राजुरमध्ये मटका आणि जुगाराचे युद्ध
देशात व राज्यात कोरोनाशी युध्द सुरू असताना अकोले तालुक्यातील राजुर गावात मात्र दारू व मटक्याचे युध्द सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. देश संकटाशी झुंज देत असताना राजुरकरांना मात्र अवैध धंदयांतून स्वत;चे खिसे भरण्याचे पडले आहे. म्हणून तर या शहरात राजरोस दारू विक्री आणि मटका बुकी यांची झुंबड पहायला मिळाली. या प्रकरणी राजुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही पंटर स्थानिक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असून त्यांनी राजुर शहरात दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र काल पोलीस प्रशासन व स्थानिक सामाजिक कार्यकत्यांनी यांची झुंडशाही मोडीत काढून कायदेशीर मार्गाने त्यांना धडा शिकवला आहे.
वास्तव पाहीले तर अकोल्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे राजुरच ठरले आहे. सध्या ते तालुक्याचे ठिकाण होईल यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्था आताच काबुत ठेवणे अपेक्षित आहे. अन्यथा आजप्रमाणे चालणारी अवैध जंगलतोड, औषधी वनस्पती व प्राण्यांची तस्करी, प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार, सामान्य आदिवासी समाजाची लूट, आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण, वरतून येणार्या निधींचा गफला असे अनेक भ्रष्टाचार आताच थांबले तर बरे. अन्यथा आजच्या मिनी जम्मू काश्मिरचा उदया बिहार किंवा गडचिरोली व्हायला वेळ लागणार नाही.
सध्याची वास्तव परिस्थिती पाहता राजुरमध्ये तीन नेत्यांचे तीन गट पडले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चढाओढ चालल्याचे पहायला मिळत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा कालचा वाद याच धर्तीवरती उफ ाळून आलेला होता. एका मटका बुकीला वाटते आपला धंदा बंद व त्याचा चालू. हे कोठेतरी बोचणारे ठरते आणि हे महाशय थेट पोलीस ठाण्यात जातात. अवैध धंदयाची माहीती देतात. पोलीसांचा ताफा घटनास्थळी पोहचतो काय, हे महाशय त्यांच्यासोबत जातात काय, त्यांच्या घरात घुसून पुढारक्या करतात काय, हे सर्व सामाजिक भान वाटत असले तरी त्याला वयक्तिक द्वेशाचे वलय असल्याचे बोलले जात आहे. मात्र यादरम्यान स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी योग्य कार्यवाही केल्याचे समाधान राजुरकरांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान यावेळी परस्परविरोधी गुन्हे दाखल होताना संविधानाच्या कलमांचा विपर्यास होताना पुन्हा दिसून आला. त्यामुळे पोलिस उपाधिक्षक सारख्या वरिष्ठ अधिकार्यास थेट राजुर गाठावे लागले. राज्यात कोरोनाची दहशत असताना असल्या फालतू गोष्टीत पोलिसबळ गुंतले तर या देशाचे कसे व्हायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. राजुरसारख्या गावात अनेक अवैध धंदे फोफावले असून रेशनिंगचा काळा बाजार लोकप्रधिनीधींच्या मुलांचा वाळूतस्करीचा धंदा आणि सत्तेच्या जोरावर चालणारी दंडेलशाही आजच राजुरमध्ये पहायला मिळत आहे.त्यामुळे जर आदिवासी भागाची प्रगती करायची असेल तर पोलीस प्रशासन व स्थानिक जाणकार नेत्यांनी राजुरच्या विकासात योग्य वेळी लक्ष घालून अवैध व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढणे गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ सामान्य आदिवासी व गोरगरीब जनतेला धाकादायक ठरेल. यात तिळमात्र शंका नाही. असे स्थानिक समाजसेवक व सजग नागरिकांना वाटते आहे.
सागर शिंदे
क्राईम स्पेशल
============
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)