अकोल्यातील "भोंगळ नियोजनाने" राष्ट्रवादीचे "घड्याळ बिघडले".! पं समितीचे अपयश यांच्या माथी.!
अकोले (प्रतिनिधी) :-
काल अकोले पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी झाल्या. यात महाविकास आघाडीकडे शिवसेना व राष्ट्रवादी असे आठ, व सातेवाडी व राजूर गणाचे भाजप प्रणित असलेले डॉ. लहामटे व अशोक भांगरे यांचे अधिपत्याखाली असणारे दोन असे १० सदस्य असताना देखील अवघ्या एक सदस्याचे मने वळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. तर शिवसैनिक आपल्या निष्ठेवर ठाम राहिले. त्यामुळे, हे महाविकास आघाडीचे अपयश तर आहेच.! मात्र, स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. पुर्वी राष्ट्रवादीचे नेते हवेत गेले, त्यामुळे त्यांना राज्यातील सत्ता गमवावी लागली. या नेत्यांना शरद पवारांनी पुन्हा जमिनीवर आणले तेव्हा कोठे ओढून-ताढून सत्ता हस्तगत केली गेली. पण, दुर्दैव असे की, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना पुन्हा सत्तेची नशा चढू लागली आहे. त्यामुळे, विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कोणी डोकावून पहायला तयार नाहीत. हिच परिस्थिती अकोल्याच्या राजकारणात पहायला मिळाली आहे. स्पष्टच सांगायचे झाले. तर, तिन्ही पक्षाच्या जिल्हा व तालुक्यातील श्रेष्ठींनी योग्य वेळी लक्ष घातले असते. तर, कदाचित अकोल्याच्या पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविता आला असता. मात्र, करम-कटाळेपणा व करु, पाहु, होईल या अविर्भावाने हातची सत्ता राष्ट्रवादीने गमविली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
खरे पाहिले तर महाविकास आघाडीत अकोल्याच्या राजकारणात काँग्रेसचा फारसा काही रोल नाही. पण, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे सत्तेचे केंद्रबिंदू आहेत. पण, जसे पिचड साहेबांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर सगळी सत्ता समिकरणे बदलून गेली. विधानसभेला पिचडांचा पराभव झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती निवडीचा मुहुर्त आला होता. आता तुम्हाला वाटेल. राष्ट्रवादी हे गणित कसे जुळवू शकत होती.? तर तो एक संघटन कौशल्याचा विषय होता. पण, त्यात राष्ट्रवादी सपशेल अपयशी ठरली. अर्थात जे राष्ट्रवादीचे चार सदस्य होते. त्यांची मने वळविण्यासाठी आमदार व जिल्हाध्यक्ष यांच्यासह स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधनी सुरु करावी लागत होती. जर एक सदस्य फुटू शकतो. तर, तीन का नाही.? अर्थातच निवडीला तीन दिवस राहिले. तेव्हा राष्ट्रवादीला जाग आली. तोवर भाजपने सात जणांची संख्या अगदी निर्विवाद पक्की करुन ठेवली होती. जेव्हा राष्ट्रवादीचे नेते खडबडून जागे झाले व चाचपडू लागले. तेव्हा त्यांच्या हाती चिंगळ्या सुद्धा लागल्या नाही. हेच नियोजन किमान महिनाभर आधी आखले असते तर राष्ट्रवादीची अस्मिता किंवा पवार साहेबांच्या सहानुभूतीत त्यांना गरळ घालता आली असती. इतकेच काय ! एखादा शब्द देऊन गणिते बदलविता आले असते. पण, तहान लागल्यानंतर विहीर खोदायची.! आता हे वरवरचे राजकारण राज्यात तरी राहिले नाही. हे नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.
