आ. थोरातांची ४० वर्षे आमदारकी आणि मुस्लिम समाज्याचा वापर !!

अस्सलाम वालेकुम भाईयों..!

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                       एकेकाळी राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद संगमनेरात होती. त्यासाठी बी. जे. खताळ यांचा शब्द "प्रमाण" मानला जात होता. आज इतिहासाची पाने उचकली तर लक्षात येते. की, राज्याचे पाहिले अल्पसंख्याक मुख्यमंत्री बॅलिस्टर ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्री पद बहाल करण्यासाठी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खताळ पाटलांना आवर्जुन विचारले होते. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर अंतुले यांच्यावर शिक्कामुर्तब झाला. हे प्रमुख्याने सांगायचे कारण असे की, तेव्हा काँग्रेसचा अल्पसंख्याक समाजाकडे पाहण्याचा  दृष्टीकोण हा प्रचंड सकारात्मक होता. हा इतिहास राज्याच्या राजकारणात अधोरेखीत झालेला आहे. काँग्रेसपक्ष आणि मुस्लिम समाज ही जोडलेली नाळ विचारात घेतली तर सत्ता असो अथवा नसो. हा समाज सदैव काँग्रेस पक्षाच्या विचारांशी बांधील राहिलेला दिसून येतो. आज मात्र या समाजचा केवळ स्वार्थी राजकारणासाठी उपयोग केला जात असल्याचे या महाशिवआघाडीच्या युतीतून स्पष्ट होत आहे.
             

बी. जे. खताळ पाटील.!

एक गोष्ट प्रकर्षाने नमुद कराविशी वाटते. की, एकेकाळी याच संगमनेरच्या खताळ पाटलांनी "मुस्लिम" समाजातील माणुस "मुख्यमंत्री" पदावर नेऊन बसवला. पण, आज दिवस फिरले. आता, आ. थोरात साहेब मुस्लीम समाजातील एकही नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाचा बहुमान देईनात. इतकेच काय !! राज्यात जातीयवादी पक्षाशी बोलणी करून मुस्लिम समाजाची फसवणूक करू पहात आहेत. हे वास्तव असुन काँग्रेस विचारधारेला संगमनेरमध्ये मुठ-मातीच मिळते आहे. त्यामुळे, कालचे तारक, उद्याचे मारक ठरु शकतात. हे त्यांना कोणी समजून सांगावं..! साहेबांनी विचार करावा. येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाज्याचे शहरात १५ हजार व तालुक्यात १५ हजार असे सरासरी ३० हजार मतदान आहे. त्यामुळे, कोणत्या ना काेणत्या निवडणुकीत मुस्लीम समाज किंगमेकरच्या भुमिकेच येऊन चर्चेचा विषय ठरत असतो. बहुसंख्येत असलेल्या मुस्लिम बांधवांनी आजवर नेहमी काँग्रेसचीच पाठराखण केली आहे. यामुळे, सेना भाजपच्या उमेदवाराना ४० वर्षात हे लिड कधीच तुटले नाही. मुस्लिम बांधवांच्या मतांवरच संगमनेरमधील निवडणुकीच्या विजयाचे गणित रचली जातात.

संगमनेर मे काँग्रेस का आमन रहें.!

