कोरोनामुळे घरात नवरा व सासु त्रास देते? तत्काळ सखीला फोन करा, महिलांसाठी शासनाचा अनोखा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी) :
                          कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 24 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. यात संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे, अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपासमारी व मानसिक प्रश्न अशा अनेक समस्यांबरोबर आणखीन एक महत्वाच्या समस्येला अनेक महिल सामोरे जात आहे. लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम यामुळे अनेक घरातून कुटुंबातील सर्व व्यक्ती घरी आहेत. याचा परिणाम म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्येत वाढ झाली असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे महिलांना घराबाहेर पडून तक्रार करणे शक्य होत नाही.त्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे.म्हणून सखी वन स्टॉप केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.  
 
वास्तव पाहिले तर, महिला जितक्या घराबाहेर सुरक्षित नाहीत तितक्याच त्या घरामध्ये देखील सुरक्षित नाहीत असे यावरून लक्षात येते. या परिस्थितीत देखील महिलांवर शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारची हिंसाचारास सामोरे जावे लागत आहे. या घटानांमध्ये सद्या लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे. अशा हिंसाचारच्या बळी ठरलेल्या महिला व मुलींना मानसिक, शारीरिक व कायदेशीर मदत तातडीने मिळण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर नगरच्या डिएसपी चौकात उपलब्ध करण्यात आले आहे. या सेवेचा समावेश आपत्कालीन सेवेमध्ये करण्यात आला आहे. पीडितेला तात्पुरता निवास व भोजनाची मोफत व्यवस्था आणि 5 दिवसांपेक्षा जास्त निवासाची आवश्यकता असल्यास महिलांसाठीचे अधिकृत आधारगृह येथे अश्या महिला आणि मुलींची व्यवस्था होऊ शकते.
कौटुंबिक हिंसा किंवा इतर कुठल्याही हिंसेने पिडीत महिलेस, महिला व बालविकास मंत्रालयाच्या, सखी वन स्टॉप केंद्र येथे 24 तास सेवा व आधार उपलब्ध आहे. पिडीत महिला आणि मुलींनी सखी वन स्टॉप केंद्र 0241 2955555;9011020175 किंवा स्नेहाधार हेल्पलाईन 9011363600 या क्रमांकावर मदतीसाठी फोन करावा.

महिलांच्या आधारासाठी हा उपक्रम
जसे कोरोनाचे संकट आले आहे. तेव्हापासून सर्व कुटूंब घरात बसून आहे. अशा वेळी महिलांवर कामाचा ताण वाढला आहे. एकाच वेळी प्रत्येकाच्या गरजा भागविताना तिच्या नाकीनव येत आहे. त्यामुळे, तिची मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. त्यामुळे बहुतांशी महिला असे अन्याय सहन करीत असून त्यांना कोठे तक्रार देखील करता येत नाही. त्यामुळे, तिची हतबलता अधिक वाढू नये. म्हणून एक आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
- प्रिया सोनवणे (समन्वयक)