आठवलें साहेबांचा खेळ झाला आणि कार्यकर्त्याचा जीव गेला.! कटू पण सत्य.!*

                 
प्रासंगिक लेख :-
                       काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब अकोल्यात आले होते. त्यांचा मिजास पाहिला तर खुद्द डॉ. बाबासाहेबांच्या अनुवंशाचा होत नाही. इतके लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. ते जेव्हा एखाद्या जिल्ह्यात जातात तेव्हा तेथील सामान्य कार्यकर्ता अक्षरश: स्वत:ला "गहाण" ठेऊन त्यांची "उठाठेव" पुरी करतो. त्यामुळे, "दलाल" आणि "प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून" जे पैसे वसूल करतात त्यांचे सोडा. पण, निष्ठावंत आणि चळवळीशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याचे या बड्या नेत्यांना खुश करताना सगळे आयुष्य "बरबाद" होऊन जाते. "रिपाई" सत्तेत असो वा नसो.! पण, त्याच्या हातातलं तेलही जाते आणि तूपही.! हाती फक्त धुपाटने येते. असाच काहीसा अनुभव काल साहेबांच्या दौऱ्यात आला. सत्य आणि निष्ठा याचे मुल्यांकन कधी होत नसते. त्याचा सारांश शुन्य असतो. कलंक आणि बदनामी हेच त्यांची बक्षीसे असतात. असे अनेक प्रमाण विजय वाकचौरे यांच्या भाषणातून अनुभवायला मिळाली. माहीत नाही.! हे मांडणे चूक आहे की बरोबर. पण, हे बाकी नक्की कोणत्याही साहेबांच्या सोबत चळवळ करताना त्यांचे बळ वाढते आणि कार्यकर्ता संपतो. हेच अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे, हा लेख केवळ एका घटनेवर आधारीत असला. तरी, तो प्रत्येक पक्ष, नेता आणि कार्यकर्ता. यांच्यासाठी लागू होतो.
             सकाळपासून आपले साहेब येणार म्हणून त्यांच्याघरी दिवाळी सुरु होती. उभी हयात त्यांनी कधी इतक्या आनंदाने त्या कौलारु घरांच्या भिंतींना रंग दिला नसावा. पण, तीन खोल्यांचा तो खोपा त्यांनी अगदी चकाकून टाकला होता. गेली ४० वर्षे त्यांच्या पत्नीने रोज घरात येणाऱ्या कार्यकर्त्याचे गोड तोंड केल्याशिवाय पाठविले नाही. त्यामुळे, आज तर त्यांच्या पतीने ज्यांना आदर्श मानले, त्यांचे पाय आज घराला लागणार होते. सकाळी सडा शिपल्यापासून रांगोळी काढेपर्यंत सगळं शिवार स्पुर्तीने फुलले होते. त्यांचे घरही रानमळ्यात असल्यामुळे समोरचा डोंगर जणू घराला तोरणच भासत होता. साहेब सकाळीच नाष्ट्याला येणार होते. त्यामुळे, लालबुंद जिलेबी आणि बटाटवड्यांचा खमंग वास शिवारभर पसरला होता. आता आठवले साहेब म्हणजे आख्खी रिपाई त्यांच्या पाठीशी जिल्हाभर फिरते. त्यामुळे, दोन-चारशे लोकांचा नाष्टा तयार करताना घरातील मानसांना दोनाचे चार हात करुन काम करावे लागत होते. पण, साहेब येणार म्हटल्यावर केव्हढा तो आनंद,  बाप रे.! इतकी उत्कंठा तर चातकालाही पावसाची नसावी.
         आज साहेब येणार म्हणून तालुक्यातील नेत्यांनी पाच किलोमीटर सगळे बोर्डच बोर्ड लावले होते. काल जे रोजाने कामाला जाऊन उद्याचे तेलमीठ आणणार, त्यांचे देखील गोरेपान चेहरे बॅनरवर झळकत होते. देव जाणे.! आठवले साहेबांनी त्यातील एखाद्या बॅनरकडे डोकावून देखील पाहिले असेल की नाही. तुम्हाला आठवतय ना.! मा. मुख्यमंत्री महोदयांची "महाजनादेश यात्रा" अकोल्यात आली होती. तेव्हा १० किलोमिटर बॅनर लागून लाखो रुपयांची उधळण दोन वेळा झाली होती. महायुतीच्या प्रचारात निळा, भगवा, पिवळा आणि कमळही फडकले. अन झाले काय ? महाविकास आघाडी करताना कोणत्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याचा विचार केला ? त्यामुळे, निष्ठावंत फक्त कार्यकर्ता असतो. नेत्याला सत्तेच्या मोहासाठी प्रत्येक पक्षाची दारे उघडी असतात. म्हणून नेते उभे राहतात आणि कार्यकर्ते संपतात. हेच त्रिवार सत्य आहे. म्हणून तर स्पष्टच सांगायचे ठरले तर नेता मोठा होत गेला आणि त्याचे कार्यकर्ते व्याजाने पैसे काढून, जमीनी विकून त्यांची उठाठेव करत दुबळे होत गेले.
