उंचखडक बु येथे तरुणाचा प्रवरेत बुडून मृत्यू अवघ्या वर्षात एकाच कुटूंबातील आठजण दगावले!, एक धक्कादायक व संशयास्पद कहाणी..


सार्वभौम (संगमनेर) -
                              अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे एक शेतमजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. 13 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. यात कृष्णा रमेश देठे (वय 22) हा तरुण मयत झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या परिवारातील सर्व व्यक्ती अशाच पद्धतीने अकस्मात मृत्युच्या नोंदी होऊन मयत झाल्या आहेत. मात्र, या चौघांच्या मृत्यूचे गुढ अद्याप उलगडले नाही.
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमेश नाना देठे (रा. विठे) यांचा विवाह उंचखडक बु येथील बेबीताई शिंदे यांच्यासोबत झाला होता. मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांचा संसार उभा केला होता. रमेश देठे यांने दारुचे व्यसन असल्यामुळे ते संसारात फारसे रमत नसे. त्यामुळे, बेबीताईंनी राहुल आणि कृष्णा या दोघांना अगदी रक्ताचे पाणी करून लहानचे मोठे केले. सन 2000 दरम्यानच्या काळात बेबीताई यांचा मृत्यू झाला. स्वयंपाक करीत असताना स्टोचा भडका होऊन ती 90 टक्के भाजली होती. मात्र, तरी तिने मृत्युशी झुंज दिली. अखेर तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. हा भडका कसा झाला, अचानक हा प्रकार कसा घडला हा सर्व साशंकतेचा विषय होता. मात्र, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोणी धजले नाही. कारण, घरी वृद्ध आईबाप वगळता कोणी नसल्यामुळे या प्रकाराची अकस्मात मृत्युमध्ये नोंद झाली.
                          या घटनेनंतर 2006 चा कालावधी असावा. रमेश देठे हे त्यांच्या राहत्या घरी अचानक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. एका खाटेच्या खाली काहीदिवस हा मृतदेह पडून होता. याची कोणाला कुणकुण लागली नाही. त्यानंतर उंचखडक येथून काही तरुणांनी जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हा मृत्यू कसा झाला, त्याचे कारण काय, मृत्यू कधी झाला, याबाबत कोणालाही काही माहित नाही. रात्रीच्या वेळी अंधारातच त्यांचा विधी अटपून घेण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात केवळ अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
                         हा प्रकार होतो कोठे नाहीतर सन 2010 मध्ये  अकोले तालुक्यात दंगल झाली होती. यावेळी रमेश देठे यांचा मुलगा राहुल देठे हा एका वेल्डींग दुकानावर कामाला होता. तो स्वभावाने दिलदार असल्यामुळे त्याची गावातील मुलांशी चांगले लागते होते. मात्र, संगत चुकीच्या मुलांबरोबर होत्या. राहुलला त्यांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या आवारात नेले व त्यावेळी दंगल झाली. सगळे इतकडे-तिकडे पसार झाले, जो-तो आपापल्या घरी पोहचला मात्र, राहुल घरी आलाच नाही. अखेर दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह अगस्ति विद्यालयाच्या खालील बाजूस असणार्‍या मैदानावर मिळून आला. त्याच्या डोक्यात कोणीतरी पिस्तुलातून गोळी मारल्यासारखे व्रण होते. तो रक्तभंबाळ झालेल्या अवस्थेत मिळून आला. मात्र, दुर्दैव असे की, त्याच्या मागे न्याय देण्यासाठी कोणतेही मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे, राहुल जसा गेला. त्याचा देखील मृत्यू दडपण्यात आला. खरतर सिना बोरा, आरुषी हत्याकांड, अशोक लांडे खून प्रकरण कित्तेक वर्षानंतर ओपन होऊ शकते. तर देठे प्रकरण का नाही. त्यासाठी पाठपुराव करण्याची गरज आहे.
                              राहुल गेल्यानंतर त्याचा भाऊ कृष्णा हा एकटाच राहिला होता. तो हॉटल, कंपनी आणि बर्‍याच ठिकाणी काम करुन आपली उपजिविका करीत होता. विशेष म्हणजे दारुच्या दुकानात काम करुन देखील तो कधी दारु पिला नाही. मात्र, कालांतराने त्याला वाईट संगत लाभली आणि तो प्रचंड व्यसनाधीन झाला. बुधवारी तो सकाळी उठून गावातील तरुणांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक भोवर्‍यात सापडला आणि दिर्घकाळ झाला तरी तो वर आलाच नाही. ही बातमी गावातील तरुणांना समजली असता त्यांनी नदीकड धाव घेतली. त्याचा शोध घेण्यासाठी 20 ते 30 तरुणांनी कसोेशीने प्रयत्न केले. मात्र, त्याचा शोध लागला नाही. अखेर तो फार उशिराने मिळून आला. याबाबत देखील आता अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
                           एक दुसरी विशेष बाब म्हणजे याच कुटूंबातील मयत कृष्णाचा मामा अनिल शिंदे हा देखील एक राजा स्वभावाचा माणूस होता. मात्र, दिर्घ अजाराने त्यांना ग्रासले आणि खर्‍या अर्थाने शिंदे कुटूंबाला उतरती कळा लागली. त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी मिना यांनी देखील आपले आयुष्य फार काळ काढले नाही. पतीच्या पाठोपाठ त्या देखील चालत्या झाल्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांची एक मुलगी अचानक मयत झाली. हा सर्व उहापोह आता संपेल असे वाटत असताना याच कुटूंबातील मयत कृष्णाची मावशी कल्पना आडांगळे हीचे तिच्या नवर्‍यासोबत वाद झाले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले व मृत्युशी झुंज देत असताना तीने चौथ्या दिवशी मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यावेळी कृष्णाने प्रचंड धावपळ करुन आपल्या आईसमान मावशीला वाचविण्यास दिवसरात्र प्रयत्न केले होते. मात्र दुर्दैव असे की, आज कृष्णाने देखील हे जग सोडले आहे. त्याच्या मृत्युनंतर एकाच कुटूंबातील हे आठजण नकाळत मृत्युला सामोेरे गेले आहे. कृष्णाच्या जाण्याने या परिसरावर शोककळा पसरली आहे.