आरे देवा.! संगमनेरमध्ये पुन्हा 33 किलो गांजा पकडला, चौघांना अटक, एकूण 490 किलो गांजा जप्त.!
सार्वभौम सह्याद्री (संगमनेर):-
संगमनेर शहरालगत असणाऱ्या सुकेवाडी परिसरात 456 किलो गांजा पकडला नाही तेच संध्याकाळी पुन्हा 33 किलो गांजा संगमनेर शहरातील गोल्डन सिटी येथे मिळुन आला. यामध्ये तब्बल 8 लाख 21 हजार 125 रुपयांचा गांजा हस्तगत केला असुन याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. शुभम चंद्रकांत जाधव (वय 28, रा. इंदिरानगर गल्ली, ता. संगमनेर), विशाल अशोक गायकवाड (वय 22, रा.जनतानगर, ता. संगमनेर), प्रथमेश अशोक पावडे (वय 22, रा. इंदिरानगर, ता. संगमनेर), परवेझ दाऊद शेख (वय 26, रा.साईश्रद्धचौक,घुलेवाडी ता. संगमनेर) आशा चौघांना अटक करण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरा झालेल्या कारवाईनंतर पहाटे विजय आण्णा खुळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरतरं, नाशिकच्या टीमने कारवाई केल्यानंतर आता संगमनेर शहर पोलिसांना जाग आली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात उच्चभ्रूअसणाऱ्या वस्तीत गांजा मिळुन आला हे खाकीला माहीत नसावे का? गांजातील फरार महिला आरोपी आजही गांजाचे रॅकेट चालवत असल्याची चर्चा होत असुन या महिलेला कोणाचा आशीर्वाद आहे. असे एक ना अनेक प्रश्न संगमनेरातील जनतेने उपस्थित केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोल्डन सिटी परिसरात काही तरुणांकडे अम्ली पदार्थ असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी गोल्डन सिटी येथे गांजाचे रॅकेट चालते त्या गाळ्याबाहेर सापळा रचला. त्यांच्या संशयीत हालचाली पाहुन खात्री झाली की या गाळ्यात गांजाची मोठी तस्करी चालत असल्याचे लक्षात आले. मात्र, इतका मोठ्या प्रमाणात गांजा असल्याने सहाजिकच पोलिसांना त्यांनी नकार दिला. त्यानंतर पोलीस गाळ्यात घुसले. गाळ्याची संपूर्ण झडती घेतली असता गोण्यामध्ये पॅकेट दिसुन आले. अजुन कुठे माल आहे असे विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवली असता ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी जिथे जिथे लपवून ठेवलेला गांजाचा माल सर्व पोलिसांना सांगितला. जेव्हा भरलेल्या गोण्या उचकल्या त्यामध्ये देखील गांजा मिळवून आला.
दरम्यान, पोलिसांनी सोबत नेलेले पंच, फोटोग्राफर व वजनकाटा यांच्या सहाय्याने सबळ पुरावे जमा करण्यात आले. त्यावेळी त्या गोण्यामध्ये 22 किलो 900 ग्रॅम असा 5 लाख 73 हजार रुपयांचे हिरवट पाने,काड्या व बिया असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वास असलेला गांजा मिळून आला. तर दुसऱ्या गोण्यामध्ये 9 किलो 905 ग्रॅमचा 2 लाख 47 हजार 625 रुपयांचा गांजा मिळुन आला तर असा एकुण 8 लाख 21 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी आज पहाटे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शुभम चंद्रकांत जाधव (वय 28, रा. इंदिरानगर गल्ली, ता. संगमनेर), विशाल अशोक गायकवाड (वय 22, रा.जनतानगर, ता. संगमनेर), प्रथमेश अशोक पावडे (वय 22, रा. इंदिरानगर, ता. संगमनेर), परवेझ दाऊद शेख (वय 26, रा.साईश्रद्धचौक,घुलेवाडी ता. संगमनेर) आशा चौघांना अटक करण्यात आली आहे. ही दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पो.ना.बाबासाहेब सातपुते, पो. कॉ. विजय खुळे, राहुल पांडे, विजय आगलावे यांनी ही कामगिरी केली.
दरम्यान, संगमनेर शहर हद्दीतील वर्षानुवर्षे गांजा मध्ये मुख्य आरोपी असलेली महिला फरार आहे. तिचा पती मयत झाल्यानंतर सर्व विधीमार्ग फरार महिला आरोपीने संगमनेर शहरात पार पाडले. आशावेळी या महिलेची खबर तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांला लागली. त्यांनी फरार महिला आरोपीला अटक न करता मोठा मलिदा घेतला असल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस वर्तुळात सुरू आहे. आता ही फरार महिला कोणाच्या आशीर्वादाने गांजाचा रॅकेट चालवते. तिला खाकीकडूनच अभय तर नाही ना? असे अनेक अनोतरीत प्रश्न उपस्थित होत असुन पोलीस कारवाई करणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, नगरपालिका निवडणूक सुरू असताना हा राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा होऊन अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. 2 तरखीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुररुवात केल्याचे बोले जात आहे.
