नगरचे राजकारण, अवैध धंदे व पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कसरत.!


अहमदनगर : 
                 नगरचे पोलीस अधिक्षक पद म्हणजे गेल्या अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होय. काल अखिलेश कुमार सिंह हजर झाले आणि अनेकांच्या नावाला पुर्णविराम मिळाला. अर्थात प्रश्न कोठे थांबत असतात का? साहेब हजर झाले आणि पहिला प्रश्न समोर आला. हे नेमकी कुणाच्या तालमीतले आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे स्वभाव कसा आणि तत्वांशी तडजोड करतात का? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आता त्यांच्या महिनाभरानंतरच्या कार्यकाळातच लक्षात येतील. कारण, आमच्या पत्रकारीतेच्या काळात आम्ही बर्‍यापैकी एसपींची कार्यपद्धती पाहिली. ते आल्यानंतर बैठक घेतात, दोन शब्द खडेबोल सुनावतात, दुसर्‍या तिसर्‍या मिटींगमध्ये कोणालातरी खुलोआम झापतात. त्यानंतर दहशत उभी राहते आणि नंतर छापे, कारवाई, निलंबन, अ‍ॅलीकेशन व कठोर भूमिका. महिना-दिडमहिना हे सुरू असते. त्यानंतर नव्याचे नऊ दिवस संपले की, बदल्या आणि थेट एलसीबी यापलिकडे बदली होइर्यंत असते तरी काय?
अर्थात एसपी ही एक नैसर्गिक पद्धत झाली तरी, आता यावेळी मात्र असे चित्र असेल असे वाटत नाही. कारण, पुर्वी नगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष असा सगळ्यांचाच बोलबाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राखताना कोणाची मनधरणी राखायची ही फार तारेवरची कसरत असणार आहे. एकीकडे पवार घराण्याची वारसा जामखेडमधुन उभा राहिला आहे. त्यामुळे, जरी रोहित पवार मंत्री नसले तरी त्यांचे वजन एखाद्या मंत्र्यापेक्षा कमी बिल्कूल नाही. तर त्यांच्याच विरोधात माजी पालकमंत्री असून तेथील कलगीतुला तोडविताना साहेबांच्या नाकीनव येणार आहे. कारण, शिंदे यांनी जामखेड हाताळताना त्यांच्या काळात चार पोलीस अधिकार्‍यांनी व एक अप्पर पोलीस अधिकार्‍याने हात टेकल्याचे पोलीस दलातून बोलले जाते. 
            श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातून कधी पोलीस अधिकारी व अधिक्षकांना कधी फारसा त्रास जाणवत नाही. तेथे झाला तर रसाळ कंपनी व कुख्यात गुंडांकडून होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि श्रीगोंद्यात गेलेले अधिकारी पुन्हा तेथून बदली करण्याचे नावच घेत नाहीत. तेथे बोटीच्या वाळुतस्करीत ते स्वत:ला गुंतून घेतात. त्यामुळे हे दोन्ही तालुके राजकीय दृष्ट्या फार सोज्वळ व सामंजस आहे. कारण, औटी साहेब जेव्हा विधानसभेवर उपाध्यक्ष होते. तेव्हा देखील त्यांनी कधी फारसा मिजास गाजविला नव्हता. त्यांच्यापेक्षा शहरात भैय्यांनी सत्ता असतांना शहर दणाणून सोडले होते. राहिला प्रश्न पाचपुते साहेबांचे. त्याचेतर नशिबच फुटके म्हणावे लागेल.
