हॅलो.! अकोलेकरांना बाजार एकाच ठिकाणी भरवा, नगरपंचायतीची भोंगा लावून सुचना महसुलसाठी धडपड, तर केलेल्या सगळ्या कष्टावर पाणी फिरेल, कोरोना वेशीवर आलाय विसरु नाका
सार्वभौम (अकोले) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे सांगत आहे. गर्दी करु नका. बाजार भरविताना एकत्र येऊ नका. सोशल डिस्टन्स पाळा. पण, अकोले तालुक्यात एक अनोखा उपक्रम पहायला मिळाला आहे. गुरूवारी चक्क गावभर गाडी फिरवून बाजार तळावर बाजार भरविण्याचे आवाहन भोंग्याच्या माध्यमातून करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत शेतकर्यांनी भिडभाड न ठेवता थेट बाजारतळ गाठला आणि बघता-बघता तोबा गर्दी झाली. शासन नियमांना कचर्याची टोपली आणि सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला. आता नशिब की अद्याप येथे एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. नाहीतर उद्या प्रशासनाला पळता भुई थोडी होईल आणि अकोलेकर तर निम्मे अफवांनीच जाम होतील. त्यामुळे, अशा प्रकरचे नियोजन प्रशासनाने टाळले पाहिजे. अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, ही सगळी उठाठेव का? असे विचारले असता केवळ सगळी बाजारपेठ एका ठिकाणी आणून त्यांच्याकडून महसूल गोळा करण्याचा हेतू ठेऊन हा प्रकार घडवून आणला की काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे अकोलेकरांना प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यात पहिल्यांदा जे आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यांच्यामुळे तेथे कोरोनाचे उद्घाटन झाले. मात्र, खरा त्रास आत्ता सुरू झाला आहे. कारण, धांदरफळ येथे मयत झालेला व्यक्ती हा एक व्यापारीच होता. अंडी आणि मटनचे दुकान ते चालवत होते. त्यामुळे, त्यांच्या माध्यमातून कोणा-कोणाला बाधा झाली आहे. हे शोधणे आव्हान असणार आहे. आता असा प्रकार अकोले तालुक्यात झाला तर आजवर जे काम केले आहे. त्यावर पाणी फेरल्यासारखे होणार आहे. त्यामुळे अकोले प्रशासनाने थोडीशी सावध भुमिका घेणे अपेक्षित आहे. कारण, यापुर्वी शहरात जो भाजीपाला भरत होता. तो सोशल डिस्टन्स पाळून भरला जात होता. मात्र, त्यामुळे नगरपालिकेला महसूल जमा करण्यासाठी मोठा त्रास होत होता. त्यामुळेच की काय! त्यांनी गुरूवारचा बाजार भरविण्यासाठी एक भोंगा लावला. त्यात आवाहन करण्यात आले की, शेतकर्यांनी भाजीपाला विकण्यासाठी इतरत्र बसण्याची गरज नाही. तर सर्वांनी बाजारतळावर बसावे. त्यांच्या भोंग्याला दाद देत विक्रेते थेट बाजारतळावर पोहचले. त्यामुळे सोशल डिस्टन्स, सावधानता, मास्क, सॅनिटायझर आणि दक्षता या सागळ्यांवर पाणी पडले. एकाच वेळी बाजारात शेकडो विक्रेते आणि शेकडो ग्राहकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे जो रोजचा आठवडे बाजार भरतो. अगदी तसाच हा बाजार दिसत होता. या गर्दीमुळे नगरपंचायतीने काय सिद्ध केले देव जाणे! पण, जर इतक्या गर्दीत एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळला तर अकोल्याची काय अवस्था होईल हे नव्याने सांगायला नको. कारण, एक गोष्ट लक्षात येते की, जेव्हा अ. नगर व महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या शेकडा पार करुन गेली होती. तेव्हा नाशिकमध्ये एकही रुग्ण नव्हते. मात्र, तेच नाशिक आता राज्यात प्रथम आणि रेडझोनमध्ये आहे. हे उदाहरण शेजारचेच आहे. तर संगमनेर, पुणे, ठाणे, नाशिक अशा चारही ठिकाणी कोरोना आहे. हे देखील अकोले प्रशासनाने विसरु नये.