एक गोष्ट नमुद कराविशी वाटते. की, अशोक भांगरे, सौ. सुनिता भांगरे, जालिंदर वाकचौरे, डॉ. किरण लहामटे यांनीच तर भाजपचे चार सदस्य निवडून आणले होते. मग, यातील तीन व्यक्ती तर राष्ट्रवादीत गेल्या आहेत. याहुन महत्वाचे म्हणजे अकोल्यात राष्ट्रवादीचा आमदार झाला आहे. अधिक प्लस बाब म्हणजे, राज्यात सत्ता देखील स्थापन झाली आहे. असे असतांना येथील राष्ट्रवादीला ना राष्ट्रवादीचे चार सदस्य राष्ट्रवादीत ठेवता आले. ना त्यांच्या जिवावर निवडून आलेले भाजपचे चार सदस्य त्यांना राष्ट्रवादीत आणता आले. यात अधोरेखीत करावे वाटते. की, डॉ. लहामटे साहेब ज्या सातेवाडी गटातून झेडपी सदस्य होते. त्याच गणातील सदस्य त्यांना स्वत:सोबत ठेवता आला नाही. तर, दुसरीकडे राजूर गटातील झेडपी सदस्य भांगरे यांना देखील त्यांच्या गणातील सदस्य स्वत:कडे वळविता आला नाही. जर राष्ट्रवादीचे चार, या ऱाजूर व सातेवाडी गणातील दोन, शिवसेनेचे चार असे १० सदस्य जमा केले असते. तर, राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता पंचायत समितीवर आली असती. आता कोणी म्हणेल, हे कसे शक्य आहे. पण, बुद्धीबळात योग्य चाली, आखाड्यात योग्य डाव आणि राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. की अशक्य असे काहीच नाही. हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही सांगायची गरज नाही. फक्त शरद पवार या व्यक्तीचा एक धडा त्यांनी अभ्यासावा. बस इतकच.!
माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तेच केले आहे. जे यांना अशक्य वाटले. ते त्यांनी अगदी सहज शक्य करुन दाखविले आहे. जर राष्ट्रवादीचे सदस्य भाजपला मदत करु शकतात. तर, भाजपचे सदस्या भांगरे व डॉ. लहामटे यांना वळविण्यात का अपयश आले ! हा सरळ-सरळ प्रश्न आहे. तसेच. भाजपचे चारही सदस्य कि ज्यांनी पिचडांच्या गटाविरुद्ध निवडणुक लढवून ते पुन्हा भाजपतच स्थिर ठेवण्यात पिचडांना यश आले. तेच राष्ट्रवादीच्या सदस्यांना स्थिर ठेवण्यात यांना अपयश का आले ? हा देखील उघड-उघड प्रश्न आहे. अर्थात राष्ट्रवादीत स्वत:च्या चुका मान्य करणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याईतकी राहिली आहे. त्यामुळे, त्यांना अपयश मान्य होणार नाही. घोडेबाजार वैगरे-वैगरे म्हणून पळवाटा शोधल्या जातील.
पण, सत्यापुढे आणि प्रामाणिक प्रयत्नांपुढे कोणाचे घोडे आणि गाढवं देखील चारा खात नाही. हे आपण विधानसभेला पाहिले आहे. त्यामुळे, काल राष्ट्रवादीचे नियोजन कमी पडले हेच प्रखर सत्य आहे. आणि दुसरी अत्यंत मार्मिक व वास्तववादी गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादीच्या मागे जनता उभी आहे. मात्र, एकही खमक्या व प्रस्तापित पुढारी नाही. हे त्यांनी विसरु नये. बाकी सद्या ज्यांनी कोणी भाजपत जाऊन राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ते अॅन्टी नेते आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि तालुक्यात कमळ. तरी सर्व अलबेले सुरु आहे. करुन सवरुन नामानिराळे हाच राजकीय ट्रेंन्ड निर्माण होऊ घातला आहे. यात घुसमट होेते ती सामान्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची. त्यामुळे, जाणकार कार्यकर्त्यांनी आता कानाला खडा लावल्याचे दिसू लागले आहे. असेच होत राहिले. तर, उद्याचा काळ राष्ट्रवादीसाठी घातक ठरेल. असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.