अकोल्यात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.!

अकोले (प्रतिनिधी) :-
चीनमध्ये उगम पावलेला कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात येऊन पोहचला आहे. नगरमध्ये दोन रुग्ण मिळून आले असून १७ जणांच्या तपासण्या सुरु असून त्यांच्यावर योग्य कार्यवाही सुरु आहे. या सगळ्यात अकोल्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून एक दुबईहुन टूर करुन आलेल्या तरुणास त्यांनी सळूका पळू केले आहे. अर्थात तुम्हाला वाटेल की, सजग नागरिक म्हणून त्याने तपासणी करुण घेणे अनिवार्य आहे. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा तरुण उच्च शिक्षित असून सुजान नागरिक आहे. त्यामुळे, तो दुबईहुन आल्या-आल्या त्याने थेट आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. मी परदेशातून आलो आहे, मला माझ्या कोरोनाच्या संदर्भातील टेस्ट करायच्या आहेत. माझ्यामुळे देशाला व समाजाला नुकसान होऊ नये म्हणून मी संपुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. त्यावेळी त्याने प्राथमिक आरोग्य विभागाला विनंती केली होती. त्याला थोडीशी सर्दी असल्याचे त्याने सांगितले होते. त्यावर उत्तर देताना हे महाशय म्हणाले की, मेडिकलमधून तीन दिवसांच्या गोळ्या घ्या. सर्व निट होईल. वातावरणामुळे हा प्रकार घडला आहे. त्यानंतर या तरुणाने तीन दिवसांचा कोर्स पुर्ण केला आणि सर्दीही बरी झाली. तिसऱ्या दिवशी हा दुबई रिटर्न प्रवासी पुन्हा आरोग्य विभागात गेला. त्याने या विभागात रिपोर्टींग केली.
साहेब! काही चौकशी किंवा तपासणी करायची असेल तर करुन घ्या. शेवटी हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यावर साहेब उत्तरले, आम्हाला वरुन कोणतही आदेश नाहीत, चौकशी आणि सॅम्पलची सध्या गरज नाही. तुम्ही घरी जाऊ शकता. तरी देखील त्यांनी या तरुणास नाशिकला तपासणीसाठी पाठविले. त्याने गाडी पकडली आणि थेट नाशिक रुग्णालय गाठले. तेथे गेल्यानंतर साधा टेथस्कोप देखील त्याला लावला नाही, ना गोळी दिली. तपासणीची गरज नाही असे म्हणून त्यास काढून दिले. हा तरुण परत अकोल्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. त्यांनी त्यास पुन्हा जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे जाण्यास सांगितले. या तरुणाने इतकी धावपळ होऊनही तिकडे जाण्यास नकार दिला नाही. त्याने गाडी पकडली आणि थेट नगर गाठले. तेथे जाऊन त्याने आजवर घडलेली हकिकत सांगितली. तेव्हा कोठेतरी वाटले होते. किमान आता तरी त्याला सुटका मिळेल. पण, दुर्दैव असे की, तेथील डॉक्टरांनी त्यास सांगितले, तुम्हाला तपासणीची गरज नाही. पण, तरी दोन दिवसांनी तुमचे कपडे घेऊन या. हा सर म्हणत हा तरुण तेथून चालता झाला. या सर्व घटनेला तब्बल १५ दिवस उलटून गेले. त्यानंतर काल अचानक आरोग्य विभागातून फोन आला. तुमची चौकशी करायची आहे. काही टेस्ट करणे गरजेचे आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही. हे प्रशासनाने इथेच थांबविले नाही, तर पोलीस ठाण्यात त्यांनी पत्रव्यवहार केला. असे असहकार्याचे शब्द एकले आणि त्याने तोंडातच मारुन घेतली. इतकं सगळं रामायन घडवून प्रशासनाने प्रश्न केला. रामाची सिता कोण होती?

आज सकाळी या तरुणाला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरला बोलावून घेतले. तुम्हाला तत्काळ नगरला जावे लागणार आहे. तुम्ही थांबून रहा, १०८ क्रमांकाची गाडी तुम्हाला घेऊन जाईल. हा तरुण बराच वेळ गाडीची वाट पाहत उभा होता. मात्र १०८ आलीच नाही. त्यामुळे, त्याने अकोले गाठले आणि घरुन स्वत:ची बॅग भरली व तो नगरकडे स्व-गाडीने रवाना झाला. या सगळ्यात एका जुन्या म्हणीची आठवण झाली. "गाढव मेलं ओझ्याने व शिंगरु मेलं येरझऱ्याने" अशीच गंमत झाली. त्यामुळे, शारिरीक दृष्ट्या फिट असतांनाही या तरुणाला इतका त्रास सोसावा लागला. या सर्वांत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कारण, हा तरुण स्वत:हुन तपासणीसाठी गेला तेव्हा प्रशासनाला आदेशाची गरज होती. आता आदेश आला तर यांनी विदेशी वारीवाल्यांना पळता भुई थोडी केली आहे. तरी दुर्दैव असे की, हा तरुण स्वत:हुन जाऊनही अकोल्यात काही विघ्नसंतोषी लोकांनी अफवा पसरविली की, या तरुणास उचलून नेेले. खरंतर प्रशासनाने अशा व्यक्तींचा शोध घेऊन या समाजकंठकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. पण, दुर्दैवाने असे घडले नाही.
मी तेव्हाही तयार होतो अन आजही !
मी दुबईला गेलो होतो तेव्हा आम्ही ६० जण होतो. आम्ही परतल्यानंतर प्रशासनाला स्वत:हुन विनंती केली होती. तेव्हा त्यांना आदेशाची गरज भासत होती. आज १५ दिवसानंतर यांना जाग आली आहे. जर आमच्यापैकी कोणी पॉझिटीव्ह असतील त्यांच्यामुळे अन्य किती जणांना त्याची लागन झाली असेल. म्हणून प्रशासनाच्या ढिसूळ कारभारावर आरोग्य मंत्र्यांनी प्रथमत: कमांड मिळविली पाहिजे. असे योग्य नियोजन झाले तरच कोरोना आटोक्यात येऊ शकतोव.- दुबई रिटर्न प्रवासी
अकोले तालुक्यात अणखी एक महिला विदेशातून आल्याने तिच्याकडे आरोग्य विभाग चकरा मारत आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिच्यावर लक्ष असून ती आरोग्य विभागाच्या निगरानीखाली आहे. अकोल्यात कोरोनाचे सावट नसून तरी नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी तहसिल विभागाकडून वारंवार सुचना केल्या जात आहे.
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून तीन व्यक्ती विदेशातून येऊन शहरात वास्तव्यास होते. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी संबंधित व्यक्तींना पुढील तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. या चौकशी व तपासणीत कोणताही धोका नसून केवळ प्रतिबंधासाठी योग्यती काळजी घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. असे प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले आहेएकाच दगडात दोन पक्षी !
अकोल्यात अनेक ग्रामपंचायतीत शिपाई कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृतीसाठी समाजात पाठविले जाते. त्याच बरोबर त्यांच्याकडून घरोघरी जाऊन पाणीपट्टी, घरपट्टी यांची वसुली करायला लावले जाते. मात्र, एकाच दगडात चारदोन पक्षी मारण्याच्या नादात कोरोना या कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठला नाही म्हणजे बरं.! अधिकाऱ्यांचे काय जातं, गोरगरिब लोकांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शासनाने कोणतीतरी एकच गोष्ट मनावर घेणे गरजेचे आहे. असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.-----------------------------
"सार्वभाैम संपादक"
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)