आजी-माजी आमदारांनो! जरा बहुजनांकडेही पहा
अकोले (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या संकटात देश सापडल्याने जो-तो आपापल्या मतदारसंघात व समाजात व्यस्त असल्याचे दिसू लागला आहे. मात्र, शतकरी आणि बहुजन वर्गाला कोणी वाली राहिला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. विशेषत: अकोले तालुक्यात बहुजनांची व शेतकरी आणि मजुर वर्गाची मोठी कठीण परिस्थिती असल्याचे दिसत आहे. कारण, वैभव पिचड आमदार होतेे तेव्हा त्यांनी बहुतांशी बहुजन वर्गाला जवळ केले होते. त्यांच्याकडून शेतकरी व दुध उत्पादक यांच्यासाठी अनेक दिलासा देणारे निर्णय घेतले होते. मात्र, आज त्यांच्याहाती सत्ता नसल्याने त्यांना फारसे स्वरस्य राहिल्याचे दिसत नाही. सद्या त्यांनी वैराग्य धारण केले असले तरी त्यांनी समाजाप्रती आत्मियता दाखविली आहे. मात्र, शेतकरी व दुध उत्पादक यांच्याबाबत काय? केवळ आदिवासी समाजाकडे लक्ष देऊन त्यांना खावटी मंजूर केल्यानंतर तालुक्याचे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांना अशा कडूकाळ दिवसांचा अनुभव आहे. त्यांनी तालुक्यातील शेतकरी, मजूर, कष्टकरी व ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करणे अपेक्षित आहे. तर दुसरीकडे आजी आमदार जसे विधानसभेत गेले आहेत तसे त्यांनी जे काही केले ते राजुर विभागासाठीच करण्याचा सपाटा धरला आहे. येणारा बहुतांशी निधी आदिवासी भागासाठीच खर्च केला जात आहे. मात्र, त्यांनी आमदार म्हणून तालुक्यातील बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करावे. कोरोनाशी प्रत्येकाला लढायचे आहे. तो जात धर्म, पंथ पाहत नाही. आज तालुक्यात दुध आणि शेतमाल यांचे काय हाल आहे. हे त्यांनी शेतात येऊन पहावे. आमदार म्हणून काय उपायोजना करता येतील हे पाहिले पाहिजे. एकंदरीत दोन्ही आमदारांनी केवळ राजुरपुरते पर्यादीत न राहता तालुक्यातील बहुजन समाजाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. हेच आत्मियतेने सांगावेसे वाटते.
खरंतर आजी आमदार साहेब तर अजुनही कार्यकर्ते व त्यांच्या निवडीत गुंग दिसतात. त्यांचा अकोले दौरा तसा फारच कमी असल्याचे दिसतो आाहे. राजुर परिसरातील वाड्या वस्त्या व अकोल्यातील ठराविक गावे वगळता त्यांना शहराचा फारसा लळा नाही. त्यातल्या त्यात आमदारकी आली तरी स्थानिक स्वराज्य संस्था अद्याप हातात नाही. त्यामुळे, शहरात त्यांची घुसमट होत असेल. मात्र, अकोल्यात देखील सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. हे विसरुन कसे चालेल.! तर दुसरीकडे माजी आमदार साहेब. आजकाल क्वचित अकोल्यात दिसून येतात. सद्या कोरोनाच्या आपत्तीमुळे त्यांनी फक्त आणि फक्त खावटीसाठी अट्टाहास केल्याचे दिसतं आहेत. मग या तालुक्यात फक्त आदिवासीच बांधव रहातात की काय? असाही प्रश्न जाणकारांना पडू लागला आहे. बिचारे आदिवासी बांधव काही आमचे शत्रू नव्हे. परंतु तालुक्यात बहुजन समाजातील लोकं सुद्धा आहेत. हे साहेब लोकं विसरले तर नाहीत ना.!आम्ही आजी-माजी आमदार साहेबानां सांगू इच्छितो की, आज तालुक्यात पाणी उपलब्ध आहे, म्हणुनच तर शेतकरी आपलं पुर्ण भांडवल गुंतवून शेतीत राबत आहे. परंतु, या लॉकडाऊनमुळे बरेच कृषीसेवा दुकानं बंद होते, काही दळणवळणाच्या सुविधा बंद होत्या, अथात हे आज सुरू पण झाले आहेत. मात्र, त्यासाठी आमदार साहेब यांनीही लक्ष घालण्याची गरज आहे. आज खेड्यापाड्यातील बरेच दवाखाने बंद की चालु हे पहाण्यासाठी आमदार साहेब यांची टिम कुठं दिसत नाही. आजही सॅनिटायझर व मास्क अकोले तालुक्यात मिळणे दुरापास्त झालेले आहे. कुणीही ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढे सरसावत नाही. काही अपवादात्मक व्यक्ती सोडता, कोणत्याही लोकप्रतिनिधींना नागरिकांची गरज राहिली नाही की काय? असे वाटू लागले आहे. मात्र, त्याहुन महत्वाचा मुद्दा हा आहे की आज शेतकर्यांची महत्वाची रोजीरोटी ज्यावर चालतेय, तो दुध धंदा आज शाश्वत राहिलेला नाही. तो कधी बंद होत आहे तर कधी चालु. त्यामुळे शेतकरी आणि दुध उत्पादकांनर तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करावा लागत आहे. आजही प्रवरेच्या पाण्याची उधळपट्टी व आढळेच्या पाण्याबाबत मनमानी कारभार सुरू आहे.