      मागील अनेक निवडणुकांचा विचार केला तर मुस्लीम समाजाने काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत आ.बाळासाहेब थोरात यांना साथ दिली. किंबहुना आ.थोरात यांना राज्याच्या राजकारणात मोठे करण्यात इथल्या अल्पसंख्याक समाजाने दिलेले योगदान महत्वपूर्णच राहीले आहे. ही वस्तूस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. कारण, देशात मोदी लाट असताना संगमनेरात थोरातांचे वर्चस्व कायम ठेऊन साहेबांची मान ताठ ठेवण्यात याच समाज्याचे योगदान आहे. अगदी काल झालेली लोकसभा असो वा विधानसभा देशपातळीचा कोणताही राजकीय परिणाम विचारात न घेता मुस्लीम समाज भक्कमपणे थोरातांच्या  पाठीशी उभा राहीला आहे. ही सर्व राजकीय सामाजिक परिस्थिती माहीत असताना सुध्दा थोरातांनी थेट शिवसेनेसोबत जाण्याची घेतलेली भूमिका मुस्लिम समाजाला अस्वस्थ करणारी आहे.
संगमनेर हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कम्युनिष्ट विचारांच्या वाटचालीनंतर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला या भागाने साथ दिली. यामध्ये अल्पसंख्याक समाज मागे राहीला नाही. मग या समाजाला आजपर्यत काय मिळाले असा प्रश्न समाजातील युवक सहजपणे आता विचारू लागले आहेत.
         राजकीय दृष्ट्या या समाजाचा केवळ वापर केला गेला हिच भावना आता समाज जाहीरपणे बोलू लागला आहे. संगमनेर नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष पद सोडले तर कोणतेही मोठे पद या समाजाला मिळाले नाही. आ.थोरांतानी या समाजाला काय दिले. मुस्लीम समाजातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा उपयोग थोरातांनी स्वतःच्या  मर्जीतील किंवा नात्यातील नगराध्यक्ष ठरविण्यासाठी करून घेतला. असे आरोप काही मुस्लिम नेत्यांनी आ. थोरतांवर केले आहेत. ते आठ नगरसेवक मुस्लीम समाजाचे निवडून आले तरी त्यांना दबावापोटी स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. असे असंख्य माजी नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर वारंवार टिप्पणी केली आहे.
तालुक्यातील सहकार क्षेत्राचा बोलबाला राज्यात केला जातो. पण, सहकार क्षेत्रात मुस्लीम समाजाला किती सामावून घेण्यात आले. किती संस्थाची उच्च पदे या समाजाला मिळाली, मुस्लीम समाजाला ना शिक्षण क्षेत्रात संधी मिळाली ना सहकार क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व. त्यामुळे, इथला मुस्लीम समाज स्वकष्टाने उभा राहीला. मेहतीने या समाजातील युवकांनी व्यापारात स्थान निर्माण केले. पण, आ.थोरातांनी या समाजातील युवकांसाठी काही केले नाही. असे आरोप त्यांच्यावर वारंवार होत आहे. शहरात अँग्लो उर्दू हायस्कूल सोडले. तर, या समाजाला शिक्षणाच्या कोणत्याही संधी उपलब्ध झाल्या नाहीत.
             
शासनाच्या योजनाचा लाभ मिळू दिला नाही. कारण, संधी दिल्या तर  समाज हाताबाहेर जाईल. हीच भूमिका ठेवल्याने अनेक वर्षे या समाजाला विकासाच्या संधी मिळाल्या नाहीत हे वास्तव आता समाजातील युवक जाहीरपणे बोलून दाखवू लागले आहेत.
             समाजाचा अनेक वर्षे झालेला उपयोग आता सर्वांच्यासमोर आला. म्हणून, थोरांताच्या समवेत अनेक वर्ष राहीलेली नेते, त्यांना जीवाभावा प्रमाणे साथ देणारी काही माणसे साहेबांपासून दूर गेली आहेत. याचे उदाहरण पाहिले. तर, माजी उपनगराध्यक्ष उमरभाई बेग, जावेद जहागिरदार, डाॅ.जी.पी शेख यांनी जाहीरपणे साहेबांच्या विरोधात बंड पुकारला आहे. तर, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष अजीजभाई शेख आज कोणत्याही प्रक्रीयेत नाही. अनेक आजी-माजी नगरसेवक आज खासगीत थोरातांच्या विरोधात बोलतात. पण, काही मर्यादा असल्याने थेट विरोधाचे धाडस ते दाखवू शकत नाही हेच गुपित वास्तव आहे. मात्र, याचा कधी ना कधी उद्रेख होऊ शकतो. याची खबरदारी साहेबांनी वेळीच घेणे गरजेचे आहे. यावर सोलुशन काढण्याऐवजी आतातर शिवसेनेसोबत जाण्याची भाषा मुस्लीम समाजाला एक निमित ठरली आहे. आता तर विधानसभा निवडणुकीनंतर  उघडपणे समाजाची  राजकीय सामाजिक फसवणूक थोराताकडून होवू लागल्याने हीच अस्वस्थता थोराताना विरोधाचे कारण ठरेल आणि संगमनेरात एकेकाळी राजकीय इतिहास घडेल हे निश्चित !

 - सुशांत पावसे

 (संगमनेर प्रतिनिधी)

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ५२ हजार वाचक)