ने मजसी ने, परत मातृभूमीला...


सागर शिंदे
दै. रोखठोक सार्वभौम (अकोले) - 
आज सकाळी-सकाळी उठून चार पावलं चालायला बाहेर पडलो आणि कळत नकळत डोळे भरुन आले, पाय फारच जड पडले. अंगावर काटा शहारला, मनात कालवाकालव झाली आणि फार म्हणजे फार प्रकर्षाने ‘वि.दा सावरकरांच्या कवितेची आठवण’ झाली. ते दृश्य पाहिले आणि मनातून वारंवार आवाज येत होता. “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..सागरा”... अर्थात हे माझ्या   अंतर्आत्म्यातील बोल असले तरी त्याला वेदनांचे वलय आणि आवाज त्या वाटसरुंचा होता. ज्यांना कोरोनाने ‘बेघर’ आणि ‘बेवारस’ केले होते. त्यांना आता समाजाने देखील अस्पृश्य म्हणून वागणून दिली. त्यामुळे त्यांना आता काही नको. हवी आहे फक्त  मातृभूमी. जी साता समुद्रासारखा हजारो आणि शेकडो किलोमीटर दूर आहे. त्यांना हा प्रवास पार करुन त्यांच्या गावी त्यांच्या मातृभूमीत जायचे आहे. कारण, कोरोनाने आज दाखवून दिले आहे. पैसा अडका-धन संपत्ती ना सगे सोयरे! काहीच कामाचे नाही. अखेर उरते ती फक्त आणि फक्त गावाकडची माती. त्यामुळे, आता रस्त्यात मरण आले तरी बेहत्तर, पण त्या वाटसरुंनी इतका निर्धार केला आहे की, तुम्ही गाड्या बंद करा अथवा रस्ते, गुन्हे दाखल करा किंवा आडवा. पण, आता गावकार्‍यांनी जरी ‘निष्काशनाचे आदेश’ काढले तरी हे पाय स्थिरावतील ते फक्त आणि फक्त गावच्या मायभूमीतच..!
                  स्थलांतर म्हटलं की दुसरे महायुद्ध आणि अखंड हिंदुस्थानाची फाळणी डोळ्यासमोर उभी राहते. ते डोक्यावर घेतलेले ओझे, काखेत लेकरु, हातात कपड्यांची बंद तुटलेली पिशवी, अनवाणी पाय आणि सुमसाम रस्त्यावर चाललेलं हे बिर्‍हाड. आज ना कोणते युद्ध आहे ना कोणती फाळणी, पण तरी आम्ही लढतोय फक्त ‘मानुसकीच्या शत्रुंशी.’ ज्यांनी कोरोनाच्या भयाने मानसांना ‘वाळीत’ टाकले आहे. होय! कोरोनाने मानसांचा मानसांना विटाळ होऊ लागला आहे. शेजारी उपाशीपोटी असणार्‍याला कोणी अन्न द्यायला तयार नाही. खोली मालक भाडेकरुला थांबू देत नाही. शासन घराच्या बाहेर निघू देत नाही. समाज मदतीसाठी उघड्या डोळ्यांनी पहायला तयार नाही, मुलाबाळांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. मग अशा परिस्थितीत रहायचे तरी कसे? जर मानसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या शहरांमध्ये मिळत नाही. तर त्यापेक्षा गावाकडे चटणी-मिरची खावून दिवस काढलेले काय वाईट? हाच स्वाभिमान उरात बाळगून अनेक हंगामी स्थलांतर करणार्‍यांनी आपला डेरा पुन्हा गावाकडे वळविला आहे. भलेही गड्या नसूदे, भलेही शेकडो अंतर असूदे, भलेही कोणी मदत न करुदे! पण गाव ते गाव असतं, असे म्हणत हजारो कुटूंब आणि लाखो लोक चालते झाले आहे.
                             
 आज वि.दा सावरकरांच्या सोबत डॉ. बी.आर. आंबेडकर आणि महात्मा गांधी या महापुरुषांची देखील प्रकर्षाने आठवण झाली. कारण, डॉ. बाबासाहेब म्हणाले होते जर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती हवी असेल तर खेड्याकडून शहराकडे चला. आज कोट्यावधी लोक त्यांच्या शब्दाला प्रमाण माणून शहरात गेली. पण, आजवर कोणत्याही सरकारला त्यांचे पालकत्व घेता आले नाही. अखेर रिकाम्या हाती लोक संकटाच्या काळात खेड्याकडे निघाले आहेत. हे पाहतांना काळजाला फार वेदना होतात. हे शहरात गेले खरे पण पैसा सोडाच, यांना मानसं देखील कमविता आली नाही का? जे घर सोडताना म्हणतील तुम्हा उंबरा ओलांडायचा नाही. पण झाले उलटेच! ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या लेकरांसाठी संविधान उभे केले. त्याचे रक्षक नाही तर भक्षक म्हणून तेथे बसले आहे. कारण, या अनवाणी पायांची कदर कोणाला होईना, त्या माय माऊलीचे दु:ख कोणाच्या डोळ्याला कटू वाटेना. खुशाल घरात बसून ही निर्ढावलेली व्यवस्था टिव्हीवरील पायपिट आनंदाने पाहत आहे.
                             तर ही सुमसाम रोडवर गावाचा ध्यास मनी बाळगून खेड्याकडे निघालेल्या निस्तेज चेहर्‍यांकडे पाहून खेड्याकडे चला म्हणणार्‍या बापुंची आठवण होते. आज जणू ते सगळ्या विस्कटलेल्या गावकर्‍यांना साद घालत आहेत आणि हे गावकरी दांडी यात्राची सफर काटत आपल्या मातीकडे निघाले आहेत, पण गावकरी त्यांना वेशीवरच हटकणार आहे. तरी देखील ती ओढ कमी व्हायला तयार नाही. काही असो! पण ही पायपीट पाहिल्यानंतर काळजात वीजा कडकडू लागतात. काय आयुष्य बहाल केलय या देवाने. जे मुलं जन्माला आले आहे. त्याला महामार्गावर आई चालायला शिकत आहे. तर कोणी तिच्या कुशीत मरुन पडत आहे. खरंतर हया भावना आणि डोळ्यांना पाहिलेले दृश्य शब्दात बांधणे अशक्य आहे. पण, यांची सोय शासनाने केली पाहिजे. ही पाखरं आज फरपटत चालली आहेत. ही पुन्हा येतील आपल्या घरट्यात त्या आक्टीक टर्न पक्षाप्रमाणे 36 हजार किमीचा प्रवास करुन आपापल्या घरट्यात. फक्त आज यांना वार्‍यावर सोडू नये. हिच कळकळीची विनंती.! 
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)