प्रांताधिकार्यांचा मातृशोक आणि मातृभूमीचे उत्तरदायीत्व! आईच्या निधनानंतर अडीच दिवसात मंगरुळे साहेब कामावर!
विशेष लेख -
ऐसे मेले कोट्यान कोटी, का रडावे एकासाठी ! हे वाक्य ऐकल्यावर पहिली आठवण होते ती डेबुजी झिंगराची जानोरकर अर्थात गाडगे बाबा यांची. स्वत:च्या पोटचा गोळा मरुन पडला तरी त्यांनी समाजसेवा सोडली नाही. इतकेच काय! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा देखील मयत झाल्याचे त्यांना कळले आणि त्यांनी निरोप धाडला, तो एक जीव निघून गेला आहे. पण, इथे जिवंत माणसे मेल्यासारखी जगत आहेत. त्यांना जिवंत करण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे विधी आटपून घ्यावा. बाप रे ! किती मोठे हे उदात्त अंत:करण म्हणायचे या महान पुरूषांचे. यांच्या बलिदानाच्या गाथा वाचल्या की अंगावर काटे शहारतात आणि उरही भरून येतो. असेच आभाळाएवढे ह्रदय आज काही माणसांमध्ये दिसून येत आहे. अगदी आठवड्यापूर्वी सातार्याच्या अभयसिंह या पोलिसाची आई मयत झाली. त्याला निरोप आला आणि त्याच हाताने त्याने दुसरा निरोप माघारी पाठविला. देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे एक आई गेेली तरी मी दुसर्या आईच्या सेवेत आहे. त्यामुळे तुम्ही विधी उरकून घ्यावा. तुम्हाला आश्चर्य वाटते ना? पण होय! हे सत्य आहे. अशीच एक दुसरी कहाणी म्हणजे संगमनेर तालुक्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांची आहे.
दि. 24 मार्च 2020 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शासनाचे आदेशावर आदेश पडत होते. त्याची अंमलबजावणी करताना प्रांताधिकारी साहेब अगदी डोळ्यात तेल घालून बारीक-सारीक गोष्टीच्या माहितीचे संकलन करुन अधिकार्यांना सुचना देत होते. आदल्या दिवशी सगळी कार्यालये निद्रीस्त झाली, तरी देखील प्रांतकार्यालयाचे दरवाजे उघडेच होते. नगर शहरात तीन रुग्ण कोरोना बाधित झालेत, त्यांचे संक्रमण संगमनेर व अकोले शहरांमध्ये यायला नको! तसेच या शहरांना तीन जिल्ह्यांच्या सीमारेषा असल्यामुळे त्यांना फार मोठी चिंता भासत होती. त्यामुळे पोलीस आणि महसुल खात्याचा समन्वय राखून येथील नागरिकांना सुरक्षा कशी द्यायची? हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. तरी देखील आलेल्या संकटाच्या माथ्यावर अगदी कालियासारखे डोक्यावर थुई-थुई नाचण्याची वेळ आली तरी चालेल. पण मागे हाटायचे नाही. हा ठाम निर्धार त्यांनी केला होता. म्हणून तर मुंबई-पुण्याच्या मध्यभागी असणार्या तालुक्यांना अद्याप कोरानाचे गालबोट लागले नाही. हीच तर खरी त्यांची मिळकत होती. या सर्व परिस्थितीत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब देखील संगमनेरकरांच्या आरोग्यासाठी त्यांच्या संपर्कात होते. जरी ते राज्याचे नेतृत्व करीत असले तरी त्यांचा जीव घरट्याकडे असल्याने ते वारंवार सुचना व मार्गदर्शन करत होते.दरम्यान खरं पाहिलं तर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्या नियोजनाला सलाम करावा तितका कमीच आहे. आजवर कोठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, जे तीन बाधित रुग्ण आहे त्यांना देखील कवर करण्याचे काम यांनी केले आहे. त्यांच्या खालोखाल प्रांताधिकार्यांनी देखील आपापल्या जबाबदार्या अगदी विपक्ष परिस्थितीत कसोशीने पार पाडल्या आहेत. त्यातलेच एक मंगरुळे साहेब आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत असताना त्यांच्या पायाखालची जमीन कधीही स्थिर होत नव्हती, अशा कठीण परिस्थितीत त्यांना सकाळी 11 वाजता फोन आला. त्यांच्या मातोश्री विमलताई यांनी अचानक अखेरचा श्वास घेतला आहे. अर्थात एका मातृभूमीचे रक्षण करीत असतांना दुसर्या मातृत्वाची शोककळा यावी! हे त्यांच्यासाठी किती वेदनादायी असेल याची कल्पना न केलेलीच बरी. कोरोनाला आवर घालताना एक जबाबदार अधिकारी म्हणून आजवर ते पुरून उरले होते. पण, आत पुढे काय? हा प्रश्न त्यांच्या मनाला फार मोठ्या संकटात घेऊन गेला होता. पण, ते संविधानाने नियुक्त केलेल्या घटनेचे एक जबाबदार अधिकारी होतेे. भारत माझा देश आहे. आम्ही भारताचे एक अविभाज्य घटक आहोत. या अभिवचनाशी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. ज्या आईने जन्म दिला, तिच्या श्वासांचे अस्तित्व मिटल्याचे समजल्यानंतर देखील साहेबांनी स्वत:ची जबाबदरी सोडली नाही. कार्यालयात असताना मातृप्रेमाने त्यांचा उर भरुन आला. डोळ्यातून वारंवार आश्रू कोसळत होते, तरी देखील त्यांचा पाय बाहेर निघता निघत नव्हता. यापूर्वी वडिलांनी त्यांच्या पितृत्वाची साथ मध्येच सोडून दिली होती. आज आईने त्यांना पुरते पोरके केले होते. कुटुंबाचा एकमेव आधार म्हणून त्यांनी दुपारी काही अधिकार्यांना महत्वाच्या जबाबदार्या वाटून दिल्या आणि ते चालते झाले. मात्र, जाताना त्यांनी विचार केला की, शासनाची गाडी येथे धावपळ करण्यासाठी लागेल म्हणून ती तशीच ठेवत स्वत:ची गाडी नाशिकहून बोलावून त्यांनी तो प्रवास पुर्ण केला.
