आ "रोहित पवार" हे खा. "विखेंना" उद्याचा पर्याय..! १९९१ ते २०१९ च्या पराजयाचे उत्तर.! "विखे ते पवार" २०२४ ला पुन्हा युद्ध.!!


अकोले (प्रतिनिधी) :-
                      पुर्वी चाणक्याने "साम,दाम,दंड,भेद" या तत्वांचा वापर केला आणि सर्वसाधारण "चंद्रगुप्तला" अखंड  साम्राज्याचा "राजा" केले. तेव्हापासून राजकारणात "चाणक्यनिती" रुढ़ झाली. तर, युद्धात "सुर्योदय ते सुर्यात" आणि ठरलेले सर्व नियम धाब्यावर बसवून  "महाभारताने" राजकारणाला "धुर्तपणा" शिकविला. इतकेच काय ! संधी मिळाली तर ज्याला जिवण दिले. तो सुद्धा आपल्यावर "घाव" करून "घात" करतो. हे इतिहासात "पृथ्वीराज चौहान" सांगून गेले. हाच इतिहास या अधुनिक राजकारण्यांनी वाचला आणि ते "धुरंधर म्हणा किंवा प्रगल्भ राजकारणी" ते "इकडचा थुका तिकडे" करण्यात अगदी "निष्णात" झाले. म्हणून तर "अनपेक्षीत राजकारण" आणि "रोषात्मक पुनरावृत्ती" जनतेला पहायला मिळू लागली आहे. सद्या "चाणक्यनिती, धुर्त राजकारण आणि घात" हे सर्व धडे महाराष्ट्राच्या राजकारणात  जनतेला पहायला मिळत आहे. याच राजकारणातून पुढील "लोकसभा" आणि "उजरपाठीचे" राजकारण शिजत असल्याचे बोलले जात आहे. स्पष्टच सांगायचे झाले. तर, आजवर शरद पवारांनी सगळे राजकारण अगदी "उकळून प्यायले". पण, "एक सल" अजूनही त्यांच्या मनात "दृढ" झाल्याचे दिसते आहे. ती म्हणजे, "विखे कुटुंबाचा पराभव". त्यामुळेच की काय ! साहेबांनी नगर दक्षिणेत रोहितची "दमदार एन्ट्री" केली की काय !! आणि राहिलेला हिसाब पुर्ण करतात की काय ? असा प्रश्न अभ्यासकांना वाटू लागला आहे. कदाचित हे वाक्य तुम्हाला "अतिशयोक्ती" वाटेल. पण, "इतिहासावर" नजर मारुन "वर्तमानाची परिस्थिती" पाहता "भविष्याचा वेध" घेऊन विचार केला. तर, उद्या आ. रोहित पवार हे खा. सुजय विखे यांच्या "विरोधात" उभे राहिले. तर "नवल" वाटू देऊ नका. बस इतकीच "मापक अपेक्षा" आहे. कारण, इतिहास सांगतोय की.....

भविष्यातील दोन योद्धे.!

           सन १९९१ च्या "लोकसभा" निवडणुका तोंडावर होत्या. त्यावेळी, राधाकृष्ण विखे यांचे "पिताश्री" बाळासाहेब विखे यांना "राजीव गांधी" यांनी काँग्रेसचे तिकीट नाकारुन ते यशवंतराव गडाख यांना दिले होते. त्यामुळे, सात वेळा खासदार राहिलेले पाटील साहेब काँग्रेस विरोधात बंड पुकारुन "अपक्ष"चा झेंडा घेऊन मैदानात उतरले. आता, काँग्रेसच्या पडत्या काळाचा फायदा घेणार नाही. ते "जनतादला" (भाजप) कसले.! त्यांनी विखेंना पाठिंबा दिला. परंतु, असे असले तरी, बाळासाहेब विखेंचा "पराभव" झाला आणि गडाख "खासदार" झाले. अर्थात, राज्याच्या राजकारणात "पवार पॅटर्न" कोठून कोठे सुरु होईल आणि कोठे संपेल. हे भल्या-भल्यांना आजवर कळले नाही. त्यावेळी तर त्यांच्या "तारुण्याची प्रगल्भता" राजकीय आखाड्याला "रंगत आणणारी" होती. म्हणून तर काँग्रेस श्रेष्ठींवर "शब्दसंहार" करणाऱ्या बाळासाहेबांना आवर घालण्याची एव्हाना "पराभूत" करण्याची जबाबदारी गांधींनी पवारांवर सोपविल्याचे बोलले जात होते. पवारांनी आपली खिंड लढविली. पण, नकळत एक "अनर्थ" घडून गेला.
          निवडणुकीत विखे पाटील यांनी मतदारांना ५ हजार सायकलीपैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनी जे वाटले असेल ते घ्या. पण, मतदान मात्र काँग्रेसलाच करा. असं शरद पवार आणि यशवंतराव गडाख जाहीर सभांमध्ये म्हणाल्यचा "आरोप" या दोघांवर झाले. त्यामुळे, हा वाद थेट "काेर्टात" गेला. गडाख व शरद पवारांनी आपलं "चारित्र्यहनन" केलं, "भ्रष्ट मार्गाचा" वापर करून ते निवडून आले. त्यामुळे त्यांची निवड बेकायदेशीर ठरवा आणि मला विजयी घोषित करा, अशी "याचिका" बाळासाहेब विखे यांनी केली होती. त्यात शरद पवार यांना देखील "आरोपाच्या पिंजऱ्यात" उभे केले गेले होते. त्यामुळे, त्यांना प्रचंड "मानसिक त्रास" सहन करावा लागला होता. नंतर "गडाख यांची खासदारकी रद्द" करण्यात आली व "विखे विजयी" झाले. तत्पुर्वी न्यायालयातून पवारांना "सॉफ्ट कॉर्नर" मिळाला. तरी, त्यांनी विखेंवर सरळ-सरळ नाराजी व्यक्त केली होती.

