विखेंच्या राजकारणाचा झालाय "फुटबॉल".! तो "एक निर्णय" चुकला ?
संपादकीय :-
२०१४ पासून राज्यात "मोदी लाटेने थौमान" घातले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला "उतरत्या कळा" लागल्या. या पडत्या काळात विखे पाटलांच्या गोटातून "फुटाफुटीची" चर्चा सुरु झाली आणि काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या गळ्यात "विरोधीपक्षनेते" पदाची माळ टाकून "चर्चेला पुर्णविराम" दिला. गेली साडेचार वर्षे ते "विरोधीपक्ष" होते की "पक्षविरोधी" हे कोणालाच कळले नाही. अशी टिका महसुलमंत्री थोरात साहेब यांनी वारंवार केली. अर्थात ती खरी होती. हे जनतेने वारंवार अभ्यासले.! एकीकडे काँग्रेस दुबळी होत गेली तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र कुरुक्षेत्रावर शंखनादच केला होता. त्यामुळे, भाजपला काँग्रेसचे भय बिल्कुल राहिले नव्हते. तर, दुसरीकडे धनंजय मुंडे वारंवार वादळ निर्माण करत होते. दोन्ही विरोधीपक्षनेत्यांची तुलना करता विखे पाटलांना नेहमीच टिकेचे धनी व्हावे लागल्याचे पहायला मिळाले. भाजपला व मुख्यमंत्र्यांना विरोध करायचा, तर उलटपक्षी विखेंच्या बहुतांशी कार्यक्रमांना भाजपलाच निमंत्रण राहत असे. अर्थात याचा तिडपापड शेजार धर्माला सर्वाधिक झाला. म्हणजे थोरात साहेबांना. म्हणून तर दोघांमध्ये प्रचंड "शब्दसंहार" पहायला मिळत होता. तो अगदी संगमनेरची जागा शिवसेनेला जाईपर्यंत.!
दरम्यानच्या काळात भाजपला अजून १० ते १५ वर्षे अच्छे दिन राहणार. याचा पुरेपुर अभ्यास साहेबांनी केला होता. म्हणून थेट भाजपची वाट धरायची.! हे त्यांच्याविषयी वारंवार बोलले जात होेते. परंतु, योग्य वेळेची संधी त्यांना चालून आली नव्हती. यात महत्वाचे म्हणजे लोणी ते संगमनेर हे एकच म्यान आहे आणि एकाच म्यानात दोन तलवारी राहणे अशक्य आहे. त्यामुळे, विखेंना काँग्रेसमधून बाहेर पडावे असे थोरात गटाला मनस्वी वाटत होते. कारण, प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधाीपक्षनेता ही जबाबदारी विखेंच्या गैरहजेरीत थारोत साहेबांनाच मिळणार ही काळ्या दगडावरची रेष होती. म्हणून कधी झेडपीचे खुसपट तर कधी पक्षांतर्गत कुरघोड्यांनी थोरात वर्सेस विखे हे वाद नेहमीच राज्याने पाहिले आहे. पण, जोवर विखे पाटील काँग्रेसचा हात सोडत नव्हते. तोवर त्यांचे भविष्य निर्विवाद चांगले होते. पण, त्यांनी काँग्रेसला सोडावे अशी परिस्थिती निर्माण करण्यात काँग्रेसच्या एका गटाला यश आले, आणि विखेंच्या राजकारणाला एक उतरती कळा लागली.
