अकोल्यात क्वारंटाईन म्हणजे जीवंतपणे मृत्युदंड.! मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल, अस्पृश्याची वागणूक


सार्वभौम (संगमनेर) : 
               अकोले तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र, ज्यांना संशयित म्हणून काही शासकीय ठिकाणी क्वारंटईन करण्यात आले आहे. त्यांना अगदी जीवंतपणे मृत्युदंडाची शिक्षा दिल्याची वागणूक दिली जात आहे. आम्ही माणूस आहोत की जणावरे, की पुर्वी पाळले जाणारे अस्पृश्य? असा सवाल एका व्यक्तीने सरकारला विचारला आहे. त्यामुळे, अकोल्याच्या आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला असून केवळ शासनाने ठरवून दिले आहे. म्हणून काम करताय की माणूसकी म्हणून सेवा देताय! असा प्रश्न सजग नागरिकांपुढे ऊभा ठाकला आहे.
   याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले शहरालगत माळीझाप येथील एका पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात त्याची शेकेईवाडी येथील भाची आली होती. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. मात्र, त्यांना एक सुरक्षिततेच्या दृष्टीने खानापूर परिसरातील शासकीय ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, तेथे इतकी गलिच्छ सोय आहे की, टॉयलेट आणि बाथरुम मध्ये चक्क आळ्या व कीडे पडले आहेत. या सर्वांना विलगीकरण करण्यात आले आहे असे सांगितले तरी सगळ्यांसाठी एकच वस्तू वापरासाठी आहे. इतकेच काय! यांना अद्याप प्रशासनाने जेवणाचा डब्बा सोडाच पण पिण्यासाठी पाणी देखील दिलेले नाही. जी मुलगी आजारी होती. तिला व्हायरल इन्फेक्शन झाले होते. मात्र, वैद्यकीय यंत्रणेकडून तिची व तिच्या कुटूंबाची प्रचंड हाल होत असल्याने ती आता खरोखर मनस्तापाने आजारी पडली आहे. काल रात्री (दि.3) तिला ताप आला होता. बाथरुम मधील अस्वच्छता पाहून तिला उलट्या झाल्या. त्यांनतर प्रचंड अशक्तपणा आला. हा प्रकार तिने डॉक्टरांना सांगितला असता त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मला भूक लागली आहे. असे म्हटल्यानंतर त्यांना घरुन डब्बा बोलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर माळीझाप येथून डब्बा पोहच झाला. तिला ताप आणि अशक्तपणा असल्यामुळे तिच्या पालकांनी रक्त तपासून सलाईन लावण्याची विनंती केली. मात्र, पेन किलरची गोळी देऊन तिला शांत झोपून घ्या. असा सल्ला दिला गेला. हा सर्व प्रकार एकल्यानंतर मन सुन्न होऊन जाते. ना जेवण, ना पाणी, ना गोळी, ना तपासणी, ना घर ना काळजी हे सर्व जगणे म्हणजे जीवंतपणे मृत्युच्या यातना आहे. त्यामुळे,  अकोल्यातील आरोग्य यंत्रणेने पाट्या टाकण्याचे काम करणे बंद केले पाहिजे. तर जसे ससून, कस्तुरबा गांधी येथील आरोग्यसेवक माणसांकडे माणूस म्हणून बधतात तसे यांच्याकडे देखील पाहिले पाहिजे. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी जर ते दुसर्‍याचा जीव घेत असेल तर यांना सेवक म्हणायचे का? असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.

ही माझ्या प्रामाणिक पणाची शिक्षा 
मला समाजाची काळजी नसती तर मी स्वत: आरोग्य विभागाला कळविले नसते. पण, मला आता खात्री झाली आहे. की, मी स्वत: प्रामाणिकपणे वैद्यकीय अधिकार्‍यांना संपर्क करुन चूक केली आहे. मला अजाराने नव्हे पण यांच्या मानसिकतेने व दिलेल्या वागणुकीमुळे मृत्युला सामोरे जावे लागू शकते. असे झाले तर या सागळ्या वैद्यकीय यंत्रणेला दोषी धरावे. कारण, आमचे अहवाल निगेटीव्ह येऊन देखील आम्हाला बाधिताची आणि अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे. लोक कोरोनाने नव्हे तर प्रशासनाच्या असुविधा आणि समाजाकडून होणार्‍या हेटाळणीने मरात आहे.  (क्वारंटाईन व्यक्ती)

 हे दु:ख शहराचेच नाही तर गेल्या चार दिवसांपुर्वी राजुरचे रहिवासी राज्यस्थानमधून आले होते. त्यांना शासकिय वसतिगृहामध्ये क्वांऱटाईन करण्यात आले आहे. मात्र, तेथे अस्वच्छतता असल्याने त्या सहा महिला नरक यातना सोसताना दिसत आहे. या माहिला प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्य आहेत. या राजस्थान राज्यातील माऊंट अबू येथे गेल्या होत्या. मात्र देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अचानक लाँक डाऊन घोषित केले. त्यामुळे त्यांच्यासह 99 लोक राजस्थानात अडकले होते. त्यापैकी या सहा महिला आहेत. त्या शुक्रवारी रात्री दि.1 मे रोजी अकोले तालुक्यात असल्यावर त्या प्रवाशांची आरोग्य विभागाने तपासणी केली असून त्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून क्वांऱटाईन करण्यात आले आहे. तर त्यांना प्रशासनाच्या निगराणीखाली राजूरच्या आदिवासी प्रकल्पाच्या शासकिय मुलांचे वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. विठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी त्या क्वांऱटाईन केलेल्याची आरोग्याची तपासणी करून काळजी घेत आहेत. मात्र या वसतिगृहाची अवस्था फार दयनीय झाली आहे. स्नानगृह व शौचालयाची सुविधा असली तरी शौचालय चॉकअप झाले असून व स्नानगृहाची दुरवस्था झाली  आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. खोल्यांची स्वच्छता अभावी दुरवस्था आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य व धुम्रपान केल्यानेे या महिला जीव मुठीत धरून दुर्गंधीत रहावे लागत आहे.पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाणी नसल्याने प्रशासनाने पाण्याचा टँकर बोलवून सुविधा केली.तर वसतिगृहातील तळमजल्यात असलेल्या वाचनालय खोलीमध्ये सहा महिला रहात आहेत. या वसतिगृहाचा कोणी कर्मचारी उपस्थित नसल्याने अखेर तहसील विभागाने कार्यालयातील एका कर्मचार्‍याची नेमणूक केली आहे.