काँग्रेसला फुकटचे खावेना.! महाविकास आघाडीत संभ्रम कायम.! बिघाडीचे संकेत.?


 संपादकीय:- 
                  राज्यात काय.! देशात भाजपची "चलती" होती. आता येणारी १५ ते २० वर्षे सत्ताबदल होईल असे दुरवर कोठे संकेत वाटत नव्हते. अशात काँग्रेसच्या दिमतीला शरद पवारांसारखा "योद्धा" धावून आला. वय वर्षे ८० पण, तिशीतल्या तरुणाला लाजवेल असा तो उत्साह.! कोणा-कोणाला झुकविले त्याने ? वादळ, वारा, उन, पाऊस भाजप, पुतण्या, शिवसेना आणि काँग्रेस. होय.! काँग्रेस देखील. तुम्हाला आठवतात ना ते दिवस. कोण रणमैदानात उतरले होते ? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कि पृथ्वीराज चव्हाण,  सुशिलकुमार शिंदे की बाळासाहेब थोरात.? छे.! प्रत्येकाला ज्याचे त्याचे पडले होते. अशा वेळी डॉ. कोल्हे, मिटकरी, मुंडे आणि राजा म्हणून दस्तुरखुद्द पवार नामक व्यक्ती महायुतीला शह देत होता. त्यांच्या जिवावर ४४ जागा काँग्रेस जिंकू शकली. मग तरी हे फुकचे यश त्यांना पचेनासे का झाले हेच कळायला तयार नाही. युती करायची कि नाही. यापासून तर आज मंत्रीपदे कोणाला द्यायचे.! इथपर्यंत त्यांची घुळघुळ सुरु आहे. एखाद्याला असे आयते जांभूळ तोंडात मिळाले. तर, त्याला असे होते की, कधी तोंडात टाकू.! म्हणजेच कधी न मिळं आणि गटक्यान गिळं. पण, ते सुद्धा काँग्रेसला गिळू वाटेना. तसेच अद्याप या तिघाडीत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अन्य खातेवाटपाहुन वाद सुरु आहे. त्यामुळे, अनेकांमध्ये संभ्रम असून यांच्यात पाच वर्षापुर्वीच बिघाडी होऊ शकत नाही ना ? असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.

आपलं काही नाही.! ताई...साहेब म्हणतील तसं.! 

                 काँग्रेसला उतरती कळा लागली आणि राज्याचा प्रदेशाध्यक्ष कोणाला नेमायचे.? हा प्रश्न श्रेष्ठींना पेचात पाडून गेला. इकडून-तिकडून शांत, संयमी, सोज्वळ आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली. त्यामुळे चव्हाण गटाने मुरक्या मारल्या. पण, थोरात साहेब मोठे कुशल व्यक्तीमत्व ठरले. त्यांनी पवार साहेबांच्या तुळशीला पाणी घालणे सुरु केले. ते इतके नम्र वागले. की, तुळस उदार होऊन अनेक धोतऱ्यांचा जन्म झाला. एकेकाळी काँग्रेसचा राज्यातून एकच खासदार निवडून जातो.  तेथे या पक्षाचे ४४ आमदार येतात. हा किती मोठा लकलाभ. ते ही कोणावर ताशेरे न ओढता, रणमैदानी सभा न गाजविता. आता ४४ वर आपण सत्तेत बसू.! असे त्यांच्या स्वप्नाला देखील स्वप्न पडले नसेल.! तरी, त्याला सत्यात उतरविण्याचे काम पवार साहेबांनी केले. "भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची".! हे वाक्य "वंचितचे" असले. तरी, काँग्रेसची "व्होटबँक" मुस्लिम समाजाचे तेच मत होते. म्हणून त्यांनी शिवसेनेसोबत युती नको म्हणजे नको. असा नारा दिला.  परंतु, सत्तेसाठी "स्वाभिमान" आणि "विचारधारा" याला थारा नसतो. हे आपण यावेळी फार जवळून अनुभविले आहे.! त्यामुळे, दिल्लीत सोनिय गांधींशी तडजोड करीत पवार साहेबांनी राज्याच्या काँग्रेसला पुन्हा बळ दिले. ते ही फुकटच.!  इकडून तिकडून सत्ता आली खरी.! पण, कोण-कोण बनेगा मंत्री.? याहुन काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळाली. अखेर थोरात साहेब आवडत्या महसुल खात्यासह ६ खात्याचे मंत्री झाले. आता आपलं भागलं, लोकांचे काहीही हो.! याच उक्तीप्रमाणे राज्याचा कारभार आजवर केवळ ७ जण चालवत आहेत.
         मधल्या काळात वाटाघाटी होईना, झाल्या तर विधानसभेच्या अध्यक्ष पदाहुन वाद उभा राहिला. ते होते कोठे नाहीतर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद हवे हवेसे वाटले. तो प्रश्न काही अंशी सुटतो कोठे नाहीतर, काँग्रेस श्रेष्ठी म्हणाले. की, निकामी खाती संभाळण्यात आम्हाला स्वारस्य नाही. पण, झारखंडची विधानसभा ही महाराष्ट्राच्या पाश्वभुमिवर काँग्रेसने जिंकली.  हे तेथील भावी मुख्यमंत्री अवर्जुन नमुद करतात.

वेडं वाकडं मंत्रीपद मी घेणार नाही हं.!

           आता काँग्रेसला १३ मंत्रीपद आणि एक विधानसभा अध्यक्षपद मिळाले. तरी, त्यांच्यातील वाद मिटायला तयार नाही. थोरात साहेब महसुलमंत्रीपद आवटून बसले आहेत. आता प्रतिष्ठीत दोन्ही चव्हाणांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदे भोगली आहेत. त्यांना जर संस्कृतीक मंत्री केेले. तर, त्यांना ते साजेसे वाटणार नाही. म्हणून तर काँग्रेसचे घोेडे आडून बसले आहे. आता शिवसेना व राष्ट्रवादी यांची मंत्रीपदाची यादी तयार आहे.! राहिले ते फक्त काँग्रेस. केवळ राज्यात तरी काय निर्णय घ्यायचा. साधा याचा देखील अधिकार स्थानिक कमिटीला नाही. हे किती मोठे दुर्दैव आहे.! यावर टोला मारताना पवार साहेब म्हणतात.! आमच्या याद्या तयार आहेत. आम्हाला कोठे नेहमी-नेहमी वर विचारायला जावे लागते.? त्यामुळे, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काँग्रेसला वैतागल्याचे दिसत आहे. अर्थात याचे उत्तर शिवसेनेकडून लगेच मिळणार नाही. पण, हे किस्से येणाऱ्या काळात शिवसेना व काँग्रेस विरोधात उभी ठाकली जाईल.! तेव्हा ठाकरेंच्या शैलीतून रंग बाहेर पडतील. हे जनतेने कोठेतरी अधोरेखित करुन ठेवावे.

काहीही मागताना एकच विचार कर.!
 आपण, तिकडे जाऊन आलोय.!

             आता एकंदर मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप जवळ आली आहे. सगळे करुन सवरुन नामानिराळे राहिलेले दादा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व पुण्याचे पालकमंत्री होण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेना गृहखाते सोडण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे, महाविकास आघाडीत "गृहकलह" सुरु असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, सत्तेसाठी निर्माण झालेली ही आघाडी पाच वर्षे टिकेल की नाही. यावर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. या सगळ्यात काँग्रेसला जे आयते मिळाले. ते खावेना की काय? असा देखील प्रश्न पुढे येऊ लागला आहे.

- सागर शिंदे