे जे दोन लग्न आणि एक वाढदिवस होता. त्याबाबत सगळी झाकाझाक होताना दिसत आहे. मात्र, अचानक जेव्हा कुरण सारखा झटका अकोले तालुक्याला बसेल तेव्हा प्रशासन खडबडून जागे होईल. मात्र, तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असेल. जी शिक्षक महिला धुमाळवाडी येथे सापडली होती. त्यांच्या संपर्कातील कोणालाही बाधा झाल्याचे अद्याप समोर आले नाही. तर पिंपळगाव निपाणी येथील सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे या गावांची चिंता मिटली आहे. फक्त ब्राम्हणवाड्यातील गुपित स्थानिक लोक झाकत आहे. त्यावर प्रशासनाने कडक पाऊले उचलणे अपेक्षित आहे.