             
  काल, विजय वाकचौरे यांच्या दोन शब्दांनी देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दु:खी आयुष्याचे उत्खनन झाले. नकळत नेता या शब्दाला द्वेषाचा रंग चढला. जीव गुंतला तो फक्त वैचारिक चळवळीत. म्हणून तर आयुष्य खर्च घालून प्रेमाची मानसे सोडून हाती काहीच आले नाही. हिच तर खंत त्यांचा आत्म्यातून बाहेर पडली आणि सगळा मंडप गदगदून गेला. अनेकांचे डोळे पान्हावले होते. थरथरत्या शब्दांनी ते उत्तरले. साहेब.! तुम्हाला आठवतय ना ? सन १९८० साली आपण मुंबई एकत्र होतो. त्यानंतर १९८२ साली मी गावी आलो आणि तेव्हा त्याच वर्षी एक पँथर म्हणून माझ्या मोडकळीस आलेल्या घराला चळवळीने झिजलेले तुमचे पाय लागले होते. तेव्हा जी उर्जा आणि आनंद माझ्या उरात होता, अगदी आजही तो तसाच आहे. तितकेच प्रेम आहे. तितकीच आत्मियता आणि जिव्हाळा आहे. इतकेच काय ! साहेब.! तुमचा कार्यकर्ता म्हणून तरुणाईत ज्या घरात राहात होता. अगदी आयुष्य खर्ची पडले तरी त्या घराची कौले देखील मी बदलू शकलो नाही. पडक्या भिंतींना पोचारा देणारी वृद्ध आई आज तुमच्या शेजारी बसली आहे. बदलले काय आहे. तर, बाप इस्टेट म्हणून पाच एकर जमीन होती. ती चळवळ आणि कार्यकर्त्यांना उभे करण्यात कोरुन कोरुन उरले फक्त दोन एकरचे तुकडे.! या पलिकडे तुमचा कार्यकर्ता म्हणून मी आजही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहिल.
                गेल्या ४० वर्षात जग बदललं, तुम्ही मंत्री झालात, मागून आलेले नेते धनबलाढ्य झाले. पण, मी विजय असून माझ्या वैयक्तीक आयुष्याचा पराभव झाला. असेच काहीसे बोल, त्यांचा काळजातूनबाहेेर पडले आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांची परवानगी न घेताच आश्रू पदरावर कोसळले. आईचा थरकाप होऊन त्यांनी पदराने डोळे पुसले, पहाडासारख्या मुलांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. आजवर त्यांनी नेता म्हणून जी माणुसकीची कमाई केली. त्यांच्या डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. भाऊंनी थरथर कापणाऱ्या हाताने माईक जवळ करुन आधार घेतला आणि शब्दांना लगाम घातला. साहेब.!  तुम्ही माझ्या घरी आलात. हेच माझे महतभाग्य आहे. चळवळीसाठी जगलोय आणि आता चळवळीसाठीच मरायचे. जेव्हा कधी बंड पुकारला. तेव्हा एक वैराग्य म्हणूनच. पण, तेव्हा कोण्या पक्षाला जवळ केले नाही. ना पक्ष काढला. एका आंबेडकरी चळवळीतच मन रमवू पाहिले. आजवर कोणी आमदारकी मागितली, कोणी खासदारकी. कोणी मंडळ मागितले तर कोणी पदे. पण, स्वार्थ आणि हव्यासापोटी मी कधी चळवळ तोंडा लावली नाही. ना कधी कसला अट्टाहास धरला. जे काही मिळेल, त्यावर समाधानी रहायचे. माणसे संभाळायची, कार्यकर्त्याला बळ द्यायचे, समाज ऊभा करायचा, असेल नसेल ते घेऊन सामान्यांच्या मदतीला घेऊन उतरायचे. बहुजन म्हणत सगळ्यांना सोबत घेऊन फुले, शाहु, आंबेडकर चळवळ जीवंत ठेवायची. बस इतकच.! असे म्हणत त्यांनी आपल्या शब्दांना पुर्णविराम दिला.