तुम्हाला आठवत असेल.! २०१९ ची लोकसभा. विखे साहेब अगदी पोटतिडकीने मुलाच्या तिकीटासाठी प्रयत्न करीत होते. नगर दक्षिणेची जागा काँग्रेसला घेऊन उत्तर नगरची किंवा पुण्यातील एखाद्या जागेवर साटंलोटं व्हावं.! असे अतोनात प्रयत्न त्यांनी केले. पण, काँग्रेसमधील थोरात गटासह अनेकांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. इतकेच काय.! डॉ. सुजय विखेंचा पत्ता कट व्हावा, म्हणून काँग्रेसने पवार साहेबांचे कान भरले आणि पवार साहेबांनी देखील नगर दक्षिणेवर आपलाच हक्क बजावला. मी दुसऱ्याच्या मुलांचे बालहट्ट का पुरवू असे म्हणत त्यांनी पद्मश्री बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख यांच्या ऐतिहासिक युद्धाला उजाळा दिला. खरेतर, विखेंची विचारसारखी ही भाजप प्रणित नाहीच. पण, त्यांना त्या काळात प्रचंड हतबलता सोसावी लागली. त्याचे सुपुत्र डॉ. विखे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी उमेदवारी नाकारताच त्यांनी "व्यक्तीस्वातंत्र्याचा" आधार घेत भाजपत प्रवेश केला. तेव्हा मात्र राधाकृष्ण विखे यांना चक्रव्युव्हासारख्या संकटाला फेस करावे लागले. त्यावेळी, राज्याच्या राजकारणात असे पहिल्यांदा झाले. की, काँग्रेसचे विरोधीपक्षनेते भाजपच्या उमेदवाराचा गुप्तगू प्रचार करत होते. आता डॉ. सुजय विखे यांच्या मातोश्री झेडपीला काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत झेडपी अध्यक्ष झाल्या. त्यांनी देखील पुत्राचा निर्णय पदरात घेत सगळे झेडपी सदस्य आणि अंतर्गत यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे, राज्याच्या सोडा.! देशाच्या राजकारणार असे पहिल्यांदा झाले. की, माता-पिता सोबत नसतांना पुत्राने सर्वात मोठा विजय प्राप्त केला. अर्थात हे नियोजन एकट्या सुजय विखे साहेबांचे होते.! असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल. त्यात अंतर्गत राजकारण राधाकृष्ण विखे यांचे होते. हे अगदी कोणीच नाकारु शकत नाही. विशेष बाब अशी. की, नात्यागोत्याचे राजकारण जुळवून आणण्यासाठी पवार साहेबांनी खूप मोठी शक्कल लढविली होती. पण, ती अपयशी ठरली आणि पुन्हा एकदा पवार कुटुंबावर सरशी विखे कुटुंब ठरले. हे यश मिळविण्यासाठी विखे साहेबांनी कोण जाणे कोणा-कोणास काय-काय शब्द दिले होते. अर्थात त्याचीच पुर्तता झाली नाही. म्हणून तर, त्यांच्या विरोधात भाजप पराभूत नेत्यांनी गरळ ओकणे सुरु केले आहे.
जेव्हा लोकसभेचा निकाल लागला. तेव्हा, डॉ. सुजय विखे यांची हवा काही औरच होती. त्यांच्या अंगाला वारा स्पर्श करु शकत नव्हता. कारण, देशात एकहाती सत्ता आली होती. हे वारे पाहुन विखे पाटलांनी मागचा पुढचा विचार न करता थेट भाजपत जाऊन गृहनिर्माण मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी असे वाटत होते. की, "विखे बोले तैसा जिल्हा चाले".! अर्थात राज्याच्या नेत्यांनी देखील त्यांना चांगलेच उचलून धरले. या दरम्यान नकळत राम शिंदे, शिवाजी कर्डीले, दिलीप गांधी यांच्यासह अनेकांची वजने कमी होऊ लागली. शिंदेंनी तर जिल्हा विभाजन अजेंड्यावर घेत विखे पाटलांना उत्तरेची जाहागिरी वाटून दिल्यासारख्या हलचाली सुरु केल्या होत्या. पण, दुर्दैव असे. की, लोकसभा (पोटनिवडणूक सातारा) व विधानसभेच्या प्रचारात शरद पवार साहेब भिजले आणि विखे पाटलांसह राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचे मनसुबे धुवून निघाले. नगर जिल्ह्यात १२-० फॉर्म्युल्याचे घड्याळाने १२ वाजविले. यावेळी भाजपच्या दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. अपराजीत पिचड, कर्डीले, शिंदे, कोल्हे, राठोड व मुरकूटे यांना जबरदस्त धक्का बसला. भाजपचे ३ आले त्यात विखेंचाही विजय झाला. वजिर जिंकला मात्र, सगळे प्यादे बुद्धाबळाच्या बाहेर फेकले गेले. त्यामुळे, या सर्वांनी विखेंच्या खेळ्यांवर संशय व्यक्त केला. इतकेच काय.! ही पराभूत टोळी मुंबईत जाऊन विखेंना मंत्रीपद देऊ नये. अशी विनंती केली. पण, दुर्दैव असे की, भगव्या टोप्या घालून त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. हा खेळ इथेच थांबला नाही.! तर, त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी. अशी मागणी पराभत व नाराज व्यक्तींनी केली.
आता एकीकडे सत्ता गेली. दुसरीकडे डॉ. सुजय विखेंना किमान अडिच वर्षानंतर मंत्रीपद मिळणे शक्य वाटत होते. ते संकेत देखील मावळले आहेत. विखेपाटलांना भाजप विचार व त्यांच्यावर होणारे आरोप. यामुळे, त्यांची नाराजी वाढू लागली आहे. दुसरीकडे सौ. शालिनिताई विखे यांना पुन्हा झेडपी अध्यक्ष करण्यासाठी त्यांची जुळवाजुळव सुरु आहेत.
राधाकृष्ण विखेंच्या जिवावर तुम्ही निवडणुका लढविल्या का ? पराजयाचे खापर त्यांच्यावर का ? भाग २ नक्की वाचा.!