पिंपळगावात शेतकरी एकमेकांना भिडले, दहाजण जखमी, 15 जणांवर गुन्हे दाखल
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरे येथे शेतात जाण्या-येण्याचा रस्ता नांगला म्हणून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दहाजण जखमी झाले असून 15 जणांना आरोपी करण्यात आले आहे. ही घटना बुधवार दि.27 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. तर याच गावात गैरसमज होऊन अन्य तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. त्यामुळे सांगमनेर तालुक्यात आजकाल अनेक बडे क्राईम घडू लागले असून तेथे कायदा व सुव्यस्थेचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी जालिंदर कोकणे हे त्यांच्या शेतात नांगर हाकत होते. त्यावेळी त्यांना विरोध करणार्या आरोपींनी त्यांना शेत नांगरण्यास मज्जाव केला. त्यावेळी कोकणे म्हणाले की, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. तुमचा बोलायचा काय संबंध, असे म्हणताच आरोपी भिकाजी सखाराम आहेर, विजय भिकाजी आहेर, संजय भिकाजी आहेर, निवृत्ती सखाराम आहेर, शुभांगी आहेर, वर्षा आहेर यांनी कोकणे यांना मारहण करण्यास सुरूवात केली. तसेच यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिराबाई कोकणे, मंगला कोकणे, निलेश कोकणे, दिलीप कोकणे, यांना दगडाने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करुन म्हणाले की, रस्त्यावर आलात तर तुमचा बेत पाहू. त्यामुळे कोकणे यांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर संजय आहेर यांनी दिलेल्या दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी हे संगनमनाताने शेतात आले होते. त्यावेळी त्यांच्या हातात काठ्या व गज होते. तसेच काहींच्या हातात दगडे होती. तेव्हा आहेर यांचा भाऊ म्हणाला की, आमच्या शेतातून जाण्या येण्याचा रस्ता नाही. त्यावेळी आरोपी दिलीप कोकणे यांनी विजय भिकाजी आहेर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचे वाद सोडविण्यासाठी भिकाजी आहेर, शुभांगी आहेर, वर्षा आहेर, संजय आहेर हे आले असता जालिंदर कोकणे व सुरेश कोकणे यांनी दगड फेकून मारले. त्यात संजय आहेर व शुभांगी आहेर यांना दगड लागून ते जखमी झाले. आरोपी गोविंद कोकणे यांनी त्यांच्या हातातील काठीने संजय आहेर यांच्यासह अन्य व्यक्तींना मारहाण केली. आमच्या नादाला लागल तर एकएकाला संपवून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे दिलीप कोकणे, जालिंदर कोकणे, सुरेश कोकणे, गोविंद कोकणे, अनुसया कोकणे, निलेश कोकणे, मंगल कोकणे, मिराबाई कोकणे, कोंडिबा कोकणे (सर्व रा. कोकणेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पिंपळगाव काझिरे येथेच एकमेकांच्या समोरासमोर राहणार्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले. केवळ आवाज देताना गैरसमच झाला या शुल्लक कारणाहून दत्तात्रय लहानु शिंदे यांना गज व दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार युवराज संजय गुंजाळ, देविदास सावळीराम पवार, चंद्रकला देविदास पवार (सर्व रा. पिंपळगाव कोंझिरे) यांना आरोपी करण्यात आले आहे.