अकोल्याचे "राजकारण" म्हणजे, "दोघांचे" भांडण "तिसऱ्याचा लाभ", उदा. पिचड-भांगरे वादात लहामटेंची लॉटरी.!


अकोले (प्रतिनिधी) :-
                         राजकारण म्हटलं की कोणी कोणाची "भिडभाड" ठेवत नाही. ना आलेली "संधी" कोणी सोडत. त्यामुळे, अनेक मातब्बरांच्या तू-तू, मै-मै मध्ये तिसऱ्याचीच लॉटरी लागून जाते. असेच काही उदा. सद्या आपण राज्याच्या राजकारणात पाहिले. एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना अचानक उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील व बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रणीय असताना अजित पवार खुर्चीत फिट्ट बसले. त्यापाठोपाठ गृहमंत्रीपदासाठी अजित पवार व जयंत पाटील यांची नावे चर्चेत असताना अनिल देशमुख कोठून आले कोणास ठाऊक आणि ते बड्या पदावर बसले. हे केवळ राज्यातच नव्हे.! तर अकोले तालुक्यात बहुतांशी वेळा अनुभविण्यास मिळाले आहे. सन १९७७ पासून ते २०१९ पर्यंत असे अनेक इतिहासाचे दाखले सह्याद्रीच्या काळ्या पाषाणाच्या आठवणीवर कोरुन ठेवलेले आहे. त्याचा एक विशेष वृत्तांत माडण्याचा एक प्रयत्न केला आहे.
              तो काळ १९८० चा होता. देशाच्या बदलत्या राजकीय वर्तुळामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या. तत्पुर्वी १९७७ मध्ये आ. यशवंतराव भांगरे (काँग्रेस), बी. के. देशमुख (कम्युनिष्ट) व मधुकर पिचड (पुलोद) यांच्यात आमदारकीची चुरस झाली होती. यात भांगरे आमदार झाले. तर, देशमुख यांनी दोन नंबरची मते घेतली होती. त्यामुळे, पिचड साहेबांचे अगदी कोठेही नाव नव्हते. मात्र, १९८० साली विद्यमान आमदार यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पिचड यांच्यापेक्षा सक्रु बुधा मेंगाळ यांचे सर्वात मोठे आव्हाण होेते. पण, झाले वेगळेच. ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. तेच आमदार झाले आणि अंतर्गत वाद व मतांचे विभाजन होत. पिचड साहेबांनी २०१४ पर्यंत विरोधकांना डाव साधण्याची संधी दिली नाही.
         गेली ३५ वर्षे अशोक भांगरे यांच्या रुपाने कट्टर विरोधक म्हणून पिचडांशी पारंपारिक युद्धाचा शंख आदिवासी तालुक्यात गुंजत राहिला. या दोघांचे वैर राज्याला अगंवळणी पडले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत पिचडांनी बारामतीच्या पैलवानाला एक संधी दिली आणि त्यांनी भांगरेंच्या रुपाने त्यांच्यावर डाव टाकला खरा. पण, या दोघांच्या भांडणात तिसऱ्या डॉ.  लहामटेंचा लाभ होऊन गेला. हे झाले आमदारकीचे.! पण, तालुक्यात अशा घटना काही नव्या नाहीत. १९७९ साली देखील झेडपी व पंचायत समिती यात मोठा कलगीतुरा पहायला मिळाला होता. कारण, तेव्हा भाऊसाहेब हांडे आणि सुगंधराव देशमुख यांच्या वर्चस्वापोटी पुलोद, जनतादल यांच्यामुळे कम्युनिष्टाचे भाऊ नवले यांना सभापती करण्यात आले होेते. म्हणजे, या दोघांच्या भांडणात नवले यांच्यासह दादापाटील वाकचौरे व आर. बी. गवांदे यांना सभापती होण्याचा बहुमान मिळाला होता. म्हणजे प्रस्तापितांचा वाद सामान्य व्यक्तीला नेहमीच "साधक" ठरलेला आहे. असे "इतिहास" सांगतो.
           
 आता २०१७ ची निवडणुक पहा. अकोले पंचायत समितीत तीन पक्षाचे प्रत्येकी ४ असे १२ सदस्य निवडून आले होते. तेव्हा वाटले होते की, शिवसेनेचे नामदेव संत सभापती होतील. ते नाहीच झाले.! तर, ओपन जागेमुळे कोणी अन्य व्यक्तीला संधी मिळेल. पण, शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे अनपेक्षित मेंगाळ ताईंना सभापती होण्याची संधी मिळाली. तर, दुसरे मेंगाळ उपसभापती झाले. म्हणजे, दोघांच्या अंतर्गत भांडणात तिसऱ्याचाच लाभ होऊन गेला. आता इतकेच काय.! नियमानुसार राज्यात महाशिवआघाडी होती. त्यामुळे, शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा सभापती होणे अपेक्षित होते. पण, ऐकावे ते नवलच.! आठ सदस्य असताना भाजपचा सभापती होऊन गेला. अर्थातच शिवसेना ठाम राहिली. मात्र, राष्ट्रवादीने त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. या दोघांच्या सावळ्या गोंधळामुळे भाजपचे दोन "दत्त" पं. समितीत अवतरले.
         
  यापेक्षा अकोल्याचे दुर्दैव असे. की, जेव्हा मंत्रीपदाची लॉटरी सुरु होती. तेव्हा डॉ. किरण लहामटे यांचे नाव अगदी पहिल्याच यादीत होते. मात्र, माजी मंत्री पिचड यांच्या रुपाने अकोले तालुक्याला अनेकदा लाल दिव्याची संधी दिली होती. तर, दुसरीकडे आ. संग्राम जगताप व रोहित पवार यांच्या तुलनेत डॉक्टरांकडे कोणताही बेस नव्हता. परिणामी याला की त्याला या नादात मामा-भाचे बाजी मारुन गेले. ज्या प्राजक्त तनपुरे यांचे नाव अगदी रात्री ९  वाजेपर्यंत कोठेही चर्चेत नव्हते. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थातच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊन गेला. आता सातेवाडीची पोटनिवडणुक आहे. यात, पिचड व लहामटे या दोघांच्या तू-तू, मै-मै मध्ये तिसराच कोणी बाजी मारुन गेला. तर, वाईट वाटू देऊ नका.!

 भाग ३
सातेवाडीचा राजकीय महासंग्राम: कोणकोण आहेत इच्छूक १० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी. कोणाला कोणाचे पाठबळ, कोण कोणास जड भरेल. कोणत्या बड्या नेत्यांची कसरत असेल. कोण विजयी होऊ शकते. वाचा रोखठोक सार्वभौमचा पुढील लेख.! सातेवाडीचा राजकीय महासंग्राम : भाग ३

- सागर शिंदे

=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १३० दिवसात २४५ लेखांचे १५ लाख ८० हजार वाचक)