"शेवटच्या श्वासापर्यंत" मी "शिवसैनिकच" राहिल. पण, "महायुतीत" सुद्धा पिचडांना सपोर्ट नाही म्हणजे नाहीच..!! - भांगरे
अकोले (प्रतिनिधी) :-
खरंतर मी आदिवासी भागातून पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडलो. कदाचित जर पिचड साहेबांनी शेंडीतच एखादे उच्च शिक्षणाचे कॉलेज काढले असते. तर मला बाहेर पडण्याची गरज भासली नसती. इतकेच काय ! आज जे तरुण त्यांच्या नावाने बोंबा ठोकतात. त्यांनी साहेबांचे फोटो घरा-घरात सोडा, देव म्हणून गळ्यात टांगले असते. पण, दुर्दैव आमचे. की, "मायभुमी" सोडून "दुसावटी कर्मभुमी" करावी लागली. आता याला जबाबदार कोण ? हे नव्याने सांगायला नको. पुण्यात गेल्यानंतर इंजिनियरींग पुर्ण केले आणि "मातीशी ईमान" म्हणून "आदिम यंग ग्लॅडिएटर" या संघटनेत सामिल झालो. तेथे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना. बोगस आदिवासी, नोकरी, आरक्षण, कुमारी माता, या प्रश्नांवर काम केले. तर वेगवेगळे कॅम्प, तरुणांना रोजगार, युपीएससी, एमपीएसी क्लास, मार्गदर्शन शिबीरे, कार्यशाळा असे अनेक उपक्रम सुरु केले होते.
दरम्यानच्या काळात गावी शेंडीकडे येणे होत असे. तेव्हा येथील "शिक्षण, आरोग्य" व "मुलभूत गरजा" यांची देखील पुर्तता होत नाही. हे प्रकर्षाने निदर्शनास आले. तेव्हा माझ्यातील माणूस जागा झाला आणि पहिला प्रश्न डोळ्यासमोर अवतरला. तो म्हणजे गेली ४० वर्षे या आमदारांनी काय केले ? उत्तर मिळाले नाही. म्हणून मी तरुणांना शहराचे रस्ते दाखविले. स्वातंत्र्यानंतर मा. गांधी म्हणत असे. खेड्याकडे चला. तर डॉ. बाबासाहेब म्हणाले, उन्नती करायची असेल तर शहराकडे चला. अर्थात, जर खेड्यात राहुन दोन वेळचे अन्न मिळणे मुश्किल असेल. घर, रोजगार, शेती, पाणी, शिक्षण हे मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागत असेल. तर उपयोग तरी काय असल्या खेड्याचा. म्हणून मी अनेक तरुणांना नारायणगाव आणि चाकनला कामाला लावले. अद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे, "शिवतेज प्रतिष्ठाणच्या" माध्यमातून गरिब विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप वेैगरे उपक्रम सुरू केले.
मग, त्यानंतर सरकार दरबारी लढा देण्याचा चंग आम्ही बांधला. कारण, आदिवासी गरिबीचे आभाळ प्रचंड फाटलेले होते. याला कोठे-कोठे शिवायचे. हा प्रश्न मनाला भेडसावत होता. तेव्हा प्रश्न पडला. या आमदाराने ४० वर्षे केले काय ? या अनुत्तरीत प्रश्नांची प्रचंड चिड आली. आणि त्या दिवशी मनाशी खुनगाठ बांधली. आता आदिवासी प्रश्नांना तर शह द्यायचाच. मात्र, आजपासून सत्तेला देखील सुरुंग लावायचा. आणि त्या दिवशी मी राजकारणाच्या आखाड्यात खऱ्या अर्थाने सामील झालो. आदिवासी भागात "कुस्तीचे आखाडे" तयार करून. "पिचडांच्या विरोधात" उद्याचे यंग पैलवान उभे करायचे काम मी सुरु केले. जेथे सुविधांची कसर होते. तेथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे अभियान मी राबविले. यातूनच माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जनमानसांच्या नजरेत बसला.पुढे २०१४ ची विधानसभा निवडणूक तोंडावर आली होती. काही झालं तरी सत्ता बदलली पाहिजे. माझ्या समाज्याचाच नाही, तर सगळ्या अकोले तालुक्याचा विकास झाला पाहिजे. या अजेंड्याखाली मी प्रथमत: अकोल्यात सक्रिय झालो. जर "परिवर्तन" करायचे असेल. तर, प्रशासन हाती धरले पाहिजे. आणि ते नमवून काम करुन घेण्यासाठी "लोकप्रतिनिधी" झाले पाहिजे. म्हणून मी थेट "मातोश्री" गाठविली. मात्र, तेथे माझ्यावरचड "मातब्बरांच्या" रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तेथे माझा निभाव लागला नाही. सुदैव असे की, याच वेळी महायुती आणि आघाडीत तुटून राज्याच्या विधानसभा स्वबळावर लढल्या गेल्या आणि शिवसेनेत काम झाले नाही. म्हणून, पर्यायी काँग्रेसचे तिकीट घेऊन मी अकोल्याची विधानसभा लढविली. त्यात अपयश आले. पण, या एका निवडणुकीने मला तरुणांनी उभे केले. फक्त पुन्हा एका संधीची गरज होती. पण, त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाली आणि त्यात ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. त्यामुळे, मी मनात ठरवून टाकल.