इतिहासाला अंत नाही..!

         
   तेव्हापासून तर आजवर "पवार आणि विखे" या कुटुंबात "कटूता" निर्माण झाली. वरवर आघाडीत असताना राधाकृष्ण विखे व शरद पवार यांचे "हातमिलन" झाले. मात्र, "मनातील इतिहास" कदाचित पवारांना शांत बसू देत नव्हता. त्याची "पुनरावृत्ती" होण्याची वेळ तब्बल २८ वर्षांनी आली होती. म्हणून तर राधाकृष्ण विखे यांचा "मुलगा कम" बाळासाहेब विखे यांचा "नातू" म्हणून की काय ! डॉ. सुजय विखे यांचा "बालहट्ट" पवार साहेब पुरवू शकले नाही.
         आता खरे पाहता शरद पवार यांना कित्तेक "विशेषने" वापरली जातात. त्यातले एकच घेऊ. ते म्हणजे "धुरंधर राजकारणी" त्यामुळे, "इट का जबाब पत्थरसे" असे झाले नाही. तर, ते "राजकारण" कसले ? इतिहास "घडवायचा, बिघडवायचा आणि सावरायचा". यातूनच घडते "पुनरावृत्ती". २०१९ सालात पवार विरुद्ध विखे हे "दोन्ही "धुरंधर समोरासमोर आले. तुम्हाला चांगले आठवत असेल. नगर जिल्ह्यातील "उत्तरेची जागा" काँग्रेसची व "दक्षिनेची जागा" राष्ट्रवादीची. पण, शिर्डी (उत्तर) राखीव असल्यामुळे तेथे "मराठा उमेदवार" तेथे ऊभा राहु शकत नाही. त्यामुळे, संधी होती ती फक्त दक्षिणेत. म्हणून, दादांच्या नंतर ही जागा राष्ट्रवादीला कधीही जिंकता आली नाही. म्हणून, त्यांनी उत्तरेत "साटंलोटं" करावे. असे वैयक्तीक ना. विखे यांना वाटत होते. पण, त्यांच्या मुलासाठी काँग्रेसमधील "अंतर्गत वाद" हा मुद्दा पुढे आणू शकला नाही. अखेर पुण्याच्या एका जागेवर "तडजोड" ठरत आली. परंतु, राष्ट्रवादीच्या "सुप्रिम कोर्टात" हा प्रस्ताव ठेवला गेला आणि काही क्षणात पवार साहेबांना १९९१ चा काळ आठविला असावा. पुढे काही प्रस्ताव येण्यापुर्वी त्यांनी स्पष्ट सांगितले. मी कोणाच्या मुलांचे "बालहट्ट" पुरविण्यास तयार नाही. त्यामुळे, ही जागा "पारंपारिक राष्ट्रवादीची" आहे आणि ती आम्हीच लढविणार. यावर पुन्हा "चर्चा" नको.
                 दोन्ही पक्षांनी चर्चा थांबविली खरी. पण, मीडियाने जो गडाख, विखे, गांधी व पवार हा "भुंगा" सुरु केला. तो थेट ९१ ची "पुनरावृत्ती" करून या निवडणुकीला ऐतिहासीक व कौटुंबिक प्रतिष्ठेची "लढाई नव्हे द्वंद्वापर्यंत" नेऊन थांबवीला. शब्दाने शब्द इतका वाढत गेला. की,  "बांदावरच्या वादासारखे" आर या पार सुरु झाले. अखेर पवारांनी त्यांचे "नातू" पार्थ पवार यांचा "बालहट्ट" पुर्ण केला. तर, डॉ. सुजय विखे यांना "घरचा रस्ता" दाखविला. पण, डॉ. सुजय विखे इतके "हट्टी" होते. की, कोणी तिकीट दिले नाही. तरी "बेहत्तर"..! पण, अपक्ष लढू. पण, आता मैदान सोडयचे नाही.

