का केले कुरण हॉट्स्पॉट! प्रशासनाचे गोपनिय दु:ख कुरणचे मालेगाव होताना पाहयचे नाही.! प्लिझ जातीयवाद करु नका.!


सार्वभौम (संगमनेर) :-
                     सन 2010 साली पुण्यात स्वाईन फ्ल्यु आला आणि त्याने देखील असेच जीवघेणे सत्र सुरू केले होते. तेव्हा जात, पात, धर्म, पंथ सोडून सगळा देश एकवटला आणि "एच वन एन वन" वरती आपण मात केली. अर्थात आजही तसाच संसर्ग आहे. फक्त याची तिव्रता सर्वाधिक अधिक आहे. पण, या दोन्ही आजारांचे साम्य जरी एक असले तरी, परिस्थिती मात्र, प्रचंड विरोधाभासी आहे. कारण, तेव्हा सोशल मीडियातून इतका जातीयवाद रंगविला गेला नाही. त्याचे राजकारण झाले नाही, याउलट कोविड 19 ने देशा-देशांमध्ये वाद तर लावलेच. मात्र, देशांतर्गत जाती-जातीत देखील वाद उभे केले. परंतु हे असे असले तरी, याला किती बळी पडायचे, हे प्रत्येक सुजान नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.  आज जे काही चालले आहे. तो जातीयवाद नसून प्रदुर्भावास प्रतिबंध आहे. हे समजून घेतले पाहिजे. हेच संगमनेर तालुक्यातील कुरण गावकरी आणि तमाम मुस्लिम बांधवांनी याचा अभ्यास केला पाहिजे. कारण, प्रशासन आणि समाज यांच्यात आज मितीत प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. तर काही समाजकंठकांनी त्याला जातीय रंग देवून सगळ्या प्रदुर्भावाचे कारण जणू विशिष्ठ समाज आहे. असा अपप्रचार करुन ते आपल्याच बांधवांचे जगणे मुश्किल करू पाहत आहे. मात्र, अशा अपप्रवृत्तीला जर आपण बळी पडलो तर ही अंतरीक शक्ती नक्की यशस्वी होईल. त्यामुळे, कुरण वासियांनी फक्त हॉट्स्पॉट हा लादलेला नसून तो आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे. हे समजून घ्यावे. हीच पहिली विनंती. कारण, प्रशासनाकडे काही अहवाल आहेत. त्यामुळे, काही अघटीत घडण्यापेक्षा ते घडू नये हे टाळले, तर तो खरा प्रतिबंध आणि केलेल्या कामाचे सामाजऊपयोगी चीज ठरेल. म्हणून छोट्याश्या कुरणचे मालेगाव व्हायला नको. त्यासाठी  14 दिवस थोडेसे हाल सहन केले. ते भविष्यासाठी सोपस्कार जाणार आहे.! 
                           संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कोरोनाचा एकही रुग्ण नसताना हॉटस्पॉट घोषित का करण्यात आले. याचे उत्तर अद्याप कोणाला मिळाले नाही. मात्र, प्रशासकीय दृष्ट्या स्थानिक पातळीहून एक महत्वाचा अहवाल मिळाला होता. आता याला आपण धक्कादायक म्हणू शकत नाही. मात्र, तो येणार्‍या काळात कुरणचे मालेगाव किंवा औरंगाबाद होणार नाही. यासाठी फार गरजेचा होता. कारण, जसे मालेगावचे वातावरण असंतुलित होत चालले होते. तसतसे तेथील काही नागरिक कुरण परिसरात  दाखल होत होते. हीच स्थिती औरंगाबाद मधून आयात होणार्‍यांची होती. मात्र, ही बाब जेव्हा पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी संशयास्पद ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले. येथे कोणी पाहूणा आलेला नाही. असे एकच नाही, तर अनेक ठिकाणी झाले. अर्थात माणसे लपविल्याचा परिणाम काय झाला आहे. हे नव्याने सांगायला नको.
                      त्या तबलिगी प्रकरणी पाच जणांवर गुन्हे देखील दाखल आहेत. मात्र, आपण माहिती लपवून स्वत:चा आणि आपल्या कुटूंबाचा देखील जीव धोक्यात घालतो आहे. हे का समजत नाही. याचे उत्तर कळेनासे झाले आहे. परंतु, हा कोरोना म्हणजे फार मोठा शत्रू आहे. केवल कोणी खोकले तरी रक्ताचा माणूस त्याच्या जवळ जात नाही. तर परका त्याला अस्पृश्याच समजू लागतो. त्यामुळे, जो कोणी जिल्हा रुग्णालयात जाऊन आला. त्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणून तर धांदरफळचे मयत महाशय तेथे जाण्यास टाळाटाळ करीत होते. पण, त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबाला किती मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून रुग्णालयाची वारी करण्यापेक्षा दडून बसलेले बरे! हीच भुमिका कुरणमध्ये अनेकांनी घेतली आहे. अशी शंका प्रशासनास आहे. 
                               आता प्रत्येकाला वाटते की, मला काही धोका नाही. परंतु आपण मुंबईत पाहिले. रॉन्डमली सरसगट सगळ्या पत्रकारांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात 53 पत्रकारांना कोरोना झाल्याचे समोर आले. मालेगावात देखील एसआयपीएफ व पोलीस हे कोणाच्या संपर्कात आले नव्हते. मात्र, त्यांनाही लागण झालीच. त्याच प्रकाणे जर सर्रस कुरणमध्ये तपासणी केली. तर वेगळेच चित्र पहायला मिळू शकते. मात्र, दुर्दैव असे की, डॉक्टर पेशन्टला तपासताना त्याची पार्श्वभूमी संशयास्पद असेल तरच स्वॅब घेतात. अन्यथा फारसे तपासले जात नाही. त्यामुळे, तो व्यक्ती कोरोना बाधित असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे, अख्खे कुरण थोडेच तपासता येणार आहे. जरी ते शक्य झाले! तरी देखील तालुक्यातून 20 हजार लोकांना तपासले. अन्य ठिकाणाहून लोकं स्वयंप्रेरणेने तपासणीसाठी आले. मात्र, कुरणमधून साधा एक देखील व्यक्ती तपासणीसाठी आलेला नाही. त्यामुळे, प्रशासनाला