सहाशे द्या! अन्यथा पायीपायी निघा! संगमनेरात असंवेदनशिलतेचे दर्शन
सार्वभौम (संगमनेर) -
नगर येथून रेल्वेने आपल्या गावी जाण्यासाठी संगमनेर तालुक्यातील परप्रांतीय मजुरांकडून संगमनेर महसूल विभाग सर्रास 600 रु भाडे घेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे पैसे नेमकी कशासाठी घेतले जातात? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे राज्यात अडकलेले स्थलांतरीत मजूर परराज्यात जाण्यासाठी व परराज्यातील अडकलेले मजूर राज्यात येण्यासाठी जर भाडे भरू शकत नसतील तर भाड्याची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय राज्य शासनाने करून देखील संगमनेरात मजुरांकडून सरास पैसे घेत असल्याचा प्रकार घडत आहे. हा सर्व प्रकार महसूल मंत्र्याच्या मतदारसंघात घडत असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाला संगमनेर तहसीलकडून केराची टोपली दाखवली जात आहे.
मार्ग सोडून पायी चालत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. मजुरांना आता स्वगृही परतण्यासाठी हजारो किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने अनेक जण सहकुटुंब पायीच जात आहे. तर दुसरीकडे 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानातही घराच्या ओढीने त्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. लॉकडाऊन असल्याने कामधंदा कधी सुरू होईल? याची शाश्वती या मजुरांना राहिली नाही. घर मालक राहु देत नाही. त्यामुळे संगमनेरमधून शेकडो परप्रांतीय मजूर कामगार आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन रखरखत्या उन्हाच्या झळया सोसत पायीच घराकडे निघाले आहेत. मात्र, यातही त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या मजुरांची व त्यांचे लहान-सहान मुले ही त्यांच्या सोबत असल्याने त्यांना ही शेकडो किलोमीटर अंतर पायीच चालून घरी जावे लागत आहे. संगमनेरमधील मजुरांच्या संवेदना प्रशासनाने वेशीवर टांगल्या आणि मजुरांकडून ही 600 रु घेण्याचा केविलवाणा प्रयोग सुरू केला. आता हे 600 रु. लॉकडाऊनच्या काळात आणायचे तरी कुठून? यापेक्षा पायीच गेलेले बरे! असे समजून मजूर गावाकडे निघाला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मजुरांचा तिकिटाचा सर्व खर्च उचलला होता. याचे स्वागत ना. थोरात यांनी केले होते. पण, महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या मतदारसंघातुनच या परप्रांतीयांकडून पैसे घेत असल्याने सोशल मीडियावर महसुलमंत्री टीकेचे धनी ठरत आहे. घुलेवाडी येथील रुग्णालयात या मजूरांच्या तपासणीचा सावळा गोंधळ सुरू आहेच. तपासणी होत नाहीच पण वैद्यकीय रुग्णालयातून या कामगारांना चावडीवरच्या तलाठी कार्यालयात पाठविण्यामागचे गौडबंगाल तरी काय? असा प्रश्न समाजसेवकांनी उपस्थित केला आहे.जसे देशात लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर काही दिवसातच राज्या-राज्यांमध्ये अगदी विदारक दृष्य पहायला मिळाली. बड्या लोकांना हेलिकॉप्टर तर विमानाने आणले गेले. मात्र, सामान्य माणूस हा हजारो किलोमीटर आपल्या मायभूमिकडे पायी निघाला. खरंतर हे सरकाचे अपयश आहे. नियम शिथील झाल्यानंतर सोनू सारख्या अभिनेत्याने आठ लाख खर्च करुन शेकडो परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केली. तर इकडे शासन व प्रशासन पैसे जमा करीत बसले आहे. हा प्रकार म्हणजे मानुसकीला काळीमा फासणारा आहे. या प्रकाराचा अनेकांनी धिक्कार केला आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, संगमनेर सारख्या ठिकाणी जे परप्रांतीय गावाकडे पाठविले आहे. ते सर्व बड्या घरी काम करणारे लोक प्रामुख्याने घेतले. त्यांच्या कामाच्या पगरातून पैशांची कपात करण्यात आली. मात्र, जे लोक शेकडो मैल पायी चालत गेले. त्यांना कोणी हटकायला तयार नाही. त्यांच्या मदतीला कोणी धावून जायला तयार नाही. कारण, त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ते चालते झाले आहे. इतका दुटप्पीपणा या प्रशासन आणि पुढारलेल्या नेत्यांकडून पहायला मिळाला आहे. याबाबत त्यांच्यावर टिका होऊ लागली आहे.
दरम्यान याबाबत प्रशासकीय अधिकार्यांना माहिती विचारण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
- सुशांत पावसे