आमदार साहेब ! हे पाणी संपल्यानंतर आपण उपायोजनेचा विचार करणार आहेत का? आज डोळ्यादेखत शेती व दुधाचे नुकसान होताना दिसत आहे व पाणी वाहुन जाताना काळीज खाली खाली झाल्यासारखे वाटत आहे. मात्र, कोणीच काही बोलायला तयार नाहीं. मात्र, आमदार साहेब! एक गोष्ट थोडे मागे जाऊन निट आठवा. तुमच्याकडे कुठलीही संस्था नसताना किंवा तुम्ही कुठल्याही संस्थेत साधे संचालक नसताना देखील या तालुक्यातील जनतेनं आपल्याला डोक्यावर हात ठेवला आणि ते डोक्यावर घेऊन नाचले. त्याच भोळ्या भाबड्या जनतेचं पाणी बोगस पद्धतीने खाली वाहुन जात आहे. हे आज कोठेतरी आम्हा शेतकर्यांच्या मनाला रूचत आहे.खरंतर कोरोनाच्या भीतीपोटी आज असे अनेक प्रश्न आम्हा शेतकर्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आहे.खरंतर आजही या तालुक्यातील प्रशासन आपली जबाबदारी किती पोटतिडकीने निभावतात आहेत. तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक आंविंद जोंधळे, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, आरोग्य अधिकारी व या सर्वांचे कर्मचारी रस्त्यावर उतरून तालुक्याची सेवा करत आहेत. पण, तालुक्यातील अन्य लोकप्रितिनिधी कोठे गेले? ज्यांना लोकांनी निवडून दिले ते का आपल्या जबाबदारी पासुन का अंग झटकतात घरात दडून बसले आहेत. हे समजण्याचा कोणताच मार्ग आम्हा जनतेकडे नाही.
आज रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून आम्ही दोन्ही साहेबांना विनंती करीत आहोत. आता शेतकरी खरचं या भयानक संकटात सापडला आहे. आपण थोडाफार विचार केलातर दुधासारखा म्हत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात तुम्हाला यश येईल. शेतकरी या संकटात कमीत कमी शुन्यटक्के नफ्यात राहिला तरी हरकत नाही. पण, त्याच्या घरात देखील चूल आहे. त्याला देखील मुलं आहेत, त्याला देखील पोट आहे. हे तुम्ही विसरू नका. साहेबांनो गैरसमज नसावा, मात्र तुम्हाला आम्ही प्रतिनिधी मानतो. आमचा आवाज आजवर तुम्ही सरकारपर्यंत पोहच केला आहे. आत देखील शासनाने शेतकरी आणि कष्टकर्यांकडे लक्ष द्यावे. या तालुक्यात माझे आदिवासी बांधव जसे आहेत. तसे बहुजन समाज देखील हातावर पोट धरुन जगत आहे. त्यांच्यासाठी देखील तुम्ही शासनाकडे काहीतरी तरी मागणी करावी. एक सांत्वन म्हणून का होईना.! पण आम्हाला अदखलपात्र करु नका. हीच एक कळकळीची विनंती आहे. कारण, आज शेतकरी उठला नाही तर उद्या आधार द्यायला जाल तेव्हा तो उध्वस्त झालेला असेल. म्हणून आमदार साहेबांनो.! जनतेच्या आर्त हाकेला आपण धावून या हिचं कळकळीची विनंती. आपला शेतकरी.!
विकास वाकचौरे (एक शेतकरी)