ना. थोरात साहेबांनी घेतली अधिकार्यांची कोरोना शाळा ! प्रशासन हतबल ! व्यापारी वैतागले, नागरिक हैरान !
कोरोनाने अनेक देश लॉकडाऊन झाले आणि संपुर्ण जग थांबले. देशातील सामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले तर पैशाची लालसा असणारे फारच अस्वस्थ झाले. इतकेच काय! या कोरोनाने जातीयवाद उभा केला. तर भाल्यभल्या लोकप्रतिनिधिंना तोडघाशी पाडले. त्यामुळे जो तो एकमेकांवर तोंड टाकाटाकी करू लागला आहे. याचे सर्वस्वी खापर प्रशासनावर फुटत असल्याचे दिसू लागले आहे. कारण, शुक्रवारी (दि.15) ना. बाळासाहेब थोरात यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली. तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेत अधिकार्यांना काही जाब विचारले. त्यानंतर काही प्रशासकीय अधिकार्यांनी फार नाराजी व्यक्त केली. अर्थात जिल्हाधिकारी आणि साहेब यांच्यात वाकयुद्ध झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन्ही वरिष्ठांच्या घर्षणात स्थानिक प्रशासन हतबल झाल्याचे बाेलले जाऊ लागले आहे. तर सर्वांच्या वादात संगमनेरचे नागरिक मात्र घरात बसून पुतरते वैतागले आहेत. त्यामुळे, संगमनेरचे सद्या हलच हाल होताना दिसत आहे.
खरंतर संगमनेरमध्ये बर्याच वेळी कायदा व सुव्यवस्थेपासून तर कत्तलखाने, डॉक्टरी पेशा, उद्योग, व्यापार आणि व्यवसायापर्यंत पहिला विचार मतांच्या गोळाबेरजेचा केला जातो. याच्या आडूनच वाळू तस्करी, जमीन तस्करी आणि अवैध व्यवसायांना नकळत बळकटी मिळते. लोकं संभाळायचे म्हटलं की त्यांच्या सगळ्याच गुण आवगुणांना पदरात घ्यावे लागते. म्हणून येथे "राजा दिलदार" असला तरी त्यांच्या नावाखाली स्वार्थ साधनारी "चांडाळ चौकट" फार मोठी आहे. त्यांचे प्रशासनाशी काहीतर खटकले किंवा मनाजोगे झाले नाही की लगेच "साहेबांचे कान भरायचे" आणि आपले प्रस्त उभे करायचे. हाच फंडा संगमनेरात फार उत्तम पद्धतीने पुढे आला आहे. मात्र, "साडेतीन शाहण्यांपैकी" एक याच संगमनेरचा होता. त्याने "निजामशीही" उभी केली तर संपविलीही असे म्हणतात. त्यामुळे, साहेबांनी अशा अतिशाहण्यांपासून सावध राहिले पाहिजे.
खरंतर संगमनेर प्रशासनाने आजवर फार कष्टाने काम केले आहे. तबलिगींना काही आश्रय देणारे छुपारुस्तम निघाले. त्यात प्रशासनाचा दोष काय? जेव्हा शहरात चौघे कोरोना बाधित मिळून आले तेव्हा प्रशासनाने जीव तोडून सांगितले. बाळाहो! रस्त्यावर येऊ नका. पण, एकतील ते संगमनेरकर कसले?, मात्र जेव्हा रस्त्यावर गर्दी दाटली तर पोलीस आणि महसूल नेमके करताय काय? असे प्रश्न उभे केले. मग स्वत: पोलीस उपाधिक्षक रस्त्यावर उतरले. त्यांनी दोनशेपेक्षा जास्त वाहने तिनबत्ती चौकात लावून घेतले. तेव्हा गल्लीबोळातला सामान्य कार्यकर्ता बड्याबड्या नेत्यांचे फोन अधिकार्यांना आणू लागला. 230 गाड्यांपैकी केवळ 80 गाड्या शिल्लक राहील्या. हे कार्यकर्ते कोणाचे होते? ज्यांना सहकार्य झाले नाही ते "अतृप्त आत्मे" नको त्या मार्गाने टिका करण्याचा प्रयत्न करीत राहीले. खरंतर पोलिसांनी 6 एप्रिलच्या एसपींच्या आदेशानंतर कोणावरही दंडा उगारला नाही. मात्र, नको तशी कानभरणी करण्यात आली. पण, पोलीस, महसूल, आरोग्य, सेवक हे रोज मृत्युशी झुंज देत असतात, याकडे सगळ्यांनी काना डोळा केला. त्यामुळे, "उंटाहून शेळ्या वळणार्यांचे" एकूण जर अधिकार्यांचे मनोबल खचविले जात असेल तर हे नैतिकतेच्या तत्वात कोठेही न बसणारे आहे.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, धांदरफळ येथे मयत झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात एका डॉक्टरला कारवाईच्या अजेंड्यावर घेतले आहे. मात्र, जे डॉक्टर सकाळीच रुग्णालयात आल्यानंतर संध्याकाळी सुरक्षित घरी जातील की नाही. हे त्यांना माहित नाही. तर त्यांच्या एक कामाच्या नजरचुकीचे अहवाल तयार होत असतील तर आपण डॉक्टरांना प्रेरणा देतोय की त्यांचे बळ काढून घेतोय. हा देखील विचार झाला पाहिजे होता. अर्थात जिल्हा रुग्णालयात एखादा रुग्ण नेला तरी त्याची पार्श्वभूमी बाधिताच्या संपर्कातील असेल तरच त्याचे स्वॅब घेतले जातात. अन्यथा तेथे "चले जाव"ची घोषणा अनेकांनी अनुभवली आहे. कदाचित या डॉक्टरांनी धांदरफळच्या व्यक्तीला नगरला पाठवून यास "चलेजाव"चा नारा दिला असता तर आज संगमनेरचे मालेगाव झाले असते. हेच वास्तव आहे. मात्र, त्यांनी खाजगी का होईना त्याच्या तपासण्या केल्या. हे महत्वाचे आहे. अशा अधिकार्यांना बळ देणे गरजेचे आहे. मात्र, इथे वेगळाच प्रकार पहावयास मिळत आहे.
अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे हे रोज जनतेमध्ये फिरतात. अधिकार्यांना सुचना देतात, चुकले तरी पदरात घेतात. जनात देखील अधिकार्यांना फार त्रास देत नाही. परिणामी लोक स्वयंप्रेरणेने पुढे येतात. मात्र, संगमनेरात एक गाडी पकडली की कमीत कमी 10 फोन तर येतातच. मग "कारवाई केली नाही तर बुक्का आणि केली तरी दबुका !" कसे काम करायचे? हेच त्यांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे, येथील हस्तक्षेप कमी झाला असता तर आज हे दिवस नागरिकांना पहायला मिळाले नसते. कारण, आज ३३ दिवसांचा सलग तिसरा हॉट्स्पॉट जनता अनुभवत आहे. सगळ्या जिल्ह्यात कोठे नाही. मात्र, संगमनेर त्यास अपवाद ठरले आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्ग वैतागला असून डॉक्टर भितीखाली काम करीत आहे. शेतकरी हतबल झाला असून मजूर उपाशी मरत आहे. अल्पसंख्यांक घरात बंधीस्त असून टवाळके मात्र रस्त्यावर दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी तर पोलिसांवर अॅलिकेशन होत आहे. म्हणजे "धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय!" हीच गत संगमनेरात दिसून येत आहे.हा एक भाग असला तरी, प्रशासन प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसते होते. मात्र, जसे त्यांच्यावर "अज्ञात दडपण" येऊ लागले. तशी त्यांची तारंबळ उडली. एका जबाबदार अधिकार्याला फोन लावला तर त्यांना काहीच माहिती महित नसते, दुसर्याला विचारलं की त्याची एक आकडेवारी आणि तिसर्याकडून भलताच आकडा मिळत होता. अशी प्रचंड विसंगती दिसून आली. ही अशी चलबिचल असली तरी प्रांताधिकारी आणि काही अधिकारी बाकी हे सर्व अतिशय संयमाने हाताळत होते. तर काही अधिकार्यांच्या तोंडाळ पद्धतीने अनेक संदिग्धता तालुक्यात वाढत गेली. आता कुरणचे हॉटस्पॉट प्रकरण पार न्यायालयाच्या दारात गेले आहे. अर्थात हा जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीत असणारा विषय आहे. मात्र, त्याला तोंड देताना स्थानिक प्रशासन पुरते हतबल झाले आहे. हॉट्स्पॉट का? हे उत्तर देण्यासाठी त्यांची तोंड दाबून बुक्यांचा मारा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे चौदा दिवस फार जड वाटत असेल तरी ते भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात पत्रकार आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय असता तर कदाचित हा प्रश्न इतका चिघळला नसता. मात्र, कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे करुणहून वेगळाच वादंग तालुक्यात पहावयास मिळाला.
एकंदर आता कोणी कोणावर तोंड टाकाटाकी करण्यापेक्षा या कोविड योद्ध्यांच्या पंखात बळ भरणे गरजेचे आहे. कोणावर कारवाई करून किंवा कान उघडणी करुन मनोबल खचविण्यापेक्षा फक्त लढ म्हणा! हेच वाक्य त्यांना अपेक्षित आहे. जो चुका करतो. तोच खरा काम करत असतो. रिकामटेकडा किंवा कामकुचर कधीही चुकू शकत नाही. त्यामुळे, प्रशासकीय अधिकारी वा कर्मचारी तथा डॉक्टर यांना शासन व जनतेने अगदी मोठ्या मनाने पदरात घेणे अपेक्षित आहे. त्यांच्या पाठिवर हात ठेऊन कोणीतरी लढ म्हणणे अपेक्षित आहे. तालुक्यात अशीच एक नवी उर्जा निर्माण झाली तर येणार्या काळात आता संगमनेरात एकही रुग्ण आढळून येणार नाही. ही शास्वती आहे.! काही नको! आता फक्त लढ म्हणा..!!!
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEieuFQwuSv4Fcz_wdaUYSCOeki2nKaE9iM-AA_zI2slSdKfWhqTWdzW-nb_zB8Gc1mo4RA_iRi5-dUshNPjUNo6UnWp7OO4rKNYm3CjFaY-eoN0RTfz3O9hOyp7m-7TR1kxYLfU9XscV9GQ/s320/Screenshot_20190727-003413%257E3.png)
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 329 दिवसात 399 लेखांचे 34 लाख वाचक)