संगमनेर प्रशासनाचा हिंडफिर्यांना दणका 36 जणांवर कारवाई, 11 जणांवर गुन्हे दाखल, 31 जणांना उचलले
संगमनेर (प्रतिनिधी) :
संगमनेरमध्ये चार कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने फार कठोर निर्णय घेतला आहे. शहरात फिरणारे हौशे-नवशे-गवशे असे 36 नागरिक तहसिलदार यांनी आज सकाळी ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयात आणले होते. त्यांना सोशल डिस्टन्समध्ये ठेवून तब्बल 2ते 3 तास एकाच ठिकाणी बसण्याची शिक्षा दिली. प्रत्येकाचे कारण ऐकून घेतल्यानंतर माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना समज देत सोडून देण्यात आले. मात्र शहरवाहतूक पोलीसांनी रस्त्यावर फिरणार्या वाहनांना ताब्यात घेउन त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाई नंतर संगमनेर शहरामध्ये शुकशुकाट दिसून आला. तर जे 4 कोरोनाबाधित रूग्ण आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्या रिपोर्टकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे.
गुरूवार दि.2 एप्रिल रोजी प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी संगमनेर तालुका स्वयंस्फू र्तीने लॉकडाऊन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद देत सजग नागरिक घराबाहेर पडले नाही. मात्र काही अस्वस्थ आत्मे सकाळीच वेगवेगळया कारणानिमित्त घराबाहेर पडले. मीठ-मिर्ची आणि वॉकिंगच्या नावाखाली त्यांनी रस्त्यावर गर्दी केली. दरम्यान ही माहिती तहसिलदार निकम यांना मिळताच त्यांनी महसूलचे पथक वेगवेगळया भागात पाचारण करून 36 नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांना तहसिल कार्यालयाच्या आवारात सोशल डिस्टन्समध्ये बसवून त्यांची कानऊघाडनी केली. आता आपल्यावर गुन्हे दाखल होणार हे समजताच अनेकांनी दयेची याचना केली. साहेब, आम्ही परत कधीच घराबाहेर पडणार नाही.पण आमच्यावर खटला भरू नका. असे म्हणत बुजुर्गांना रडू कोसळले. अर्थात यात बरेचसे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे अनेकांना आजार जडलेले होते. त्यामुळे तहसिलदार साहेबांनी समजदारीची भूमिका घेत सर्वांना जाणीव करून देत सोडून दिले.
काल ठरल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने देखील आज रस्त्यावर दंड थोपटले. पोलीस निरीक्षक अभय परमार व सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी वाहन चालकांचा चांगलाच समाचार घेतला. वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी पहिल्यांदा या भटक्यांसमोर गांधिगिरी केली. तर, ज्यांच्याकडे सबळ कारणे नव्हती त्यांना बाकी पोलीस ठाण्यात खेचून नेले. त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करीत पुन्हा हकनाक रस्त्यावर येणार नाही. असे वदवून घेतले. त्यांच्यावर कोणतीही दया न करता कारवाई केली. आता यांच्यामागे कोर्टाचा ससेमीरा लागल्यानंतर त्यांना कोरोना हा विषाणु आयुष्यभर छळत राहील. असे मत पोलिसांनी व्यक्त केले.यात ए.पी.जोर्वेकर (रा. फादरवाडी), वाय.सी. कासार (रा. रहेमतनगर), पी. एम. खान (रा. मदिनानगर), एस. एन शेख (रा. खळी), व्ही. पी. बीग (रा. इंदिरानगर), एस. आर. शेख (रा. लखमीपुरा), एस. ई. खान (रा. एकतानगर), एम. एफ. पठाण (रा. मुगलपुरा), वाय. व्ही. त्रिभूवन (रा. खांडगाव), व्ही. सी. वैराळ (रा. मंगळापूर), एम. एम. शेख (मोलगपुरा) अशा 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान रस्त्यावर उतरल्यास प्रशासन उचलून नेते तर रस्त्यावर गाडया नेल्यास पोलीस गुन्हे दाखल करून वाहने जप्त करतात हा संदेश सोशल मीडियावर गेला असता, दुपारी 12 नंतर संगमनेर शहरात शुकशुकाट पहायला मिळाला. प्रशासनाने अशीच कठोर भुमिका घेतली तर संगमनेरातून कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.
शहरात 4 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना ताब्यात घेतले आहे. तर काही संशयित परिसर सील करण्यात आले असून त्यावर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. शहरात जे नेपाळहून आलेले 14 तबलीगी वास्तव्यास आहेत, त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर या 14 जणांना आश्रय देणार्या 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या 31 जणांचा अहवाल काय येतो हे संगमनेरकरांसाठी फार महत्वाचे असणार आहे.
संगमनेर शहरात ज्या पध्दतीने कारवाई झाली, त्या पध्दतीने अकोले तालुक्यात कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. कारखाना रोड, मॉडर्न हायस्कुल, दाटवड अशा अनेक परिसरात टोळके उभे असल्याचे चित्र पहायला मिळाले. तर विनाकारण वाहने देखील रस्त्यावर धावताना दिसली. सकाळी प्रशासनाने त्यांचे काम पार पाडले. मात्र, कारवाई कोणावर केली नाही. त्यामुळे, कोण काय करीत नाही. अशा भूमिकेत नागरिक रस्त्यावर भर्कटत असल्याचे दिसून आले.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)