काही व्यक्ती आणि प्रकार माहित असताना गावात विचारणा केली. मात्र, बहुतांशी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणून भलेही लोकांना 14 दिवस त्रास होईल, लोकांचा रोष वाढेल, मात्र, एक गेला आता दुसरा अनर्थ कोठे घडायला नको. म्हणून हा उहापोह प्रशासनाने मांडला आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, कुरण हे तालुक्यातील एकमेव असे गाव आहे. तेथून बाजार समितीत 300 पेक्षा जास्त मजूर येतात. ते बाजारात फिरतात, कामे कारतात, त्यांना काही संसर्ग झालाच तर त्याचा फैलाव किती भयंकर वेगाने होऊ शकतो. इतकेच काय! याच गावातून सर्वात जास्त व्यापारी मालेगाव आणि मुंबई अशा दोन ठिकाणी जातात. आज मुंबई विभागात 20 हजार रुग्ण असून 60 जण मयत आहे. हेच संसर्ग पाथर्डीच्या तरुणास झाला होता. यांची नावे देखील प्रशासनाकडे आहे. मात्र, त्यांनी चौकशी आणि तपासणी यास नकार दिला. काही झाले नाही, बाहेर गेलो नाही तर भीती कसली. असे म्हणत टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे, इतकेच काय, त्यांना पुन्हा बाहेर जाऊ नये असे सांगूनही त्यांनी एकले नाही. त्यामुळे, प्रशासन फार हतबल झाले होते. आज हे व्यापरी छुप्या मार्गाने बाहेर जातात आणि छुप्या मार्गाने गावात येतात.
                      मालेगावात आकडा हजाराजवळ गेला आहे तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये 742 मिळून आले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात 61 जण झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात येते की, ही सर्व ठिकाणी कुरणच्या नात्यागोत्याशी किंवा दळणवळणाशी संबंधित आहे. त्यामुळे, अशा काही गोपनिय गोष्टी माहित असताना प्रशासन गप्प राहत असेल तर त्यांनाही शेवटी मन, नैतिकता आणि जबाबदारी आहेच ना! कारण, एक धांदरफळचा व्यक्ती मयत झाला तर त्याचे खापर प्रशासनावर फोडले गेले. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शासनाने देखील त्यांना जाब विचारला. त्यामुळे, आता कुरणची अंतर्गत व्यवस्था माहित असताना देखील त्यांनी निव्वळ एखादे पेशन्ट पॉझिटीव्ह होण्याची वाट पहायची का? त्यापुर्वीच प्रतिबंध केलेला काय वाईट आहे? म्हणून माध्यमे आणि लोकप्रतिनिधी तसेच सजग नागरिक यांनी थोडी समझदारीची भुमीका घेणे अपेक्षित आहे. हे सर्व चालले आहे. ते आपल्याच आरोग्यासाठी असून आजार येण्यापुर्वी त्यावर उपाय केलेला योग्य नाही का? हे समजून सांगण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
                               आज आपण जात, पात, धर्मात अडकलो आहोत! मात्र, हा हिस्त्रक कोरोना कोणाला बिलगताना भेदाभेद करीत नाही. जीव नेताने देखील त्याला कोणाच्या ग्रांथाची गरज भासत नाही. त्यामुळे, कोरोनाला रोखण्यासाठीं एकजूट करा, पण, वेगळा रंग देऊन किंवा गौरसमज करुन दंड थोपटून बंड पुकारु नका. प्रशासन नक्कीच कोठेना कोठेे चुकत असेल. मात्र, ते प्रत्येकवेळी नाही. म्हणून त्यांना समजून घ्या. 14 दिवसांचे सहकार्य करा. कुरणचे हॉट्स्पॉट हे धोक्याचे नसले तरी ते भविष्यासाठी गरजेचे आहे. म्हणून घाबरु नका, काळजी घ्या.
                            दरम्यान पोलिसांच्या दंडेलशाही विरोधात एका व्यक्तीने नागपूर खंडपिठात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना 7 मे रोजी न्यायालय परखड शब्दात म्हणाले होते. देशावर कोरोनाचे संकट सुरू असताना लोकांना घरात बसा असे सांगून देखील ते रस्त्यावर येतात. मग तुम्ही शंभर सहकार्‍यांसोबत दंडोके घेऊन रस्त्यावर उतरता का? अखेर ही याचिका निकाली निघाली. आता कुरण हॉट्स्पॉट प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. जे रोखठोक सार्वभौमने मांडले आहे. हेच त्याचे उत्तर असू शकते. यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. मात्र, प्रशासन त्यावर सक्षमपणे आपली बाजू मांडेलच. परंतु, हॉट्स्पॉटले चॅलेंज करण्यापेक्षा त्याची अमलबजावणी करुन गाव अधिक सुरक्षित कसे राहील याकडे गावकर्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. 
                         एक दक्षता आणि जबाबदारी म्हणून लोकप्रतिनिधींनी हॉटस्पॉटचे महत्व समजून सांगून स्थानिक नेत्यांचा जनजागृती करण्यासाठी संदेश दिले पाहिजे. कारण, ही मजबुरी नाही तर जरूरी आहे. अन्यथा कुरणचे मालेगाव झाल्याशीवाय राहणार नाही. हेच वास्तव सजग नागरिकांना वाटू लागले आहे. म्हणून या गोष्टीला कोणी प्रतिष्ठेची लढाई समजत असेल तर ते चूक आहे. ही देशाच्या अस्मितेची व आपल्या आरोग्याची लढाई आहे. याला होऊन कोणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करु नये. असेच सुज्ञ नागरिकांना वाटते आहे. कारण, हे प्रकरण जीतके ताणले जाईत तितकी जातीय तेढ व प्रशाकीय रोष निर्माण होईल त्यामुळे, आम्हाला खात्री आहे. कुरणवासी या हॉटस्पॉटला हसतमुखाने सामोरे जातील. महत्वाचे म्हणजे जीतके सुज्ञ लोक याला समजून घेतील, तितके अज्ञानी लोक त्याला स्विकारतील. अन्यथा...