मध्ये दोन दिवसांचा कालावधी निघून गेला. तुम्हाला वाटत असेल की, त्यांनी त्यांच्या मातृप्रेमासाठी देशप्रेमाची जबाबदारी सोडली. पण, ज्या दिवशी साहेब नाशिकला गेले. त्याच वेळी तेथून त्यांनी आईला घेऊन थेट रावेर गाठले. ज्या मातीत ते लहानचे मोठे झाले तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी देखील त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि डोक्यात जबाबदारी सुरू होती. या दोन दिवसात मंगरुळे साहेबानी शासन, प्रशासन, जनता, मातृभूमी, मातृत्व आणि भावनांची सांगड घालत आपली जबाबदारी पार पाडली. अन्यथा एखाद्या अधिकार्याने जबाबदारीचे भान सोडून खुशाल सुट्ट्या घेतल्या असत्या. कसली देशसेवा आणि कोणती मातृभूमी ! असे म्हणून कुटुंब संभाळून आपली नोकरी साधणारे खात्यात कमी नाहीत.कदाचित तुम्हाला एक गोष्ट माहित असेल. 1999 साली जेव्हा सचिन तेंडुलकर इंग्लंड दौर्यावर होता. तेव्हा त्याचे वडिल रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी हजर राहून तो तात्काळ पुढील सामना खेळण्यासाठी रवाना झाला होता. त्यावेळी त्याची आई म्हणाली होती, बाळा देशसेवा तुझ्यासाठी अग्रस्थानी असली पाहिजे, मग कुटूंब. त्यानंतर सचिन मैदानात गेला आणि त्याने 101 बॉलमध्ये 140 रन काढून देशाला विजयी केले होते. अर्थात मंगरूळे साहेबांच्या मातोश्री देखील फार उदात्त अंत:करणाच्या होत्या. आपला मुलगा एका उच्च पदावर असून तो देशाची सेवा करतो हे सांगताना त्यांचे मातृत्व नेहमी उफाळून येत असे. मात्र, त्या मातोश्री आज या जगात नाहीत. त्यांच्या पश्चात आज देशाच्या मातृभूमीला माझी गरज आहे. हे लक्षात ठेवून साहेबांनी फार मोठा निर्णय घेतला. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसले. पण हे सत्य आहे की, अवघ्या तीन दिवसात त्यांनी आईचा सर्व विधी आटपून घेतला व आज सकाळी ते कामावर हजर झाले आहेत.
गेल्या अडीच दिवसात ते भलेही कार्यालयात हजर नव्हते. मात्र, प्रशासनाला असे यत्किंचितही भासले नाही. कारण त्यांनी रावेरहून संगमनेर प्रांताचा सर्व कारभार अगदी चोख पार पाडला. अर्थात त्यांना तहसिलदारांचे सहाय्य असले तरी प्रशासनाचे सर्व आदेश वेळोवेळी विभागापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे, एका डोंगराएवढ्या दु:खात देखील त्यांचे सहकारी त्यांच्या पाठिशी अगदी पहाडासारखे खंबीरपणे उभे होते. म्हणून तर आज प्रशासनात चर्चा सुरू होती, अधिकारी असावा तर असा. अन्यथा पाट्या टाकणारे अधिकारी मी माझ्या पत्रकारीतेच्या कार्यकाळात नगण्य पाहिले आहेत. साहेब ! तुमच्या धैर्याला व देशसेवेला रोखठोक सार्वभौमचा मानाचा मुजरा.
सागर शिंदे
8888782010
============
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)