अकोल्यात तसे पाहिले तर आजकाल नियोजनाचा आभाव दिसू लागला आहे. मात्र, शासनाच्या काही नियमांमुळे ते देखील हतबल झाल्याचे दिसते आहे. पण, या अपरोक्त नगरपालिका प्रशासनाने महसूल वसूल करण्यासाठी सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणे चूक आहे. असे काही लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. जी दुकाने शासनाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्याकडून पंचायतीने दंड वसूल केला आहे. मग, देशी दारु, बार, वाईनशॉप यांच्याकडून पंचायतीने किती महसूल गोळा केला. याचे उत्तर देखील त्यांनी दिले पाहिजे. तसेही गोगरिबावर घाव घालण्याची परंपरा त्यांना कायम ठेवली आहे. मात्र, वशील्याच्या तट्टुंवर त्यांचे वसुलीशस्त्र चालत नाही. विशेष म्हणजे नगरपंचायतीने शहरातील सिमारेषा का खुल्या केल्या आहेत हे अद्याप कळले नाही. अवघ्या पाच किलोमिटरवर कोरोना येऊन पोहचला आहे. असे असताना त्यांना शहर खुले करण्याची काय घाई झाली होती. हे देखील न समजण्यापलिकडे आहे. त्यामुळे, येणार्या काळात नगरपंचायत नेमकी काय पंचायत करुन ठेवेल हे येणारा काळच सांगेल. पण, जर अकोल्यात कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला तर तो खुल्या बाजारपेठेमुळेच होऊ शकतो. त्याला सर्वस्वी नगरपंचायत दोषी असेल. असा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे, त्यांना एका ठिकाणी बाजार भरविणे बंद केले पाहिजे. सोशल डिस्टन्स ठेऊन विक्रेते बरोबर बसतात, त्यामुळे, तुमच्या सोपस्कर घेण्यापेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने सोपस्कार घ्यावे. अशी विनंती नगरपंचायतीला करण्यात आली आहे.
दरम्यान बाजारतळ, वाईनशॉप, रेशन दुकान अशा ठिकाणी आज अकोल्यात प्रचंड गदी; होऊ लागली आहे. शहरात ज्या ठिकाणी चेक पॉईंट आहे. त्या ठिकाणी एकही पोलीस दिसत नाही. त्यामुळे अकोल्यात सद्या तरी आवो- जावो घर तुम्हारा असा प्रकार दिसत आहे. असे काही लोकप्रतिनिधींचे मत आहे. पोलीस काही काळ दिलेल्या ठिकाणी थांबतात, मात्र नंतर एकही ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी एकही पोलीस दिसत नाही. त्यामुळे, अकोल्याची सुरक्षा आता राम भरोसे असल्याचे बोलले जात आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील दारुची दुकाने उघडी केल्याबाबत आवाज उठविला होता. काहीही करा पण अकोल्यात दारुची दुकाने सुरू ठेऊ नका. अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकार्यांना केली होती. मात्र, आमदारांच्या सुचनेपेक्षा शासनाला महसूल महत्वाचा असल्याचे दिसते आहे. एकीकडे नगरपंचायत महसुलसाठी लोकांना दुकाने उघडले म्हणून दंड वसुल करीत आहेत. तर दुसरीकडे महसुलसाठी मद्य सुरू आहे. त्यामुळे, पैसा कमविण्याच्या नादात अकोलेकर कोरोनाला निमंत्रण देतील की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आमदारांनी विनंती करुन देखील आज दारुच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळाले आहे.एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संगमनेर प्रशासनाने शहरातील मोेंढ्याचा भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अकोले प्रशासनाने भोंगा लावून एकाच ठिकाणी बाजार भरविण्याचे आवाहन केले आहे. ते देखील कशासाठी तर केवळ महसूल गोळा करण्याच्या हेतूने. त्यामुळे, वित्तापेक्षा पित्ताचा त्रास उद्भवला तर तो जीवघेणा ठरेल. त्यामुळे, प्रशासनाने त्वरीत आपल्या निर्णयावर उपायोजना करावी. यावर खरेतर नगरसेवकांनी आवाज उठविला पाहिजे. मात्र, त्यांना मुगगीळ्याची भुमिका का घेतली आहे. हे देखील कळेनासे झाले आहे.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 320 दिवसात 387 लेखांचे 31 लाख वाचक)