         त्यांच्या शब्दात प्रचंड ताकद होती. डोळ्यात खंत आणि शरिरात हतबलता जाणवली. मंडपात बसलेल्या तीनशे कार्यकर्त्यांपैकी शंभर जणांचे तरी डोळे अगदी भरुन आले होते. स्टेजवरील संवेदनशिल मान्यवरांसह अनेकांच्या काळजाला भाऊंनी धक्का दिला. हे एक प्रखर वास्तव आहे. हे असे असले. तरी, आठवले साहेबांनी नेहमीप्रमाणे एक चुटकूला मारत सर्व वातावरण पुर्ववत केेले. मला चांगले आठवते. जेव्हा विजय वाकचौरे यांचा ५५ वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा काही तरुणांनी आठवले साहेबांना साद घातली होती. भाऊंना लाल दिवा द्यावा. तेव्हा आठवले साहेब म्हणाले होते.! मलाच नाही लाल दिवा. तर, विजू भाऊंना येणार कवा.? तेव्हा एकच हशा पिकला होता. आज साहेब..! तुमच्याकडे आला आहे लाल दिवा. तर, विजू भाऊंचा नंबर तुम्ही लवकर लावा.! असे प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. साहेब.! झिजलेल्या आयुष्याचे फळ मिळावे हीच इच्छा.!

कार्यकर्ते..!

           खरतर भाऊ इतक्या आत्मियतेना का बोलत होते. याचा "सारांश" काढला तर फार काही त्यांच्या इच्छा वाटल्या नाही. पण, तळमळीच्या भावनांमागे त्यांना इतकेच सांगायचे होते. की, रिपाई आणि चळवळीच्या झेंड्याखाली ग्रामीण भागात कार्यकर्ता स्वत:ला झोकावून देतो. ना पैसै ना पाठबळ, डॉ. बाबासाहेब म्हटलं की उपाशी रहायची तयारी करुन वडापाव खाऊन तो जगणे स्विकारतो. मात्र, चळवळीत आर्थिक सुबत्ता नसते. त्यामुळे, जर अचानक एखाद्या कार्यकर्त्याला मरण आले. तर, त्याचे संपुर्ण कुटुंब उघड्यावर पडते. आपण, किरकोळ रक्कम आणि शब्दांचे आधार देतो. पण, त्यांचे संसार चालत नाही. गेलेला माणूस पुन्हा येत नाही. परिणामी एका कुटुंबाची बरबादी उघड्या डोळ्यांनी पहायची वेळ येते. तेव्हा चळवळ नको-नको वाटते. आपण वैचारिक समाज उभा करताना नकळत तो पाडतोय की काय.? असे प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणून, त्यांची एक मापक अपेक्षा होती. आठवले साहेब आपल्या चातुर्याने आणि बळाने केंद्रात मंत्री आहेत. जरी त्यांचा शिर्डीत पराभव झाला. तरी, त्यांना केंद्रात दोन वेळा मंत्री होण्याची संधी मिळाली. जर शिर्डीतून खासदार झाले असते. तरी, विरोधी बाकावर बसावे लागले असते. त्यामुळे, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आता या मंत्रीपदाच्या चलत्या काळात त्यांनी राज्यातील कार्यकर्त्यांसाठी एखादी "पतपेढी" निर्माण केली पाहिजे. जर एखादा कार्यकर्ता अचानक दगावला तर त्या पतपेढीतून त्याच्या कुटुंबाला थोडीफार मदत आणि किमान त्याच्या मुलांचे शिक्षण तरी झाले पाहिजे. अशी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. कारण, गावाच्या वाडीवर काम करणारा वैचारिक व आक्रमक कार्यकर्ता प्रतिष्ठा कमवतो. पण, दोन वेळची रोजीरोटी आणि मुलांचे भविष्य यासाठी त्याचे आयुष्य पुरत नाही. परिणामी चळवळीपोटी तो संपतो. ही सर्वात मोठी खंत त्यांनी व्यक्त केली. अर्थात या वास्तवाला आठवले साहेबांनी कोठेतरी अधोरेखित केले पाहिजे. हे आमलात आले. तरी आयुष्य सार्थकी लागल्यासारखेच आहे.
टिप :- (वरिल लेख हा मी माझ्या परिने शब्दांकीत केला आहे. त्याचा अन्वयार्थ योग्य घेऊन मर्म व मतितार्थ समजून घ्यावा ही विनंती.)
 पुढील लेख :- अकोल्याचा राजकीय विदेशी दौरा
 - सागर शिंदे
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १५० दिवसात २५० लेखांचे १६ लाख १० हजार वाचक)