एक महत्वाची बाब म्हणजे, व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार असतात. सध्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वेसर्वा आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार फक्त निर्देश देत असते. कोणत्या प्रकारे अंमलबजावणी करायची, तिथली स्थिती काय आहे, त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्याचे पूर्णत: अधिकार असतात. त्यात सरकार सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी निर्णय घेतात. मुळात कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार आपत्ती होण्याआधी सुद्धा काळजी घेणे हा एक नियम आहे. आपत्ती सुरू असताना काळजी घेणे आणि आपत्ती संपल्यावर ही काळजी घेणे अशा तीन टप्प्यात काम चालते. घटना घडू नये म्हणून काळजी घेतली तर तो दोष ठरत नाही. उद्या जर काही घटना घडली तर तुम्ही काय करत होते? असाही प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो.
त्यामुळे आपण जिल्हाधिकार्‍यांना थेट चुकीचे ठरवतो हे पूर्णतः नियमाला धरून नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आपल्याला मान्य करावेच लागतील.
आपण फक्त सूचना करू शकतो किंवा आपल्याला ज्या शंका आहे त्या विचारू शकतो. प्रश्न विचारु शकतो तो आपला अधिकार आहे. परंतु त्यांचे निर्णय चुकीचे आहेत हे आपण ठामपणे ठरवू शकत नाही. त्यामुळे, प्रशासन जे करते आहे. ते योग्य आहे. त्यांना विरोध करण्यापेक्षा सहकार्य करा. हे युद्ध हात देऊन जिंकायचे आहे. पाय ओढून नाही. त्यामुळे, सुज्ञ व्हा सहकार्य करा.



महत्वाचे :

 ही बातमी ज्यांना समजली नाही, त्यांनी पुन्हा वाचा. पण, अर्धवट घेऊन सुटू नका. 14 दिवस यू निघून जातील. उद्या कोरोनाही जाईल. पण, मनातील जातीयवाद जाणार नाही. त्यामुळे, गैरसमज पसरवू नका. हॉट्स्पॉटला सकारात्मक दृष्टीने घ्या. नसेल पटत तर तोंडाला होमक्वारंटाईन करा. पण पराचा कावळा करुन प्रश्न वाढवू नका. कारण, आजकाल मुळ संकट बाजुला राहून नवे प्रश्न उभे राहू लागले आहे. त्यामुळे यंत्रणा हताश होत चालली आहे. 

सागर  शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 329 दिवसात 399 लेखांचे 34 लाख वाचक)