मानवी "नैतिक" मुल्यांच्या आभावाचा "प्रादुर्भाव" म्हणजे कोरोना- किसनजी हासे
विशेष लेख :-
मानवी उत्क्रांती पासून समाज सतत बदलत आहे. आदिमानव, संशोधन, परीवर्तन आणि अत्याधुनिक युगाचे निरीक्षण केले तर केव्हाही निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध होत आहे. मनुष्य प्राणी बुद्धिमान असल्याने गरजपूर्तीसाठी अनेक शोध लागले, बदल झाले मात्र भूकंप, पूर, वादळे आणि दुष्काळ यावर अद्यापही माणसाला पूर्ण विजय मिळविता आला नाही. नाविन्यपूर्ण शोधण्याचा व जगण्याचा हव्यास मनुष्य करीत असताना निसर्गाच्या परिसंस्थेला छेडण्याचा प्रयत्न मनुष्य करीत आहे. जगातील सर्व प्राणिमात्रांची भूक भागविण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे मात्र एक हव्यासी माणसाची इच्छापूर्ती निसर्गाकडून होईलच असे नाही. जंगलाची बेसुमार वृक्षतोड, समुद्रावरील अतिक्रमण, अत्यंत विषारी कीटकनाशकांचा वापर, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरचा प्रमाणापेक्षा जास्त वापर आणि खाण्यापिण्याच्या निसर्ग नियमांविरुद्धच्या सवयी मानव जातीला अडचणीत आणीत आहेत.
बेसुमार वाढती लोकसंख्या, मर्यादित स्वरूपातील साधनसामग्री आणि वापरातील असमतोल यामुळेही लाखो व्यक्ती उपाशी राहत असताना लाखो टन धान्य गोदामांमध्ये सडून जाते. हा विरोधाभास शब्दांकित करण्याचे कारण म्हणजे माणसाने स्वार्थासाठी निसर्ग यंत्रणेचा, शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू केला की अनेक संकटे तयार होतात. काही संकटांवर मात करता येते हे मात्र काही संकटे हे संपूर्ण जगाला वेठीस धरतात. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हे असेच जागतिक संकट सर्वत्र घोंगावत आहे. शरीराच्या पुष्टीसाठी व मनाचे शक्तीसाठी प्राण्यांनी, माणसाने काय खावे, काय खाऊ नये याचे नैसर्गिक संकेत पूर्वीपासूनच आहेत. कोणते प्राणी मांसासाठी योग्य व अयोग्य आहेत याचे संकेत मानवाला आहेत. मात्र चीनमधील वुहान प्रांतातील लोकांनी जंगली गुहांमधील वटवाघळे, अजगर, साप हे प्राणी अर्धेकच्चे खाल्ल्याने कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात घुसला आणि पुढील सर्व हाहाकार आपणास माहीतच आहे. चीनमध्ये पसरलेला कोरोना नंतर इटली, फ्रान्स, स्पेन, इराण, अमेरिका, पाकिस्तान, भारत या देशांमध्ये पसरला आणि सर्व जगाची झोप उडाली.
कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांचे विलगीकरण व उपचार एवढाच पर्याय शिल्लक राहिला. संपूर्ण जनजीवन ठप्प होत असताना प्रत्येक देशाच्या समोर प्रचंड तणाव निर्माण झाला. प्रशासन, यंत्रणेचे प्रयत्न तोकडे पडू लागल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. विलगीकरणासाठी जनतेला सक्तीने घरात बसविणे हे सर्वात कठीण काम सरकारला हाती घ्यावे लागले. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा निर्माण करावी लागली. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव थांबवणे या एकाच कामासाठी सर्व देश व प्रशासन यंत्रणा आज कार्यरत आहे. समाजचिंतन करताना असे दिसते की मानवी हव्यास हा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. यापूर्वी अनेक आपत्ती आल्या, महायुद्धे झाली मात्र जनतेला सक्तीने घरात बसविण्याचे प्रसंग फार कमी होते. कोरोना संकट टळेलही मात्र यातून मानव काही शिकणार आहे की नाही, हाच खरा चिंतनाचा मुद्दा आहे
कोरोनाशी सामाना.!
* आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर कमीतकमी ६० टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.
* आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा. आजारी असलेल्या लोकांशी तीन मीटर अंतर ठेवा.
* आपण स्वत:च आजारी असलात तर घरीच राहा. दवाखाना वगळता बाहेर जाणे शक्यतो टाळाच.!
* खोकताना किंवा शिंकताना रुमालाने, टिश्यूने तोंड झाकून मग तो टिश्यू कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा.
* वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छता आणि नेहमीचे घरगुती क्लिन्झर वापरून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे.
* सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घ्या.
* घराबाहेर पडताना शक्यतो मास्कचा वापर करा. तोंडाला मास्क लावल्यानंतर वारंवार त्याला हात लावू नका.
असे वाटल्यास तपासून घ्या
*घशात वारंवार खवखव होणे.
* सर्दीचे प्रमाण वाढत जाणे.
* वारंवार कोरडा खोकला येणे.
* अंगात कणकण व ताप येणे.
* प्रचंड अशक्तपणा जाणवणे.
==================
किसन भाऊ हासे
संपादक,
दै. युवावार्ता, संगमनेर
============
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)