आत सर्वात स्पोटक फलंदाजी तर शहरात आहे. कारण, येथे सत्ता, गुन्हेगारी, डावपेच, पोलीस दलातील राजकारण, सामज सेवेच्या नावखाली चालणारे काळे धंदे, पोलीस ठाण्यात चालणार्‍या गमती, अवैध धंदे, त्यांचे खाकीतील खबरी, वाहतुक, पत्रकारांची मनधरणी, ब्लॅकमेलींग, भ्रष्टाचार, शहरातील हटके आंदोलने, कलमांचे गैरवापर, राजकीय हस्तक्षेप, खात्यावर होणारे आरोप, साहेबांचे कान भरविणारे चापलुसी, दंगली, जातीयवाद आणि या पलिकडे बरेच काही. हे सर्व त्यांना कसे झेपेल देव जाणे. कारण, पोलीस अधिक्षक आणताना तो राष्ट्रवादीतील कोठ्याचा असावा अशी मागणी जगताप कुटूंब व अन्य आमदारांची होती. कारण, खासदारकीचे अपयश पचवून शहरातील आमदारकी आणताना त्यांनी प्रयत्नांच्या किती पराकाष्टा केल्या आहेत. ते त्यांनाच माहित आहे. घरात तीन आमदार असतांना देखील त्यांना गेल्या काही काळात हकनाक किती त्रास भोगावा लागला आहे. ही त्यांची आत्मिक सल त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते विसरू शकत नाही.
           त्यामुळे, सत्ता नसतांना त्यांनी जे भोगले ते अविस्मरणीय होतेे, असे असतांना जगताप कुटूंबाने आमदारकी मिळविली. हे सगळ्यांसाठी आश्चर्याचे होते. इतके सगळे करुन सवरुन त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. ही सल देखील त्यांनाच काय सगळ्यांना आहे. मग सगळ्याच ठिकाणी नमते घ्यायचे! मग लोकप्रतिनिधी असून तरी काय फायदा? त्यामुळे त्यांची मागणी बिल्कुल गैर नसावी. त्यामुळे, शहरात भैय्याची 25 वर्ष आणि त्यांची शिवशाही तर दुसरीकडे गांधीगिरी व मनपातील सत्ता हे देखील राजकीय बळाचे केंद्र आहे. अशी सर्व गोतावळ्यात सिंह साहेब किती पाय रवून उभे राहतात. हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे.
दुसरीकडे उत्तरेचा विचार केला तर तनपुरे भलेही मंत्री असूद्या. पण, त्यांचा स्वभाव दहशती कधीच नाही. त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार नाही. तर दुसरी गोष्ट किरकोळ अपवाद वगळता ते एसपी साहेबांना फारसे त्रासदायक ठरतील असे वाटत नाही. तर पुढे क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे गडाख साहेब हे एक सुशिक्षित व सोज्वळ व्यक्तीमत्व आहे. त्यांनी 10 लाख निधी आणि आपले सुरक्षा रक्षक सेवेत दिले आहेत. मुळात गडाख घराण्याची परंपराच वेगळी आहे. त्यामुळे त्यांचा त्रास कमी. पण, नेवाशातील वाळु तस्करी, रस्तालुट व दरोडे या पलिकडे तेथे कधी कोणी कायदा हातात घेत नाहीत. हीच परिस्थिती कोपरगावमध्ये आहे. स्थानिक आमदार स्वभात: शांत असून त्यांच्याकडून नेहमी सहकार्याचा हात पुढे येतो. 
               आता मुळ प्रश्न उभा राहतो तो विखे पाटील कुटूंबाचा. गेल्या अनेक दशकांपासून हे समाजकारण व राजकारणात असल्यामुळे त्यांच्या कार्यभाराचा पसारा फार मोठा आहे. त्यांनी स्वत:ची ताकद काय आहे. हे सगळ्यांना दाखवून दिले आहे. सगळे राजकारण एका बाजुने व एकटे विखे कुटूंब एका बाजुने होते. अशी विपक्ष परिस्थितीत ते अपक्ष असतांना त्यांनी मुलास निवडून आणले व ते स्वत: मंत्री झाले. त्यामुळे, त्यांच्या राजकारणाला अंत नाही. ही एक बाजु असली तरी, त्यांचे जिल्ह्याच्या प्रशासनावर वचक आहे. त्यांना लोणी किंवा जिल्ह्यापुरते मर्यादीत रहायला आवडत नाही. तर त्यांनी प्रशासन हताळताना त्यांच्याकडे कोणी दुर्लक्ष केल्याचे त्यांना जमत नाही. त्यामुळे, पोलीस अधिक्षकांना उत्तर नगरच नाही तर नगर दक्षिण संभाळताना कोठी कसरत करावी लागले. अन्यथा विखे साहेबांनी लखमी सारखे जखमी केले होते. हे विसरुन चालणार नाही.