वैर..! छे..! प्रतिष्ठा

             
अखेर. ज्या भाजपला "जातीयवादी" आणि बरेच काही "शब्दप्रयोग" करून झाले होते. त्याच "भाजपचा आधार" घेत निवडणुक लढविली. आता, पवार साहेबांना नामी संधी होती. त्यामुळे त्यांनी अगदी चाचपून-चाचपून उमेदवाराचा शोध सुरु केला. ज्या विखे कुटुंबाने यशवंतराव गडाख याचा "पाडाव" केला होता. त्यांचे उत्तर देण्याची "नामी संधी" गडाखांकडे चालून आली होती. परंतु, त्यांच्याकडून साफ नकार देण्यात आला. तेव्हा नगर शहराचे आमदार तथा शिवाजी कर्डीले यांचे जावई "संग्राम जगताप" यांच्या "गळ्यात माळ" घातली गेली. "नात्यागोत्याचे राजकारण" पाहुन तेथे "रणसंग्राम" पेटेल. असे पवारांना वाटत होते. पण, तसे झाले नाही.
            अखेर, "आमदार खासदारकीला" पडले. तेव्हा राज्यात कधी नव्हे.! काँग्रेस पक्षाचे विरोधीपक्षनेते भाजपच्या उमेदवाराचा व "बालहट्ट" पुर्ण करताना दिसून आले. त्यावेळी, पवारांचे "बाळराजे" (पार्थ) पडले आणि विखेंचे "बाळराजे" निवडून आले. तेव्हा या महाराष्ट्राने पुन्हा एकदा "विखेंची ताकद" अनुभवली. पवार साहेबांचा पुन्हा एकदा पराभव झाला. असे म्हटल्यास काही एक वावघे ठरणार नाही. १९९१ ची सल पवार साहेबांच्या मनात कायम राहुन गेली. ती अजूनही कुरुपासारखी रुचत असेल. पण, आता त्यावर जालीम उपाय पवारांनी शोधला आहे. "येथे पाहिजे जातीच".!! असेच काहीसे म्हणत रोहित पवार यांच्या रुपाने उद्याच्या लोकसभेचा दावेदार तथा डॉ. सुजय विखे यांचा प्रतिस्पर्धी म्हणून रोहित असणार आहे. ही "रोखठोक सार्वभौमची" भविष्यवानी येणाऱ्या काळात तुमच्या कानावर पडणार आहे. तेव्हा असे काही कानावर पडू लागले. तर, आश्चर्य वाटू देऊ नका.

यशस्वी बालहट..!

            वास्तव पाहता जेव्हा डॉक्टरांनी दक्षिनेचे आॅपरेशन केले. तेव्हा त्यांच्यासोबत राम शिंदे, सदाशिव लोखंडे, बबनराव पाचपुते, विजय औटी, शिवाजी कर्डीले, अनिल राठेड, दिलीप गांधी, माेनिकाताई राजळे, पंकजा मुंडे, शालिनिताई विखे, राधाकृष्ण विखे अशी भलीमोठी फौज होती. त्यामुळे, हे यश डॉक्टरांना सहज हस्तगत करता आले. परंतु, आता परिस्थिती अगदी विरुद्ध झाली आहे. ज्या विखेंसाठी वरिल सर्वांनी जीवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला. त्यातला एकही व्यक्ती आमदारकीला निवडून आला नाही. अपवाद राजळे व पाचपुते वगळता. अर्थात हे दोन्ही उमेदवार स्वत:च्या मरिटवर निवडून आल्याचे बोलले जाते. या अपयशाला उत्तर देताना पराभूत झालेल्या सगळ्यांनीच विखे कुटुंबाच्या विरोधात बंड पुकारुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विखेंची कागाळी केली. काही झाले तरी. त्यांना मंत्रीपद देऊ नये. पण, दुर्दैव असे. की, १२-० म्हणाणाऱ्या विखेंना व मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन अशी वाल्गना करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना जनतेने चांगला धडा शिकविला आणि हेच सत्तेबाहेर फेकले गेले.

                      आता येणारा काळ राष्ट्रवादीसाठी सर्वोत्तम असणार आहेत. कारण, रोहित पवार कामांच्या माध्यमातून स्वत:ची छबी निर्माण करतील. निलेश लंके, घनश्याम शेलार, यांच्याकडून पवारांना प्रचंड मोठी ताकद मिळेल. तर, महत्वाचे म्हणजे शहरात संग्राम जगताप यांना मंत्रीपदावर घेऊन बळ दिले जाईल आणि भाजपचा गड हातातून खेचून घेत राष्ट्रवादीला पुरक वातावरण निर्माण केले जाईल. आता डॉ. सुजय विखे पुन्हा उभे राहणार नाहीत. असे कोणी धाडसाने म्हणणार असेल. तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे, विखे वर्सेस पवार हा राजकीय संघर्ष पुन्हा राज्याला पहायला मिळेल. एकंदर विचार करता, पवारांच्या काट्यानेच १९९१ चा काटा काढण्यात पवारांना यश येईल. असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.
  - सागर शिंदे

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ८५ हजार वाचक)