कमिशनच्या वादातून दोन गटात हाणामारी, मिर्चीची पुड डोळ्यात फेकत हाथोड्याने मारहाण, दोघांवर गुन्हे दाखल,

 

सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :- 

                             संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी परिसरातील प्लॉटचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कमिशनच्या वादातून दोघांनी एकाच्या डोळ्यात मिरची टाकुन हातोडी मारून दोन लाख व सोन्याची अंगठी, चैन पळवल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 6 डिसेंबर 2025 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास तारापानच्या वरील कॉम्प्लेक्स मध्ये घडली. याप्रकरणी प्रणव सुभाष जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन फटांगरे व विवेक रोहकले (रा. लॉ. कॉलेज मागे, घुलेवाडी) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असुन त्यांचा तपास पोलीस करत आहे. मात्र, एवढ्या गजबजलेल्या परिसरात दिवसा ढवळ्या अशी मिरची पावडर बाळगुन लाखो रुपये पळवत असतील तर सुशिक्षित लोक देखील आता पैश्याच्या वादात नको त्या टोकाचा विचार करून जीवघेणे हल्ले करत असल्याचे संगमनेरात पाहायला मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रणव जोर्वेकर यांचा कंट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांनी दहा महिन्यांपूर्वी घुलेवाडी येथील गट नं.108/12/1 याचा व्यवहार चालू असताना खरेदी विक्री करणारा एजंट सचिन फटांगरे याने विवेक रोहकले याच्या सोबत भेट घालुन दिली. त्यानंतर व्यवहार चालू असलेला घुलेवाडी येथील जमीन आरोपी विवेक रोहकले यांना पाहिजे असे सांगुन त्या व्यवहाराचा आलेला खर्च तक्रादार प्रणव जोर्वेकर यांना काढुन दिला. तो व्यवहार झाल्यापासून आरोपी सचिन फटांगरे व विवेक रोहकले हे दोघे ही गेली अनेक महिने संपर्कात नव्हते. त्यानंतर दि. 3 डिसेंबर 2025 रोजी पासुन आरोपी सचिन फटांगरे व विवेक रोहकले हे प्रणव जोर्वेकर याना फोन करू लागले. तुम्हाला भेटायचे आहे असे वारंवार फोन करून बोलत होते. परंतु, प्रणव जोर्वेकर हे बाहेर गावी असल्याने त्यांची भेट झाली नाही.

          दरम्यान, शनिवार दि.6 डिसेंबर 2025 रोजी प्रणव जोर्वेकर हे सकाळी 10 वाजता आठवडा बाजार असल्याने कामगारांचे पेमेंट करायचे असल्याने ते ऑफीसवर पैसे घेऊन आले. त्यानंतर 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी विवेक रोहकले याने प्रणव जोर्वेकर यांना फोन केला आणि ऑफीसवर येतो असे सांगुन फोन कट केला. त्यावेळी ऑफीस मध्ये प्रणव जोर्वेकर यांचा मित्र आला आणि दोघांमध्ये गप्पा रंगल्या. तेवढ्यात ऑफिसवर आरोपी सचिन व विवेक हे आले. ते चर्चा करण्याच्या उद्देशाने नाहीतर वादाच्या तयारीत आले. त्यांनी दहामहिन्यांपूर्वीचा जमिनीच्या व्यवहारावरून वाद करू लागले. तेव्हा प्रणव जोर्वेकर यांनी सचिन व विवेकला समजावून सांगितले की, तुमचा आणि जमीन मालक यांचा व्यवहार आहे. असे सांगत असतानाच सचिन व विवेकने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी म्हणाले की, अजुन 5 लाख घालीन पण तुझा कार्यक्रम करील अशी दमदाटी करू लागले.

       दरम्यान, आरोपी सचिन फटांगरे हा मारहाण करू लागला. त्यावेळी आरोपी विवेक रोहकले याने पाठीमागुन प्रणव जोर्वेकर याना पकडले. हा वाद पहिल्या नंतर प्रणव जोर्वेकर यांचा मित्र बाहेरील लोकांना आवाज देण्यासाठी गेला. तेवढ्यात आरोपी सचिन फटांगरे याने प्रणव जोर्वेकर यांच्या गळ्यातील चैन हाताने ओढली व खिशात घातली. हातातील सोन्या चांदीची अंगठी देखील काढुन घेतली आणि म्हणाला की, हे आमचे कमिशन झाले. आणि दोन लाख रुपयांची पैश्याची पिशवी हातात घेऊन म्हणाला की, हे आमचे मुद्दल आहे. असे म्हणताच आरोपी सचिन फटांगरे याने कंबरे पासुन हातोडी काढुन प्रणव जोर्वेकर यांच्या हातावर व पाठीत मारली. प्रणव जोर्वेकर खाली वाकले असता त्यांच्या तोंडावर मिरचिची भुकटी फेकुन तेथुन आरोपी सचिन व विवेक यांनी पैश्यांची पिशवी, सोन्याची चैन, अंगठी घेऊन धूम ठोकली. त्यानंतर प्रणव जोर्वेकर यांच्या मित्राने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर प्रणव जोर्वेकर यांचा पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन फटांगरे व विवेक रोहकले (रा. लॉ. कॉलेज पाठीमागे, घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.