अनिसापेक्षा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी निवृत्ती महाराजांचे काम सर्वेत्तम! - मधुकर नवले

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण सामाजिक जीवनात काम करित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वेदनादायी आहे. माध्यमिक शिक्षकाची नोकरी सोडून ते वारकरी सांप्रदायात आले. प्रवचन अगर किर्तन सेवेच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन आणि समाज जागृती केली. समाजातील अमानवी व समाजविघातक विकृतीवर त्यांनी रोखठोक शब्दात हल्ले चढविले. आपल्या प्रवचनात व किर्तन सेवेत अपप्रवृत्तीवर नेमके बोट ठेवण्याची त्यांची वकृत्वशैली उभ्या महाराष्ट्राला भावली. 
                  गेली काही वर्षे किर्तनाच्या माध्यमातून समाज बदलाचे वेड घेवून ते महाराष्ट्रभर फिरतात. बेंबीच्या देठापासून ओरडत समाजासाठी ते आपले रक्त आटवतात. सासूकडून सुनबाईंची किंवा सुनबाईकडून सासूबाईंची छळवणूक, मातापित्याला न सांभाळणारी मुले, व्यसनाधीन झालेला तरुण, मुला - मुलींना संस्कारित करताना केवळ लाड नको तर शिस्त सुद्धा पाहिजे हा आग्रह, 35 वर्षांचा शेतकरी कुटुंबातील तरणाबांड पोरगा लग्नाविना आज हिंडतोय कारण शेती व्यवसाय करणार्‍या मुलांना मुली मिळत नाहीत, वैफल्यात बुडालेली तरुणाई, केवळ पदवी नको तर व्यवसायिक शिक्षण घ्या हा आग्रह, शिक्षणातून उद्याची तरुणाई घडावी हा अट्टाहास, मोबाईलचा अधिक वापर किंवा चुकीचा वापर, आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या धनदौलतीचा उपभोग घेणारी व आई वडिलांची छळवणूक करणारी संतती किती वाईट आहे हे समजवण्याचा पोटतिडकीतून असलेला अट्टाहास व हे आजचे समाजजीवन पहाता यात सुधारणा व्हाव्यात हाच प्रवचन किर्तनातील त्यांचा समाज प्रबोधनाचा कायम राहिलेला प्रयत्न. 
ही समाजजागृती हेच त्यांचे मौलिक सामाजिक काम आहे. वारकरी सांप्रदाय ह.भ.प. इंदोरीकर महाराजांसह हेच समाजप्रबोधनाचे काम शतकानुशतके करीत आले आहेत. अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ वारकरी सांप्रदाय चालवतोय हे कोणी नाकारू शकत नाही. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम विज्ञाननिष्टेचे आहे. याला कुणाचा विरोध नाही. मात्र समाजातील अपप्रवृत्ती विरोधात लढणे हे सुद्धा अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचा एक भाग आहे. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. 
 शिवाय ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर हेच काम करतात हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांचे हे काम उभा महाराष्ट्र आज मान्य करतोय. पुराणातील एखादा दाखला चुकीचा ठरवून त्यांना अपराधी ठरविणे व हा अपराध सिद्ध करण्याचा अट्टाहास बाळगणे ही सामाजिक क्षेत्रातील, अवघे जीवन समाजासाठी व समाज जागृतीसाठी समर्पित करणार्‍या व्यक्तीच्या सामाजिक मोहिमेला अडथळा ठरणारी किंवा अशा व्यक्तींची मानसिक छळवणूक करणारे ठरेल. ही समाजमनाची जाहीर भूमिका आहे. शासनाने सुद्धा त्यांचे सामाजिक काम विचारात घेवून योग्य निर्णय घ्यावा. निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावरील हा गुन्हा मागे घ्यावा. अन्यथा हे काम करणारी माणसं समाजहितासाठीयापुढे काम करण्यास धजावणार  नाहीत.

- मधुकर (भाऊ) नवले
अभिनव शिक्षण संस्था संस्थापक
       8888975555