संगमनेरच्या निमगाव जाळीत हॉटेलवर दरोडा, कटावणी डोक्यात टाकून दारु पळविली, सिने स्टाईलने चौघे अटक


सार्वभौम (संगमनेर) :
                          संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे नऊ दरोडेखोरांनी एका हॉटेलच्या गोडावुनमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 13 जुलै रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. यात हॉटेलच्या खिडकी तोडून आतील दरवाज्याचे कुलूप तोडून एकास कटावणीने मारहण केली. तर तेथील बिअरचे बॉक्ससह 3 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी यातील चार दरोडेखोरांना अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री निमगाव जाळी येथील गोविंद गार्डनच्या मागे एका गोडावुनमध्ये काही दारुचा साठा ठेवला होता. यावेळी रात्री श्रीरामपूर येथील दरोडेखोर आले व त्यांनी येथील दारु लंपास करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खिडकी व दरवाज्याचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यांना तेथे काही रोख मुद्देमाल मिळाला नाही. मात्र, गोडावुनमध्ये जी दारू होती. ती मात्र त्यांनी घेऊन तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यांना तेथील एका व्यक्तीने विरोध केला असता त्याच्या डोक्यात यांना कटावणी मारत गंभीर जखमी केले व नऊ जणांना तेथून पोबारा केला. दरम्यान तेथे आरडाओरड झाली असता हे सर्व अस्तव्यस्त दिशेने पळून गेले.
               
 दरम्यान हा प्रकार पोलिसांना कळविला असता आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांडवकर यांना मिळाली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांच्यासह एक पथकास यांच्या मागावर पाठविले. दरम्यान याच रात्री पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत असताना निमगाव जाळी परिसरात रात्री काही संशयित व्यक्ती त्यांना दिसून आले. पोलीस गाडी पाहताच त्यांनी धुम ठोकली मात्र, पोलिसांनी अक्षतश: अंधारात या दरोडेखोरांचा पाटलाग करुन यातील तिघांना ताब्यात घेतले. हे यातील दोघे इतके अट्टल होती की, यांनी लवकर आपले तोंड उघडले नाही. मात्र, यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना जेव्हा पोलीसी खाक्या दाखविला तेव्हा त्याच्यातील   एकजण पोपटासारखा बोलला. तेव्हा त्याने सांगितले की, मुझफर बादशहा सय्यद, सचिन केशव जोशी, सुलतान शेख, आवेज शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), अरबाज झहीर बेग (रा. श्रीरामपूर), अवेज उर्फ बाबा शेख, शाहरुख शहा, आरिफ शेख (रा. रामगड) व एक अनोळखी व्यक्ती अशा नऊ जणांनी हा कारनामा केल्याचे त्याने सांगितले.
                 
  दरम्यान आश्वी पोलिसांनी आता मुझफर बादशहा सय्यद, सचिन केशव जोशी, सुलतान शेख, आवेज शेख  या तिघांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्याकडून घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे. आता आश्वी पोलीस निरीक्षक मांडवकर व पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी तपासाला गती देत आरिफ शेख यास थेट श्रीरामपूर येथून अटक केली आहे. यात चौघांना आता अटक करण्यात आली असून पाच जणांचा शोध सुरू आहे. खरंतर यात आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्ष घातले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे काही दिवसात यांना बेड्या ठेकण्याची शक्यता आहे. कारण, पवार यांनी यापुर्वी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात यशस्वी कामगिरी पार पाडलेली आहे. तेथे त्यांचा मोठा सोर्स आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काम फारसे जड नाही. त्यामुळे आश्वी पोलीस व एलसीबी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
                      तर महत्वाचे म्हणजे गुरूवार दि. 9 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी प्रकाश बबन महाले यांच्या परमिट रुम व बारच्या हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला होता. तब्बल 44 हजार 845 हजार रुपयांचे मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा देखील दरोडा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यात चोरटे अज्ञात आहेत तर या घटनेनंतर लगेच चार दिवसात याच परिसरात अशा प्रकारे हॉटेलवर दरोडा पडतो. ही काहीशी संशयास्पद गोष्ट आहे. आता त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.