आ. बाळासाहेब थोरातांचा संगमनेरात महाविकास आघाडीला "घटस्पोट".! शिवसेना राष्ट्रवादीची पुन्हा उपेक्षा.!

                     
संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                    शिवसेनेचे मोठे बंधू अर्थात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली ते महाराष्ट्र यात महत्वाचा दुवा म्हणून काम पाहिले. शिवसेना तयार नसतांना "आघाडीने" पुढाकार घेत तुम्हाला भावाची कमतरता जाणून देणार नाही.! असे "अभिवचन" दिले. राज्यात सोसायटीपासून तर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी खांद्याला खांदा लावून  घासातला घास वाटून खाऊ. असा आघाडीने शिवसेनेला शब्द दिला होता. अर्थात तो काही ठिकाणी झेडपीसाठी वापरला गेला. पण, घरधनीच घात करणारा निघाला. उद्धाव ठाकरे यांनी हक्काची मुंबई असतांना ती वाटून घेतली. ते दिल्या शब्दाला जागले. पण, इकडे जिल्हा सोडा, बाळासाहेब थोरात यांच्या  तालुक्यातच साधं एक उपसभापती पद देण्याची मानसिकता नसलेल्यांशी मातोश्रीने हात मिळविला आहे. याची खंत चक्क शिवसैनिकांनी माध्यमांना बोलून दाखविली आहे. अर्थात का न बोलावी.? कार्यकर्त्याला अपेक्षा नसते का ? ज्यांना राज्यात सन्मान दिलाय. त्यांच्याकडून तालुक्यात मुठभर सन्मान मागितला. तर, बिघडलं कोठे ? त्यामुळे, संगमनेरात चक्क माहविकास आघाडीकडून थोरात साहेबांना घरचा आहेर मिळाला आहे. काल (दि.७) जानेवारी रोजी झालेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत शिवसेेनेला ढावलल्यामुळे दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्याचा उद्रेख होत प्रकरण निषेध आणि घोषणाबाजीवर येऊन पोहचले. मात्र, एक दिवस तरी संगमनेरात शिवसेनेची सत्ता आणू.! या निश्चयाने रोषाचा समोरोप झाला आहे. 
           राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर संपूर्ण राज्यात हे त्रिशंकू सरकार यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाटाघाटी कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, या कोड्याचे उत्तर शोधत असताना नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय पत्रकारदिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेसह तिनही पक्ष एकत्र येऊ शकतात. असे सुतोवाच देत सगळ्यांना  सोबत घेण्याची "वाच्चता" केली होती. त्यामुळे याच शब्दांच्या अनुषंगाने काल शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आ. थोरात साहेबांना पत्र लिहून ते काँग्रेसच्या गटनेत्यांकडे सुपूर्द देखील केले होते. त्यात शिवसेनेला सत्तेत नियमानुसार वाटा मागितला होता. परंतु, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन सेनेला टोलवाटोलविची उत्तरे देण्यात आली. यातून थोरात गटाने एकच सिद्ध केले. की, राज्याचा फॅक्टर संगमनेरात लागू होणार नाही. येथे "हम करे सो कायदा". येथे काँग्रेसपेक्षा तालुक्यात कोणाला ही मोठे होऊ द्यायचे नाही. हिच परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. यापुर्वी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना थोरत गटाने कधीच सत्तेचा वाटा दिला नाही. काँग्रेसच्या राजकारणाचे असे आहे. "गरज सरो आणि वैद्य मरो"..!
       
होय.! तुम्हाला आठवत असेल. जेव्हा राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन होण्याची रेलचेल सुरु होती. तेव्हा हेच स्वार्था काँग्रेस शिवसेनेच्या नेत्यांची किती काळजी घेत होते. त्यांचे पुढे पुढे करीत होते. म्हणजे यांचे ज्येष्ठ व्यक्तींचे निधन झाले, तर हे संगमनेरात सेलिब्रेशन करीत होते. आणि दुसरीकडे सत्ता स्थापन व्हावी यासाठी मध्यस्ती असणारे संजय राऊत हे जरा काही आजारी पडले. तर, हेच काँग्रेसचे नेते त्यांना  पार दवाखाण्यात भेटायला गेले. वा रे.! मोह. म्हणजे सत्ता स्थापन झाली आता कोण शिवसैनिका, असेच ना ? आपले फावले त्यामुळे वैद्य मेला तरी नो टेन्शन. हिच राजकीय निती काँग्रेस करु पाहत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
          वास्तव पाहता संगमनेरात आजवर राष्ट्रवादीने थोरात गटाचे अनुभव अगदी उकळून पिले आहेत. त्यामुळे, द्या, नका देऊ आपलं सोबर पद्धतीने लढत रहायचं. उरली होती ती शिवसेना. त्यांना देखील सत्तेत असताना गाजर कसे असते याचा अनुभव येणे बाकी होेते. राज्याचा अनुषंग लक्षात घेत संगमनेरत शिवसेनेने थोरात साहेबांचा सत्कार समारंभ ठेवला होता. साहेबांना गोंजारत शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणला, थोरात साहेब..!!  तुम्ही आमची "दुष्मनी पाहिली" आता आमचे "प्रेम अनुभवा", आता मैत्री अनुभवायला, त्यांनी तर मैत्री मानली पाहिजे ना.!! त्यांना असल्या मैत्रीची गरज भासत नाही. हे त्यांनीच दाखवून दिले आहे.
         
खरतर दोस्तीत कुस्ती झाली तरी बंड पुकारायचा नाही. वरिष्ठांनी जाब विचारायचा नाही. हा पायंडा राष्ट्रवादीने तालुक्यात रुजविला आहे. त्याचा परिचय आता पहिल्यांदाच शिवसेनेला आला आहे. पण, ठाकरे साहेब सुद्धा आता काहीच बोलु शकत नाही. कारण, ते पक्षप्रमुख कम पण एक जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या तडजोडीने संघर्षाची धार प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे, येथे सुद्धा शिवसैनिकांची दाळ शिजणार नाही. त्यामुळे, महाविकास आघाडीचे उल्लंघन झाले. तरी,  कोणीच काही करु शकत नाही. हे देखील तितकेच खरे आहे. मात्र, काँग्रेसने शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसला असे म्हटल्यास काही  वावघे ठरणार नाही ?
          उलट जर उदार अंत:करणाने बाळासाहेबांनी आघाडीचा धर्म पळून शिवसेनेला उपसभापती पद दिले असते, तर एक चांगला संदेश राज्यात गेला असता. पण, मुंगसाचे आणि सापाचे वैर कधी संपुष्टात येऊच शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच, एकवेळी सत्तेसाठी राज्यात जात, धर्म, विचार, तत्व, निष्ठा हे सर्व बाजुला ठेऊन विपक्ष विचारांचे पक्ष एक येऊ शकतात. मात्र, स्थानिक पातळीवर हिंदुत्व आणि सेक्युलरीझम एकत्र येऊ शकत नाही. असाच काहीसा संदेश या तालुक्याने देऊ पाहिला आहे. वास्तव पाहता, तालुक्यात  पुरोगामीत्व जपायचं आणि राज्यात जातीवादी पक्षांशी युती करायची. हे न समजण्याइकते कोणी दुधखुळे राहिले नाही. हेच विचार उद्या आघाडीत-बिघाडी घडवून आणायला पुरक वातावरण निर्माण करीतल. हिच काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असे अभ्यासकांचे मत आहे.

- सुशांत पवसे

=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १५ लाख २५ हजार वाचक)