आता शिवसेनेत पक्षप्रवेश करायचा आणि अखेरच्या श्वासापर्यंत "शिवबंधन" सोडायचं नाही. २०१६ पुर्वी मी शिवसेनेत आलो होतो. त्यानंतर पंचायत समिती व झेडपीच्या निवडणुकीत शिताफीने प्रचार केला आणि पाच लोकप्रतिनिधी आम्ही सर्वांनी ताकद पणाला लावून निवडून आणले. कधी नव्हे असा इतिहास अकोल्याच्या पंचायत समितीत रचला गेला. कधी नव्हे अशी सत्ता चार सदस्यांनी स्थापन केली. गावा-गावात शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. बुथचे नियोनज केले. हे काम करत असताना एक प्रकर्षाने जाणिव झाली. की, आदिवासी शाळांमध्ये कधी शिक्षक येतात, तर कधी येत नाहीत. आले तरी त्यांचे रिकामे उद्योग सुरू असतात. या कारणे शाळेतील मुलांना साधी ए, बी, सी, डी किंवा पाच पर्यंत पाढे येत नाहीत. त्यामुळे या व्यवस्थेमुळे मी प्रचंड अस्वस्थ होत गेलो. हे असेच होत राहिले. तर, हा तालुका कसा अंधारातून प्रकाशाकडे येणार ?, ही मुले उद्या मोठी होऊन कसे स्वत:च्या पायावर उभी पाहणार ? या पिढीचे भवितव्य काय ? ज्या आई वडिलांनी मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे काय ? म्हणून मला लोकप्रतिनिधी व्हावे वाटले. कारण, ज्यांनी तालुका लुटून खाल्ला आणि बंगला गाड्यांमध्ये राजूर ते विधीमंडळ इतकाच प्रवास केला. त्यांना गरिबीची जाणिव काय असणार ? जे स्वत: शिकले नाही, त्यांना शिक्षणाची किंमत काय असणार ? त्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन खासदार निधी उपलब्ध करुण शक्य त्या शाळांना संगणकांचे वाटप केले. झोपलेल्या मास्तरांना जागे करण्याचा प्रयत्न केला. डिजीटल तालुक्यासाठी केंद्र सरकारकडे अग्रह धरला.
अकोले तालुक्याचे राजकारण पाण्यावर होते. त्याचे योग्य नियोजन नाही. जे पावसाचे पाणी आमच्या भागात पडते. ते खाली वाहुन जाते. जे साठविले जाते. ते लोकांना वाटून दिले जाते. ज्यांच्या उशाला आणि पायथ्याला भंडारदरा आणि निळवंडे धरण आहेत. त्या गावात आजही उन्हाळ्या-पावसाळ्यात आपल्या माता भगिनी पिण्याचे पाणी दुरून डोक्यावर वाहते आहे. त्यामुळे झाले असे की, "धरण उशाला, अन कोरड घशाला" अशी परिस्थिती उद्भवली असून प्यायलाच हे हाल आहेत. तर, शेतीसाठीचा प्रश्नच काढू वाटत नाही. परंतु, दुर्दैव असे की, पाच ते १० एकर शेती असून शेतातून ११.३९ टिएमसी पाणी दिसते. मात्र, ते शेताला मिळू शकत नाही. म्हणून बेरोजोगार होऊन आदिवासी बांधव घर सोडून नोकरीच्या शोधात वनवन भटकतो आहे. मी एक अभियंता आहे.
१० वी १२ वी पास झालेला तरुण नाही. माझ्याकडे पाण्याचे नियोजन करणारा आराखडा आहे.
जे पाणी वाहुन जाते, ते साठविण्याच्या उपायोजना आहेत. मुळा, प्रवरा बारमाही करता येईल असे प्लॅनिंग आहे. मात्र, या तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. की, येथील लोकप्रतिनिधींना विकास नको आहे. पाच वर्षे काही काम झाले नाही. तीन किलोमिटर रस्ता झाला असे सांगतात. मात्र, ३० वर्षे काय केले ? याचे उत्तर जनतेला मिळायला तयार नाही. जी कामे केली. ती ३५ वर्षाच्या तुलनेत खूप वाटत असेल तर तो अंधभक्तांचा गैरसमज आहे. एखादा सुशिक्षित व तळमळीचा व्यक्ती येथे असता. तर अकोल्याची बारामती आणि राजूरचे जम्मू काश्मिर झाले असते. इतकी संधी यांना सत्तेत असताना होती. मात्र, यांनी स्वत:चा "सम्रुद्धी मार्ग" साधला आणि तालुका खड्ड्यात नेऊन घातला.==================
या लेखाविषयी प्रतिक्रिय देण्यासाठी संपर्क करा. मो. नं :- ९८२२५३३२२३ सतिश भांगरे (दादा)
-- (शब्दांकन) सागर शिंदे
उद्यापासून वाचा शिवसेनेचे युवा नेते सतिश भांगरे यांची धक्कादायक विशेष मुलाखत..!!
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७९ दिवसात १३९ लेखांचे ७ लाख ७० हजार वाचक)