    तसे पाहिले तर अगदी दिर्घकाळापासून राजकारणात सर्वात सोज्वळ चेहरा म्हणून ना. थोरात साहेबांकडे पाहिले जाते. खरंतर आज त्यांचे राज्याच्या सत्तेत फार मोठे वजन आहे. त्यामुळे, त्यांची खातीरदारी करताना अनेक अधिकारी वारंवार विचार करतात. मात्र, थोरात साहेबांनी देखील जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत फारसे दबावात्मक लक्ष घातल्याचे लक्षात येत नाही. पण, संगमनेर तालुक्यात मात्र, त्यांच्या मर्जीशीवाय पान देखील हालत नाही. असे बोलले जाते. त्यांनी संगमेनर तालुका काँग्रेसचा असा बालेकिल्ला करुन ठेवला आहे की, तेथे शासन, प्रशासन, राजकारण, समाजकारण व शिक्षण अशा कोणत्याच बाबीत अन्यत्र व्यक्तीने हस्तक्षेप केल्याचे त्यांना चालत नाही. त्यामुळे, पद, प्रतिष्ठ, सत्ता व पावर असली तर ते त्यांची सरळ वाट कधीही सोडत नाही. 
                       उरला प्रश्न अकोले तालुक्याचा. तर येथे पुर्वी माजी मंत्री पिचड साहेब असतांना त्यांची फार चलती होते. जिल्ह्यातील बहुतांशी निर्णय त्यांच्याशिवाय कधीच झाले नाही. त्यांचा एकेकाळी फार मोठा दबदबा होता. मात्र, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी पाच वर्षे वगळता प्रतिनिधित्वाची फार मोठी संधी मिळाली नाही. पण, तरी त्यांचा स्वभाव भांडकुदळ नसल्याने त्यांनी प्रशासनावर अगदी कधीच उगरीची भाषा केली नाही. वेगळप्रसंगी ते स्वत: नगर गाठवून त्यांनी एसपींसोबत सलोख्याने बोलून अनेक प्रश्न सोडविले आहेत. आता मात्र, अकोल्यात तशी परिस्थिती राहीली नाही. सद्या डॉक्टर आमदार झाले असून त्यांच्या तमशी स्वभावाने ते अनेकांचे ऑपरेशन करून टाकतात. त्यांचा स्वभाव तत्वनिष्ठ असल्यामुळे त्यांच्या अपेक्षेबाहेर काम झाले की, समोरचा कोण आहे. त्यांना त्याचे काही एक नसते. त्यामुळे, जर अकोल्यात कधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर एसपी साहेबांना तो प्रश्न स्वत: हस्तक्षेप करुन निस्तारावा लागले. अन्यथा हे प्रश्न थेट विधानसभेत व गृहखात्यातून पोलीस अधिक्षक कार्यालयात येतील. त्यामुळे, अकोल्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हेच वास्तव आहे.
दरम्यान, हा सर्व उहापोह पोलीस अधिक्षकांना समजून घ्यावा लागणार आहे. कारण, नगर जिल्हा हा वाटतो तितका सरळ नाही. येथे येऊन गेलेला अधिकारी येथे येण्यास लवकर धजत नाही. तर, आलेले अधिकारी लगेच बदलून जाण्याचा प्रयत्न करतात. येथे काही क्षणात कोणते संकट उभे राहिल हे सांगणे अशक्य आहे. त्यामुळे, थोडा वेळ घेऊन का होईना त्यांनी व्यक्तीअभ्यास करुन पाऊल उचलणे गरजेचे आहे. आता राजकीय पक्ष, आमदार, मंत्री, कार्यकर्ते, वाळुतस्कर, अवैध धंद्यावाले आणि माहिती अधिकार तसेच सामान्य नागरिक यांचा ते कसा ताळमेळ बसवितात. हे पाहणे गरजेचे आहे.

सागर शिंदे
संपादक
रोखठोक सार्वभौम
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)